संदीप चव्हाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मातीबरोबर कुठल्या नैसर्गिक बाबींचा वापर आपण गच्चीवर बाग फुलवण्यासाठी करू शकतो, याविषयी आपण माहिती घेत आहोत. नारळाच्या शेंड्यांप्रमाणेच उसाचे चिपाड हेही नैसर्गिकपणे उत्तम बाग फुलवण्याचे साधन ठरू शकते. रसवंतीगृहाबाहेर मुबलक प्रमाणात उसाचे चिपाड आढळून येते. मात्र उसाचे चिपाड हे वाळलेल्या स्वरूपातच वापरावे. ओले वापरू नये. त्यात अळ्या तयार होण्याचा संभव असतो. सुकलेले उसाचे चिपाड हे दीर्घकाळ टिकते. छोट्या कुंड्यांमध्ये वापरावयाचे असल्याने त्याचे बारीक काप किंवा भुगा तयार करून घ्यावा. वाळलेल्या चिपाडाचा हातानेही भुगा होतो.

आणखी वाचा : आहारवेद : कॉफी घ्या, पण क्वचितच!

उसाच्या चिपाडाचा भुगा वा छोटे तुकडे हे कुंडी किंवा वाफ्यात तळाकडून दुसरा थरांत वापरावे. यात स्फुरद (पिकांना लागणाऱ्या महत्त्वाच्या पोषक द्रव्यांपैकी एक महत्त्वाचे मूलद्रव्य) व साखरेचे प्रमाण असल्यामुळे त्याचे उत्तम खत तयार होते. तसेच कुजलेले चिपाड हे गांडुळांचे आवडते खाद्य असल्याने, कुंडीत किंवा वाफ्यात ४ ते ६ महिन्यांत प्रक्रिया होवून खत तयार होते. खत तयार होता होताच कुंडीत झाडांची मुळे त्याच गतीने त्याचे विघटन करतात. यात झाडांच्या पांढऱ्या मुळ्या अधिक संख्येने व झपाट्याने वाढतात. पांढऱ्या मुळांची संख्या जेवढी जास्त तेवढे झाड फळधारणा करते.

आणखी वाचा : नातेसंबंध: नवऱ्याने तुमचं ऐकायला हवंय?

उसाची ओली चिपाडे घेतल्यास त्याला मुंग्या लागतात. पण सुकवून घेतल्यावर त्यातली साखर ही घनपदार्थात रूपांतरित होते. त्यामुळे मुंग्या फिरकत नाहीत. उसाच्या चिपाडाप्रमाणे वाळलेल्या काड्या/फांद्या यांचाही वापर आपल्याला कुंडीत माती भरताना करता येईल. कुंडी किंवा वाफा भरताना त्यात १ सेंमीपेक्षा कमीजाडीच्या काड्या, सुकलेल्या फांद्या यांचा तळाकडून तिसरा थर द्यावा. काड्या या कुंडी किंवा वाफ्यात पुरेशी जागा तयार करतात. त्यात हवा खेळती राहते. पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीस हवेचा उपयोग होतो. ज्या काही काड्या वापरणार त्याचे बारीक तुकडे करून घेतल्यास उत्तम किंवा आहे तशाही वापरता येतात. यात कार्बनचे प्रमाण तयार होते. तसेच काही प्रमाणात ओलावा टिकवून ठेवतात. तुळस, गाजर गवत, बाजरी, मका, गहू यांची वाळलेली गवते, छोटी झुडुपे किंवा फांद्या यांचा काड्या म्हणून वापर करता येतो. याचेही प्रक्रियेत खत तयार होते व ते बागेतील झाडांना उपयुक्त ठरते.
sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace garden used sugarcane and dried waste can be used as fertilizers vp