प्रिया भिडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परसबाग करताना काही लोकांना केवळ जमिनीची उपलब्धता असते तर काहींना केवळ गच्ची व बाल्कनीची; पण बंगल्यात बाग करताना दोन्हींची मुबलक उपलब्धता म्हणजे दुहेरी आव्हान. ढोबळमानाने वनस्पती तीन प्रकारच्या वातावरणात स्वत:ला सामावून घेतात. १) मेसोफाईट – पाणी, जमीन व मध्यम प्रकाश, २) हायड्रोफाईट – पाणथळ जागा वा पाण्यात वाढणाऱ्या, ३) झेरोफाईट – उष्ण हवा, वाळवंटात वाढणाऱ्या, बंगल्याच्या चारी बाजूंना या प्रकारचे वातावरण, प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार असते. त्यामुळे त्या त्या जागी तशी झाडे निवडली तर अधिकाधिक जैवविविधता जपली जाते. नियोजन करताना वेगेवगळ्या हवामानातील वनस्पतींना आवडीच्या अधिवासानुसार जागा द्याव्यात. पूर्व-पश्चिमेस उन्हाची उपलब्धता भरपूर तेथे कायमस्वरुपी झाडे, ऊन आवडणारे गुलाब लावावेत. उत्तर-दक्षिणेस अयनाप्रमाणे प्रकाश कमी-जास्त होतो अशा ठिकाणी कुंड्या बदलत राहव्यात.

दर्शनी भागातील कुंपणाच्या जाळीवर विलोभनीय रंगातील बोगनवेलीचा बहरलेला वेल. दारात सुगंधी अनंत, एका बाजूच्या कुंपणाच्या भिंतीवर अर्धगोलाकार कुंड्यांमध्ये ऋतुमानानुसार फुलणारे पिटुनिया, पोर्टुलाक्का, फ्लॉक्स, व्हर्बिना, नेटेरियमसारखी रंगांची उधळण करणारी फुले, बंगल्यासमोर फरशांमध्ये हिरवळ लावून सुरेख रचना करता येते. त्यामागे मातीच्या, टेराकोटाच्या सुबक कुंड्यांमध्ये ॲन्थुरीयम, पीस लिली, फर्नस. सर्व कुंड्या एकाच पातळीवर न ठेवता वेगवेगळ्या उंचीवर त्यांची रचना तसेच वेगवेगळ्या उंचीच्या व आकाराच्या कुंड्यांमुळे झाडाचे सुरेख कोलाज तयार होते. मोठ्या झाडाच्या सावलीत थोडे ऊन मिळेल अशा ठिकाणी केलॅडियम, कोलीयस साँग ऑफ इंडिया, पेंटास लाऊ शकतो.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग: त्रयोदशगुणी विडा

मागच्या बाजूला एका कोपऱ्यात फुलांनी बहरलेला हादगा, तर दुसऱ्या वाफ्यात केळी, आळू अशी पाणी आवडणारी झाडेही लावता येतात. प्लॉटची रचना उताराची असेल तर त्याचा उपयोग करून पायऱ्यांवरही शोभिवंत पानांच्या कुंड्या ठेवता येतात. भिंतीलगत ऊनसावलीच्या, सूर्यप्रकाश झिरपणाऱ्या जागेत विविध ठिकाणांहून आणलेल्या देखण्या, नखरेल ऑर्किडसची तजबीज करता येते. तिथेच नागवेलीच्या पानांचा वेल भिंतीच्या आधाराने चांगले बस्तान बसवू शकतो.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग : सूर्यकिरणांची सुगी

कीटकांचे निसर्गातले स्थान लक्षात घेऊन मधमाशीपालन करता येते. पाना-फुलांबरोबरच पक्षी, फुलपाखरे यांना पोषक वातावरण बागेत तयार होते. पपई, शेवगा, लिंबू, तुती अशी मोठी झाडे तर विविध रंगांचे ग्लॅडेओलस, डेलियाही लावता येतात. वाळा, गवती चहा असा आजीबाईंचा बटवाही लावता येतो.

परस बागेत स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून खत निर्मितीही करता येते. आपल्यासारख्याच परसबागवेड्या मैत्रिणी जमवून परसबाग विषयक, कचराव्यवस्थापन विषयक मार्गदर्शन, विचारांचे अनुभवांचे, रोपांचे बियांचे आदान प्रदान करता येते. बागांना भेटी, व्याख्याने आयोजित केली जातात त्यात सहभागी होऊन ज्ञानात भर टाकता येते, नवीन शिकता येते. छंद जोपासण्यासाठी घरच्यांचेही सहकार्य घेता येते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace garden techniques and mantras of a blooming garden mrj
Show comments