डॉ. नागेश टेकाळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घराचे घरपण जसे घरात राहणाऱ्या माणसावर अवलंबून असते तसेच ते आंतरबाह्य सजावटीशीसुद्धा जोडलेले असते. स्वतंत्र घर अथवा बंगला असेल तर बाह्य सजावटीमध्ये सभोवतीच्या हिरवाईस जास्त महत्त्व असते; मात्र गृहसंकुलात राहणाऱ्या सदनिकाधारकास जागेअभावी यापासून वंचित राहावे लागते. मालकास बागेची आवड असल्यास ती बाल्कनीमधील मोजक्या कुंड्यांपर्यंतच मर्यादित राहते. सगळ्यांनाच गृहसंकुलात बागेचा आनंद घेणेही कठीण जाते. मग यावर काही उपाय? नक्कीच आहे. उद्यानशास्त्रात गेली ४-५ वर्षे चर्चेत असलेला विषय म्हणजे भिंतीवरील उद्यान म्हणजे उभी बाग.
आपण विविध प्रकारची उद्याने, बागा यांची निर्मिती मोकळ्या जागेवर म्हणजेच जमिनीवर पाहतो. ही बागसुद्धा तशीच आहे. मात्र तिची निर्मिती उभ्या भिंतीवर आकर्षकरीत्या केली जाते. अर्थात ती मर्यादित जागेमध्येच असते आणि या बागेत फक्त लहान, आकर्षक पानांच्या आणि सावलीत वाढणाऱ्या वनस्पतीच वापरल्या जातात. या बागेच्या निर्मितीमध्ये विशेष प्रकारचा स्पंज वापरला जातो. या स्पंजच्या सँडविचमध्ये मनीप्लँटसारख्या झाडाचे छोटे रोप मुळासह ठेवले जाते. झाडाची मुळे स्पंजमधून पाणी आणि आवश्यक मूलद्रव्ये शोषून घेतात. स्पंजला आकर्षक व्हेल्वेट अथवा विशिष्ट कपड्याच्या आवरणामध्ये गुंडाळून त्यांचा बटवा केला जातो. हा बटवा प्लास्टिकच्या कप्प्यामध्ये उभा बसवतात. असे अनेक कप्पे उभे, आडवे, एकावर एक पद्धतीने रचून भिंतीसारखी सुंदर प्रतिकृती तयार केली जाते. यामध्ये वनस्पतींची संख्या दाट असल्यामुळे प्लास्टिकचे कप्पे दिसतच नाहीत. दुरून पाहिले की वाटते, एक सुंदर हिरवा नक्षीदार गालिचा आपल्यासमोर उभा आहे. या बागेस घराच्या भिंतीवर टांगून छान बसवता येते अथवा भिंतीस खेटून दर्शनी भागात आकर्षक पद्धतीने स्टँडच्या साहाय्याने उभीसुद्धा करता येते. म्हणूनच यास म्हणतात उभी बाग, म्हणजेच vertical garden अथवा Green wall या बागेसाठी पाणी आणि मूलद्रव्ये ही फवारा पद्धतीने दिली जातात.
हेही वाचा >>>गच्चीवरची बाग : अंगणी तुळस डेरेदार
माती कुठेही नसते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे भिंतीवर कसले डागही पडत नाहीत. या बागेत एकाच प्रकारच्या अथवा विविध वनस्पती लावता येतात. वेगवेगळ्या रंगसंगती असलेल्या वनस्पतींच्या पानांपासून छान नक्षीकामसुद्धा करता येते. ही बाग दहा फुटांपासून ते २००-३०० फूट उंचीपर्यंत सहज नेता येते. या बागेत फुले येणाऱ्या वनस्पती लावल्या जात नाहीत, तसेच केरकचरासुद्धा होत नाही. एखादे झाड खराब झाल्यास तो बटवा काढून तेथे दुसरा बसवता येतो. बाग स्टँडवर उभी असल्यास एका ठिकाणापासून दुसरीकडे सहज हलवता येते. भिंतीवरील ही बाग आकर्षक आणि प्राणवायूचे निर्मिती केंद्र असल्यामुळे तिच्या सहवासात वातावरण नेहमीच प्रसन्न आणि उत्साहवर्धक राहते. साध्या बागेबरोबर तुलना करताना ही बाग म्हणजे जरा महागडे प्रकरण आहे. म्हणूनच सध्या तरी तिचे अस्तित्व पंचतारांकित हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय कंपन्याची कार्यालये, विमानतळ, मोठमोठे मॉल्स अशाच ठिकाणी पाहावयास मिळते. मात्र असे असले तरी सदनिकाधारकाससुद्धा तिला आपल्या घराच्या भिंतीवर विराजमान करण्यामध्ये कसलीही अडचण येऊ नये. या बागेसाठी आवश्यक असलेले प्लॅस्टिकचे कप्पे, त्यात ठेवण्याची झाडे, त्यांचे तयार बटवे ठरावीक रोपवाटिकेमध्ये आज सहज उपलब्ध आहेत. पूर्वी प्लास्टिक अथवा ज्यूटच्या पत्रपेटिका घरोघरी भिंतीवर टांगलेल्या दिसत, मात्र गेल्या दशकात संगणक आणि ईमेलचा वापर वाढल्यामुळे पोस्टमनबरोबर त्यासुद्धा अदृश्य झाल्या.
हेही वाचा >>>आहारवेद : विपुल प्रथिने असणारी तूर
या सर्व पत्रपेटिकांना हिरवाईच्या रूपात पुन्हा भिंतीवर विराजमान करण्यासाठी ही बाग आपणास मदत करू शकते. पत्रपेटीसारख्या तीनचार कप्प्यांच्या छान बागा आता विकतसुद्धा मिळतात. मोठमोठी उभी उद्याने ठरावीक अंतरावर उभे राहूनच पाहावयाची असतात. पाठीमागे प्रकाश टाकल्यावर त्यांचे सौंदर्य विलोभनीय असते. पंचतारांकित हॉटेलचा दर्शनी भाग अथवा आलिशान कार्यालयातील स्वागत कक्षास खेटून त्यासुद्धा स्वागतिकेचेच काम करत असतात. परदेशात हौशी घरमालकांच्या बंगल्याच्या आत प्रवेश करताना मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंस उभ्या असलेल्या या बागा हरित भालदार-चोपदारच वाटतात. असाच काहीसा ट्रेंड आता आपल्याकडेसुद्धा येत आहे. सुदृढ पर्यावरणाची सुरुवात ही नेहमी आपल्या सदनिकेपासूनच सुरू होते आणि त्यातील एक लहानसा टप्पा म्हणजे भिंतीवरील हे छोटे उद्यान. निसर्गचित्रापेक्षा निसर्गाचे हे खरे रूप आपल्या समोरच्या भिंतीवर पाहताना तुम्हास एक वेगळाच आनंद मिळेल हे निश्चित.
nstekale@rediffmail.com