संदीप चव्हाण
गच्ची, बाल्कनी यांच्यासह अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या बाहेर असलेला मोकळा पॅसेजही बाग सजवण्यासाठी छान वापरता येतो किंवा घरातील एखादा रिकामा कोपराही. अशा जागेवर कुणी तुळशी वृंदावनाची सोय करतात. सूर्यप्रकाश, खेळती हवा असल्यास येथेही कल्पकतेने मांडण्यात अडचण होणार नाही अशी लोखंडी पायरीची मांडणी किंवा कोपऱ्यात १८ इंच उंचीचे सलग कप्पे करून कोपरा व्यापणारी किंवा त्रिकोणी जागा व्यापणारी लोखंडी मांडणी तयार करता येते.
जागेच्या उपलब्धतेनुसार अगदी मातीच्या गडूपासून तर तांब्याच्या आकाराच्या कुंड्या व आयताकृती कुंड्यांमध्येही बाग फुलवता येते. कुंड्या अगदी लहान असल्यास विविध मांसल स्वरूपाचे कॅकटस, सीझनल, छोट्या फुलांची लागवड करता येते. कुंड्या कितीही छोट्या असल्या तरी त्यात झाड जगते. योग्य आहार, पाणी दिल्यास फुलेही छान फुलतात. येथेही हँगिंग होणाऱ्या कुंड्यांचा विचार करू शकता. त्यासाठी कमीत कमी आकाराच्या, वजन झेपेल एवढी माती भरती येईल अशा गोलाकार कुंड्यांचा विचार करावा. हँगिंग कुंड्यांसाठी मजबूत हूकसारख्या खिळ्यांचा वापर करावा. निसर्ग खूप प्रतिकूल परिस्थितीत किंवा कमीत कमी उपलब्धतेत संपन्नरीत्या फुलत असतो.
बूट आणि बाटल्यांचा वापर
पायात घालायचे बूट वापरून कंटाळा आला की आपण ते फेकून देतो तसेच लहान मुलांचे बूट, हे वाढत्या वयाबरोबर पायात होत नाहीत. असे बूट रंगीत व आकर्षक असतात. त्यांचा वापर आपण रोपे लावण्यासाठी करू शकतो. गमबूटमध्येही झाडे लावू शकतो. त्यांच्यातही सीझनल फुले छान दिसतात. सीझनल फुले ही कमी जागेत भरभरून येतात. तसेच वाढदिवस, मुलांची पार्टी अशा कार्यक्रमप्रसंगी अशा प्रकारच्या वस्तूंतील बाग ही कार्यक्रमाची शोभा वाढवतात. शीतपेयांच्या किंवा पाण्याच्या बाटल्यांचाही वापर आपण झाडं लावण्यासाठी करू शकतो. बरेचदा त्याला पुनर्विक्रीचे मूल्य शून्य असते किंवा नसतेच. अशा बाटल्या गरज संपली की रस्त्यावर फेकलेल्या दिसतात. हॉटेलमध्ये त्या पोत्याने मिळतात. साधारण बागेसाठी अडीच लिटरची शीतपेयांची, रंगीत, टणक प्लॅस्टिकची बाटली उत्तम. पर्याय नसेल तर अगदी एक लिटरची बाटली चालते.
या बाटलीचा बुडाखालील भाग कापून घ्यावा व त्यास उलटी करून त्यात झाडे लावावीत. सीझनल फुलं, तुळस, पुदिना, पालक, लेट्यूस अशा पालेभाज्या तसेच मिरचीसुद्धा चांगली जगतात. या बाटल्यांना एका तारेच्या जाळीवर एकाखाली एक याप्रमाणे बांधल्यास त्याची छान हिरव्या रंगाची बॅकग्राऊंड स्क्रीन तयार होते. तसेच बागेत उपलब्ध जागेत एकेकट्याही बांधल्या किंवा बाटल्या एका लोखंडाच्या सळईमध्ये किंवा प्लास्टिक पाइपच्या नळीतही एकावर एक अशा योग्य अंतराने रचता येतात. कमी जागेत अधिकाधिक वापर करता येतो. तसेच टेरेसची किंवा बागेची शोभा वाढते. हा प्रकार शहरातील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम आहे. विंडो किंवा गॅलरीतील जाळीवर या बाटल्या टांगता येतात. तसेच या बाटल्या आडव्या करून आवश्यक तेवढा भाग कापून घेतल्यास आडव्या बाटल्यांचेही हँगिंग स्वरूपातील व्हर्टकिल मांडणी करून तयार केलेली हिरवीगार स्क्रीन छान दिसते. बाटलीच्या तोंडाला असलेले झाकणाऐवजी टाकाऊ स्पंजचा तुकडा टाकल्यास उत्तम म्हणजे बाटलीतून माती वाहून जात नाही.