भाज्यांची लागवड करताना काही भाज्या या बियाणे पेरल्यावर त्याची पुनर्लागवड करावी लागत नाही. मात्र, मिरची, वांगे, टोमॅटो, फ्लावर, कोबी यांची पुनर्लागवड करावी लागते. या भाज्यांची बियाणे मातीत पेरल्यानंतर, रोपे साधारण एक बोटाएवढे उंच झाल्यावर त्यांची दुसऱ्या जागेवर पुनर्लागवड करावी लागते. तसेच पालेभाज्या, फळभाज्या यांच्या लागवडीसाठी दोन रोपांमधील अंतर महत्त्वाचे ठरते. अन्यथा नैसर्गिक घटक पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने रोपांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही.
कंदमुळे : मूळा, बिट यासारखी कंदवर्गीय बियाणे ही चार ते सहा इंचाच्या अंतरावर लागवड करावीत. एका चौरस फुटाला चार बियाणांची लागवड करावी. यात शक्यतो एक- एक बियाणे टाकावे. म्हणजे कंदमुळांना वाढीस वाव मिळतो. गाजर हे जमिनीवर विखरून टाकावे. त्यास मातीमधे मिक्स करावे. काही रोपे दाटीवाटीने आल्यास त्यांना विरळ करून घ्यावे. जमल्यास दुसरीकडेही त्यांची लागवड करता येते.
बटाटे : छोटे आकारातील बटाट्यांची निवड करावी. शक्यतो ज्यास डोळे आले आहेत असे निवडावेत. अखंड लावावेत. किंवा मोठ्या आकारातील असल्यास त्याचे चार भाग काप करावेत. कापलेला भाग जमिनीत एक इंच खोल गाडावा.
हेही वाचा… गच्चीवरची बाग : भाज्या कधी येतात?
कांदापात : कांद्याची पात मिळवण्यासाठी पात आलेले जुनाट कांदे लागवड करू शकता. मध्यम आकाराचे किंवा मुठीत बसेल एवढ्या आकाराचे कांदेही लागवड करता येतात. शक्यतो छोटे कांदे लावणे टाळावे. कांद्याचे मूळ हे जमिनीकडे असावे. कांद्यावर एक- दोन इंच माती येईल या स्वरूपात तो मातीत लागवड करावा.
लसूणपात : लसणाची पात घरच्या घरी पिकवता येते. अखंड लसणाच्या एक-एक पाकळी मोकळी करावी. त्याचे मूळ हे जमिनीकडे ठेवूनच त्यास मातीत एक इंच टोकावे. शेंडा वरील बाजूस राहील याची काळजी घ्यावी.
झुडूप वर्गीय पालेभाज्या : करडई, आंबाडी ही २-३ फुटांपर्यंत वाढणारी भाजी आहे. याची लागवडही एका चौरस फुटाला चार बियाणेच लावावेत. शक्य झाल्यास एक-एक बियाणे लावल्यास झाडांची योग्य वाढ होवून त्यातून भरपूर पालेभाजी मिळते.
मोहरी : मोहरी ही पालेभाजी आहे. एका चौरस फुटाला चार ठिकाणी एक एक बियाणे मातीवर टाकावे. अथवा त्यास परसरून द्यावे.
हेही वाचा… गच्चीवरची बाग : इतर कौशल्यांची गरज
फळ व फूल भाज्या : मिरची, वांगे, टोमॅटो, फ्लावर, कोबी यांची बियाणे मातीत पेरावीत, रोपे साधारण एक बोटाएवढे उंच झाल्यावर त्यांची दुसऱ्या जागेवर पुनर्लागवड करावी. यांची लागवड ही एका चौरस फुटाला एक एक रोप मध्यभागी लागवड करावी. त्याच्या आजूबाजूला पालेभाजींच्या बियाणांची लागवड करता येते.
भेंडी व गवार : हे फळवर्गीय भाज्या आहेत. यांच्या एक एक बियाणे हे एका चौरस फुटाला चार बाजूला चार व मध्यभागी एक अशा पाच बियाणांची लागवड करावी.
sandeepkchavan79@gmail.com