डॉ. नागेश टेकाळे
‘जडे प्लॅन्ट’ हा क्रॅस्युलाचा सर्वात लोकप्रिय प्रकार. ही जात आपल्या घरात लावली आणि दुसऱ्यांना भेट म्हणून दिली तर मालकाचं सर्व ‘शुभ’ होतं असा समज होता म्हणून या प्रकाराला पूर्वी पुष्कळ मागणी होती. खरं तर हा प्रकार सहसा मरत नाही, शिवाय याचं खोड जाड पण लवचिक असल्यामुळे ‘बोनसाय’ करण्यासाठी ‘जडे प्लॅन्ट’ प्रकार जास्त वापरतात. याचे खोड जाडजूड असून, त्यावर असलेल्या गोलाकार रेघांची मांडणी हत्तीच्या कातडीची आठवण करून देते. त्यामुळे झाडाचे खोड ‘अकाली वृद्ध’ झाल्यासारखे वाटते. पण फांद्यांचे शेंडे खुडले तर झुडुपासारखा आकार येतो. खोड लोंबत वाढत असल्यामुळे आणि त्यावरच्या हिरव्यागार, जाड, रसरशीत पानांमुळे कुंडीतून हिरवा धबधबा वाहत असल्याचा भास होतो. म्हणून याची कुंडी हॉलमध्ये थोड्या उंचीवर ठेवली तर झाड पूर्ण वाढलं की त्याचं सौंदर्य वेगळेच दिसते. कुंडी झाडाने पूर्ण भरून गेली, तर दुसऱ्या मोठ्या कुंडीत झाड लावावे. त्याआधी झाडाला पाणी अजिबात घालू नये. कुंडीतली माती पूर्ण कोरडी झाली की कुंडी उलटी करून झाड अलगद काढून घ्यावे. मुळाभोवतालची माती पूर्णपणे काढून टाकावी.
नवीन कुंडीत थोडी माती, भरपूर जाड व बारीक वाढू किंवा छोटे दगड टाकून त्यात हे झाड लावावे. झाडाची मूळं कुजली असतील तर ती काढून टाकावीत आणि त्या जागी थोडे ‘फंजीसाईड’ लावावे म्हणजे झाडावर रोग, बुरशी येणार नाही. नवीन कुंडीत झाड लावल्यावर त्याला एक आठवडा पाणी घालू नये. नंतर अगदी थोडे थोडे पाणी एक दिवसाआड घालावे. म्हणजे मूळं कुजणारं नाहीत. जास्त पाणी झाल्यास झाड मरते.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग : बेबी नेकलेस
‘मॉर्गन्स ब्युटी’ ही क्रॅस्युलाची संकरित जात अलीकडच्या काळात जास्त लोकप्रिय झाली आहे. खोडावर निळसर छटा असलेल्या रसरशीत पानांची रचना अर्ध्या पॅगोडावर कोरीव नक्षीकाम केल्यासारखी दिसल्यामुळे क्रॅस्युलाचा हा प्रकार हॉलची शोभा नक्कीच वाढवेल यात शंकाच नाही. हा प्रकार वाढवताना कुंडीत जाड वाळू आणि छोटे-छोटे टाकल्यास झाड चांगले वाढते. भरपूर वारं असलं तरी झाडाची वाढ जोमाने होते. पानं तपकिरी किंवा पांढरी पडली किंवा अती मऊ झाली तर झाडाला जास्त पाणी दिले गेले आहे, असे समजावे. अशा वेळेस, कुंडीतली माती पूर्ण वाळल्याशिवाय पाणी घालू नये. पाणी खूप कमी पडले तर झाडाची वाढ थांबते, पानं गळून पडतात किंवा पानांवर तपकिरी डाग पडतात.
याशिवाय ‘जडे प्लॅन्ट’चे ‘चायनीज’ म्हणजे ‘सिल्व्हर जडे’सारखे काही प्रकार, वॉच-चेन क्रॅस्युला, स्कारलेट पेंट ब्रश क्रॅस्युला असे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग : औषधी वनस्पती
क्रॅस्युलाच्या सगळ्याच प्रकारांना पाणी अतिशय कमी लागतं. द्रव खतंसुद्धा महिन्यातून एकदा एक चमचा कुंडीत घातलं तरी झाडाच्या वाढीसाठी पुरेसं होतं. पानाचा देठाकडचा थोडा भाग कापून कुंडीत लावला तरी त्याला फूट येते, शिवाय झाडाचा शेंडा खुडला तरी त्यापासून नवीन झाड येते. फारशी काळजी घ्यावी लागत नसूनसुद्धा क्रॅस्युलाच्या पानांच्या आकारामुळे आणि खोडाकडच्या रचनेमुळे क्रॅस्युलाचे प्रकार हॉलची शोभा वाढवतील आणि घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करतील.