हिरवे मूग पाणी पिऊन टम्म फुगले होते अन् नाजूक साल बाजूला करून पांढरेशुभ्र कोंब डोकावत होते. रुजण्यासाठी जीवन अंकुरले होते. पाणी असेल तर जीवन असेल, पाणी असेल तर हिरवाई असेल, पाणी असेल तरच झाडाचं रुजणं, फुलणं आणि बहरणं असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपली बाग छोटी असो वा मोठी, बागेत पाच कुंड्या असोत वा पाचशे, शोभेची झाडं असोत वा भाजीपाला, वेली असोत वा वृक्ष, त्यांच्यासाठी पाणी हवेच आणि त्याचे नियोजनही हवे. प्रत्येक झाडाची पाण्याची गरज वेगळी असते. झाडाचा वाढीचा टप्पा, वाढीचा वेग, त्याचे आयुष्य या गोष्टींचा विचार पाण्याचे नियोजन करताना करावे लागते. वेगवेगळे ऋतू, हवेतील आर्द्रता, सूर्यप्रकाश अशा अनेक बाबींमुळे झाडांची पाण्याची गरज बदलत असते. मातीचा प्रकार, मातीचा पोत, त्यामधील ह्यूमस यामुळेही पाण्याची गरज बदलते हे ध्यानात ठेवायला हवे. सेंद्रिय मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते व त्यामुळे पाण्याची गरज कमी होते. सर्वसाधारणपणे कुंड्यांना पाणी देताना छोटे भांडे, छोट्या बादलीने पाणी दिले जाते. पण पेरलेल्या बिया छोटी रोपं, नाजूक फुलझाडांना झारीने पाणी द्यावे. त्यामुळे रोपांना इजा होत नाही. शोभेच्या झाडांना झारीने पाणी दिल्यास पाने, फुले स्वच्छ आणि टवटवीत होतात.

हेही वाचा… गच्चीवरची बाग- करू बीज संकलन अन् निसर्ग संवर्धन!

मोठी बाग व जास्त झाडे असतील तर प्लास्टिक पाईपने पाणी दिले जाते. या पाईपच्या टोकाला झारीसारखी तोटी बसवावी. ज्यामुळे पाण्याच्या जोराने माती वाहून जाणार नाही व मुळे उघडी पडणार नाहीत. बऱ्याच वेळेला पाइपचे पाणी वाफ्यात चालू ठेवून इतर कामे केली जातात. यामुळे मातीत नको इतके पाणी मुरते, माती संपृक्त होते. पाणी वाहून जाते अन् त्या पाण्याबरोबर वाहून जातात मातीतील पोषक द्रव्ये. पाणी तर वाया जातेच, पण पोषक द्रव्येही जातात. बागेत पाणी घालताना मातीत नळ कधीही सोडून ठेवू नये. जास्त पाणी घातल्याने माती घट्ट होऊन मुळांना हवा मिळत नाही, ती कुजतात, झाडे मरतात. बागेस पाणी देताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी बोअरवेलचे की पिण्याचे. पिण्याचे फिल्टर केलेले पाणी बागेसाठी वापरत असाल तर थेंबाथेंबाचा विचार करा. पाणी कुठलेही असले तरी प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. म्हणून मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल यासाठी उपाययोजना कराव्यात. कुंड्यांमध्ये, आळ्यांमध्ये, वाफ्यांमध्ये पाचोळ्याचा थर द्या. मातीत कोकोपिथ मिसळा. कुंड्यांमध्ये बारीक चिंध्या, ज्यूटच्या पोत्याचे बारीक तुकडे, जुन्या नॅपकीनचे बारीक तुकडे घालावेत. ज्यामुळे मातीत पाणी धरून ठेवले जाईल. मातीतील जीवजंतूंना व गांडुळांना हा ओलावा आवडतो.

कुंडीत पाणी घालताना पाणी वाहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जमीन तापून कुंडीच्या मातीतील बाष्पीभवन जास्त होते. त्यासाठी कुंडी व जमीन याच्यामध्ये पाचोळ्याचा थर द्यावा. चुकून जास्त पाणी घातले गेल्यास पाचोळा पाणी शोषून घेईल व गांडुळांना घर मिळेल. पाण्याची बचत करण्यासाठी असे छोटे बदल, प्रयोग उपयुक्त ठरतात. मोठ्या बागा व जास्त कुंड्या असतील तर पाणी घालण्यासाठी ठिबक सिंचनाचा विचार करावा. इस्रायलचा इंजिनीअर सिमचा ब्लास हा ठिबक सिंचनाचा जनक. पाणी व्यवस्थापन हा त्याचा हातखंडा होता. एका शेतकऱ्याने त्याच्या परसातले मोठे झाड पाणी न घालता वाढत असल्याचे ब्लास यांना दाखवले आणि त्यांचे कुतूहल जागे झाले. झाडाच्या आजूबाजूचा भाग खोदल्यावर दिसला एका पाण्याच्या पाइपमधून ठिबकणारा थेंब जो झाडाच्या मुळास ओलावा देत होता. प्रयोगशील व उद्यमशील ब्लास यांनी शेतात प्लास्टिक पाइप फिरवून मुळाशी पाण्याचा थेंब पडेल अशी पद्धत विकसित केली, अनेक प्रयोग केले अन् १९६० च्या सुमारास पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात क्रांती झाली.

हेही वाचा… नातेसंबंध: नवरा फारच ‘बोअरिंग’ आहे?

इस्रायलमध्ये ठिबक सिंचन सुरू झाले. शेतात प्लॅस्टिक पाइपद्वारे ठिंबक सिंचन करतात तसे आपणही वाफ्यांमध्ये, कुंड्यांमध्ये करू शकतो. छोटे झाड असेल तर एक ड्रीपर पुरतो. मोठ्यास तीन-चार ड्रीपर लागतात. ठिबक सिंचनाचे प्लंबिंग तज्ज्ञांकडून करावे. कारण मुख्य अर्धा इंच पाइपमधून ड्रीपलाइनकडे पाणी येताना फिल्टर बसवावा लागतो. ठिबक सिंचनात छोटे-मोठे स्प्रिंकलर, जमिनीत रोवता येणारे व झाडावर लटकवता येणारे असेही स्प्रिंकलर असतात जे छोट्या रोपांसाठी, हिरवळीसाठी उपयोगी पडतात. बोअरचे पाणी असेल तरच हिरवळ लावण्याचा विचार करा. पिण्याचे पाणी वापरून हिरवळ लावू नका. ठिबक सिंचन करण्यासाठी थोडा खर्च आला तरी तो करा, त्यास टायमर बसवला तर ठरावीक वेळेत, ठरावीक पाणी झाडांना मिळते, झाडे खूश होतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace garden watering the life of trees water does not overflow while adding water to the plants dvr