संदीप चव्हाण
शिजलेले उरलेले वा खरकटे अन्न आपणाला अनेकदा फेकून द्यावे लागते. ते फेकून न देता त्याचा उपयोग खत म्हणूनही करता येतो. शिजलेले खरकटे अन्न उन्हात वाळवून घेतल्यास त्याचे केक किंवा पापडासारखे खडे तयार होतात. ते चुरून झाडांना देता येतात. तसेच शिजलेल्या खरकट्या अन्नाचे वेगळ्या पद्धतीनेही व्यवस्थापन करता येते. त्यासाठी पुढील पद्धती वापरता येतील.
माठाचा वापर
आपल्याकडे एक मोठे तोंड असलेला माठ असल्यास त्याच्या तळाशी एक भोक करावे. त्यात सुक्या मातीचा, पालापाचोळ्याचा एक थर द्यावा. त्यानंतर त्यात खरकटे अन्न टाकावे. त्यावर पुन्हा मातीचा, पालापाचोळ्याचा थर द्यावा. असे थर देत देत महिनाभरात माठ गच्च भरतो. तो उन्हात रिकामा करावा त्यास सुकवून घ्यावे. सुकवणे शक्य नसल्यास दोन किंवा तीन माठांत प्रक्रिया करावी. साधारण ४५-६० दिवसांत छान खत तयार होते. यात पातळ पदार्थ टाकू नयेत.
हेही वाचा >>>गच्चीवरची बाग: प्राणिजन्य उत्पादित खते
प्लॅस्टिक बॅगचा वापर
आपल्याकडे ब्रँडेड होजिअरी मटेरिअल ज्या पिशवीत पॅक करून येते तिचाही शिजलेले खरकटे अन्नाचे खत तयार करण्यासाठी उपयोग करता येतो. अशा पिशव्या उपलब्ध नसतील तर हवाबंद तेलाच्या जाडसर पिशव्यांतही खत तयार करता येते. यासाठी पिशवीच्या आकारापेक्षा थोडे कमी खरकटे अन्न घेऊन त्यास दोरीने हवाबंद ठेवावे. त्यात ३ ते ४ महिन्यांत छान खत तयार होते. यात हवा जाऊ देऊ नये. हवेच्या संपर्कात आल्यास त्यात अळ्या तयार होतात. नाजूक पिशवीला कीटक छिद्रं तयार करतात. त्यामुळे एकामध्ये एक याप्रमाणे दोन पिशव्या वापरूनही असे खत तयार करता येते.
इतर वरखते
बाजारात कंरजपेंड, शेंगदाणा पेंड, खोबरे पेंड मिळते. निंबोळी पेंडीसोबत मिश्रण तयार करून झाडांसाठी वापरता येते. बरेचदा दुभत्या जनावरांना खाण्यासाठी विविध पेंडी मिळतात. पण ती त्यांच्या खाण्यायोग्य नसेल तरच वरील पेंडी निंबोळी पेंडीसोबत सम प्रमाणात एकत्र करून त्याचा वापर करावा.
हेही वाचा >>>गच्चीवरची बाग: घरी तयार होणारी संजीवके
लाकडांची, गोवऱ्याची राख ही सुद्धा झाडांना उपयुक्त असते. ती आठवड्यातून एकदा या प्रमाणे चमचाभर झाडांना द्यावी. तत्पूर्वी ही राख चाळणीने बारीक चाळून घ्यावी. चाळलेली ही राख दीर्घकाळ साठवता येते.
आपल्या घरात दररोजच चहा तयार होतो. हा चहा गाळल्यानंतर उरणारी भुकटी वाळवून घ्यावी. वाळलेल्या चहाची भुकटी झाडाला आठवडय़ातून एकदा चमचाभर द्यावी.
चहाची वाळलेली भुकटी ही गुलाबांच्या झाडांना फार उपयुक्त असते. त्यामुळे गुलाबांच्या रोपांची वाढ चांगली होते. साखर युक्त चहाचा चोथा पाण्यात मिसळून ते पाणी गाळून घेऊन आपण झाडांना वापरु शकतो. उरलेला चोथा वेगळा वापरता येतो. अशा द्रावणाला अथवा वाळलेल्या भुकटीस नंतर मुंग्या लागत नाही.
sandeepkchavan79@gmail.com