संदीप चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगला, अपार्टमेंट अगदी शाळा, कंपनी अशा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या जमिनीवरही उत्तम बाग फुलवता येते. वास्तूच्या सौंदर्याचा, वाहतुकीचा, वापराविषयीच्या जागेचा विचार करून ही बाग फुलवता येते.

विशेष म्हणजे येथे जमिनीवरच बाग करायची असल्याने बऱ्याच प्रमाणात बाग फुलवण्यास अनुकूलता असते. भाजीपाल्याचीही बाग तर डोळ्यांची पारणे फिटतील अशी फुलते. जागा मोठी असल्यास ५ बाय ५ फुटांचे चौकोन करता येतात किंवा कंपाउंडलगत २ फूट जागा सोडून तेथे लांबलचक वाफे तयार करता येतात. आपल्याला त्याचा उपयोग तात्पुरता आहे की कायम स्वरूपाचा याचा विचार करून त्यात आर्थिक गुंतवणूक करता येते. मोठी झाडे निवडताना त्यांचा पसरणाऱ्या फांद्यांचा डोलारा (कॅनोपी) मुळांचा पसारा, पानांची गळती, मुळांचा व खोडाचा वास्तूला होणारा धोका लक्षात घेऊन झाडांची निवड करावी.

भाजीपाला व फुलबागेसाठी वाफे तयार करताना, त्यात फिरायला मोकळी जागा ठेवल्यास चांगली सोय होईल. येणाऱ्या सूर्यप्रकाशाची खातरजमा करून फुलझाडांची व पालेभाज्या, फळभाज्या यांची निवड करावी. येथे कल्पकतेने लोखंडी पायरीच्या मांडणीचा विचार केल्या, बागेची मांडणी अधिक देखणी होईल.

लाकडी पेट्या व पॅलेट्सची किमया

लाकडाच्या वखारीत, भाजी मंडईत, फळांच्या दुकानात किंवा आंब्याच्या मोसमात लाकडाच्या पेट्या सहज उपलब्ध होतात. काही उंचीने अधिक असल्यामुळे झाडांच्या मुळांना पुरेसा खोलगटपणा मिळतो. या लाकडाच्या पेट्यांना आतून-बाहेरून प्लास्टिकचे कापड किंवा नायलॉनच्या साडीचे आवरण द्यावे म्हणजे त्यातील माती वाहून जात नाही. या पेट्या बऱ्यापैकी टिकतात. यात प्रामुख्याने मुळा, बीट, रताळी, गाजर अशा कंदवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेता येते. ही खोकी लोखंडी मांडणीत झिक झॅक पद्धतीने मांडणी केल्यास उत्तम. बाजारातील प्लास्टिक क्रेट्स हादेखील भाज्या घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच व्हर्टिकल गार्डन साकारण्यासाठी लाकडाच्या पॅलेट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मुख्यत्वे बागेचे सुशोभीकरण करणारी फुलझाडे, आकर्षक रंगीत पानांची झुडपे लावण्यासाठी ही पॅलेट्स वापरण्यात येत असली तरी घरच्या घरी पालेभाज्या घेण्यासाठीही यांचा उत्तम वापर करता येतो. फक्त त्यासाठी पॅलेट्स आडव्या रूपात वापरावी लागतात. हे पॅलेट्स एकमेकांना जोडून त्यांची मांडणी केल्यास त्यावर छोट्या कुंड्या किंवा प्लास्टिकच्या बॅग्स ठेवता येतात. या पॅलेट्समध्ये हवा खेळती असल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. फक्त रोपे ओळीने लावण्याची गरज असते.

-sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace garden open space near bungalow apartment mrj
Show comments