पुनर्लागवडीसाठी हायब्रीड बिया उपयोगी पडत नाहीत. त्यासाठी ज्या रोपांमधे किंवा भाज्यांच्या प्रकारांमधे ‘स्वपरागीकरण आणि मुक्त परागीकरण’ होत असते, अशाच रोपांच्या बिया साठवणीकरता निवडाव्यात.
बियांच्या साठवणुकीसाठी निवडलेल्या रोपांवर काही फळे ही तशीच रोपांवर ठेवून ती पूर्ण पिकू द्यावीत. एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढून त्यानंतर त्यांची वाढ थांबते आणि रंग पालटू लागतो. असे बदल लक्षात घेत फळे गळून खाली पडायच्या आधीच काढून घेऊन सावलीत ठेवावीत. बियांच्या साठवणुकीची पद्धत सर्वसाधारणपणे सारखीच असली अनेकदा विशेषता काळजी घ्यावी लागते. बिया साठवणूक सरताना कोणती काळजी घ्यायची ते पाहू.
टॉमेटोसाठी काय काळजी घ्याल…
तुम्हाला ज्या रोपांच्या बियांची साठवणूक करायची आहे, त्या रोपांवरील ३ – ४ टोमॅटो झाडांवर पूर्ण पिकू द्यावेत. पूर्ण पिकलेले टोमॅटो कापून त्यांतील गर एखाद्या भांड्यात काढून घ्यावा. काढलेला गर ३ – ४ दिवस सावलीत ठेवावा. भांड्यावर झाकण ठेवावे.
हेही वाचा… तेथे कर आपुले जुळती!
गर दररोज एकदाच स्वच्छ चमच्याने हालवावा. ४ दिवसांनी भांड्यात बिया खाली बसलेल्या दिसतील. त्याच्या वरचा गर काढून टाकावा. आता भांड्यात ज्या बिया राहिल्या असतील, त्यावर पाणी घालून ठेवावे. काही बिया वर तरंगताना दिसतील, त्या काढून टाकाव्यात. तळाला राहिलेल्या बिया २-३ वेळा धुऊन घेऊन त्या कागदावर ताटलीमध्ये वाळत ठेवाव्यात. बिया पूर्ण कोरड्या झाल्यावर त्या पिशवीमध्ये, कागदाच्या पाकिटात किंवा एखाद्या हवाबंद डबीमध्ये ठेवून कशाचे ‘बी’, त्याचा प्रकार, साठवण्याची वेळ, दिनांक लिहावे. बियांची ज्यामध्ये साठवणूक केली असेल ती पिशवी अथवा डबी कोरड्या जागी ठेवावी.
वांग्याची जोपासना
वांगी पूर्ण पिकू द्यावीत. वांगी आधी पिवळी होऊन मग तपकिरी रंगाची होतात. कडकपणा जाऊन मऊ पडतात. पूर्ण पिकल्यावर वांगी झाडावरून काढून ४- ५ दिवस ठेवून द्यावीत. नंतर हलकेच कापून घ्यावीत. त्यात तपकिरी रंगाच्या बिया दिसतील. त्या वेगळ्या कराव्यात. एखाद्या भांड्यात घेऊन धुऊन घ्याव्यात. नंतर गाळून घेऊन कागदावर पसरून ठेवाव्यात. वाळल्यावर कागदी पाकिटात ठेवून देऊन बिया कोणत्या वाणाच्या आहेत त्याचा प्रकार आणि जमा केल्याचा दिनांक लिहून ठेवावे.
मिरचीच्या बिया
हिरव्या मिरच्या झाडावरच पिकतात आणि लाल होतात. मिरच्या वाळल्या की त्यातील बिया कागदावर काढून घ्याव्यात. बिया कागदावर घेऊन त्या पूर्ण वाळू द्याव्यात. अशा वाळलेल्या बिया पिशवीत किंवा डबीमध्ये ठेवून त्या थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
वेलवर्गीय भाज्या
वेलवर्गीय भाज्यांच्या वेलींवरच फळे पूर्ण पिकू द्यावीत. फळांना बाहेरून हलक्या हाताने छेद देऊन गर अथवा बिया काढून घेऊन घ्यावात. एखाद्या भांड्यात घेऊन बिया धुऊन घेऊन वर तरंगणाऱ्या बिया काढून टाकाव्यात. खाली राहिलेल्या बिया कागदावर वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर त्या कागदाच्या पाकिटात ठेवून वर नोंद करून ठेवावी.
तर काही वेल वर्गीय फळे वाळल्यानंतर त्यातील गरही वाळून जातो आणि आतमध्ये शिरा उरतात. अशी वाळलेली फळे हलवून पाहिल्यास आतल्या बियांचा आवाजही येतो. अशी वाळलेली फळे तशीच ठेवून दिल्यास बिया खराब होत नाहीत. लागवड करताना ही वाळलेली फळे फोडून आतल्या बिया घ्याव्यात.