डॉ. नागेश टेकाळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॉल किंवा दिवाणखाना, बैठकीची खोली विविध रंगांनी सुशोभित करण्यासाठी कुंडीत क्रोटन्स आणि कोलियसचे अनेक प्रकार लावता येतात. ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ची पानं काळपट हिरवी असतात, पण क्रोटन्स आणि कोलियसची पानात कॅरोटीन, फ्लॅबेनॉइड्स असल्यामुळे त्यांच्या पानांच्या रंगात खूप विविधता दिसते. या विविधतेमुळेच हॉल एकदम भरल्यासारखा दिसतो. हॉलच्या भिंतीचा रंग फिकट असेल तर क्रोटन्स, कोलियसच्या कुंड्या ठेवाव्यात.

क्रोटन्सच्या अनेक जाती आहेत, प्रत्येक जातीचा रंग वेगळा असतो. एक-दोन रंगांचे किंवा मिश्र रंगाचे क्रोटन्स कुंडीत लावून घरात ठेवले तर घराची शोभा वाढते. क्रोटन्सला ‘कोडियम’ असंही म्हणतात. याचे असंख्य प्रकार आहेत. पण ‘कोडियम व्हेरिगॅटम पिक्टम्’ या मूळच्या प्रकारातून अनेक उपजाती तयार केल्या गेल्या. या प्रकारात पानांचे विविध आकार पाहायला मिळतात. गवताच्या पातीसारख्या अरूंद पानांपासून ते भिंगाच्या आकाराचे, भाल्यासारखे, त्रिशुळासारखी पानं असलेल्या प्रकारामुळे आपल्या घरात, हॉलमध्ये असलेल्या जागेसाठी कोणत्या पद्धतीचे क्रोटन्स लावता येतील हे ठरवायला खूपच वाव आहे. ‘ॲक्युबिफोलियम’ या प्रकारात पानं उभट, लांबट आणि चकचकीत असतात तर पानांचा रंग भडक हिरवा-पोपटी असून, त्यावर लहान-मोठ्या आकाराचे पिवळे ठिपके असतात. हॉलमधला पडदा मोतिया रंगाचा असेल तर कोडियमचा हा प्रकार लावला तर सकाळच्या प्रकाशात याचं सौंदर्य वेगळंच दिसतं.

आणखी वाचा- गच्चीवरची बाग: जडे प्लॅन्ट

दुसऱ्या प्रकारात पानांचा रंग प्रथम ब्रॉन्झच्या रंगासारखा दिसतो आणि नंतर गडद तांबडा होतो, त्यावरच्या रेषा गडद पिवळ्या असल्यामुळे या प्रकाराची निवड करताना हॉलच्या रंगाबरोबर हॉलमधलं फर्निचर, पडद्यांचा रंग यांचा विचार करावा. ‘क्रॅगी’ या प्रकारातली पानं त्रिशूळाच्या आकाराची असल्यामुळे याची ‘इनडोअर प्लॅन्ट’ म्हणून निवड करताना हॉलमधल्या रचनेचा प्रथम विचार करावा लागेल. याची पानं भडक हिरवी असून, त्यावर गडद पिवळ्या रंगाच्या शिरा असतात. क्रोटन्सच्या एका जातीतल्या पानांचा हिरवा, तांबडा, भगवा असल्यामुळे ही जात जास्त लोकप्रिय आहे. ही जात अगदी मोहात पाडणारी असल्यामुळे या जातीत ‘फॅस्सीनेशन’ असं नाव दिलंय! तर ‘ग्लोरिओसम सुपरबम’ या जातीत पानं थोडी रूंद. आणि पानांच्या कडा नागमोडी असतात, पानांची टोकं अणकुचीदार होतात. या जातीचं खरं सौंदर्य पानांच्या रंगात आहे. कोवळी पानं हिरवी तर पानांच्या शिरा आणि काठ गडद पिवळ्या रंगाचे असतात. पानांची पूर्ण वाढ झाली की त्यांचा रंग सोनेरी-नारिंगी होतो. ‘इम्पेरिॲलीस’ या प्रकारात पानं पिवळ्या रंगाची, त्यांच्या कडा गुलबट-तांबड्या आणि मध्यभागातली शीर हिरवी असते. एकाच पानात दोन-तीन गडद रंग असल्यामुळे हॉलच्या भिंतीचा रंग कोणता आहे हे बघूनच ही जात कुठे, कशी लावायची हे ठरवायला लागेल. ‘पंक्टॅटम्’ या प्रकारात पानं लांबट, चकाकणारी असून, हिरव्या रंगावर पिवळे ठिपके सुंदर दिसतात. ‘रिडिया’ या प्रकारात पानं लांबट आणि प्रथम हिरव्या रंगाची असतात. झाड वाढायला लागले की तो रंग बदलून पिवळा, सोनेरी, गुलबट तांबडट दिसतो आणि पानांच्या शिरा नारिंगी किंवा तांबड्या रंगाच्या होतात. ‘स्पायरेल’ या प्रकारात पानं स्क्रू सारखी पिळलेली दिसतात, तर हिरवा, तांबडा, पिवळा आणि त्यांच्या असंख्य छटा असलेल्या पानांचा रंग सगळ्याच क्रोटन्सच्या प्रकारापेक्षा हा प्रकार ‘युनिक’ आहे. आपला हॉल वेगळा दिसण्यासाठी क्रोटन्सचे कोणतेही प्रकार लावता येतील. पानं जाड, चकचकीत असल्यामुळे बरेच दिवस क्रोटन्स टवटवीत दिसतात. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि दिवसातले दोन-तीन तास ऊन या क्रोटन्सच्या प्रकारांना मिळाले तर हे प्रकार अनेक दिवस टिकतात. झाडाची वाढ जेव्हा जोमाने होत असते तेव्हा भरपूर पाणी घालावे. पण अती पाणी घातल्यास झाडाचे खोड, मुळं कुजून जातात आणि झाड वाकतं. म्हणून पाणी घालताना माती ओली होईतोपर्यंतच घालावे. दर दोन आठवडय़ांनी द्रव खत दिलं तर क्रोटन्स चांगले वाढतात आणि पानांचे रंगही गडद होतात.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग : बेबी नेकलेस

क्रोटन्सप्रमाणे ‘कोलियस’ या दुसऱ्या ‘इनडोअर प्लॅन्ट’मध्ये असंख्य रंगांचे मिश्रण पानात पाहायला मिळतं. पिवळा, तांबडा, नारिंगी, गुलबट तांबडा, नारिंगी, हिरवा, तपकिरी रंगांच्या अनेक छटा त्यात आहेत. पानांचे हे रंग खूप भडक असल्यामुळे कमी प्रकाशातही ही झाडं सुंदर दिसतात. झाडाचा वाढणारा टोकाकडचा भाग खुडून टाकला तर ‘कोलियस’ एखाद्या झुडपाप्रमाणे दिसतं. याचे अनेक प्रकार असले तरी ‘इनडोअर प्लॅन्ट’ म्हणून ‘ब्लुमी’ हाच प्रकार लावतात. यातल्या काही उपप्रकारात पानं हृदयाकृती, तर काहींमध्ये त्रिकोणी, कात्र्या कात्र्यांची, लांबट, गवताच्या पातीसारखी असतात. ‘कोलियस ब्रिलियन्सी’ या प्रकारात पानांचा रंग किरमिजी तर कडा सोनेरी-पिवळट रंगाच्या असल्यामुळे हॉलची शोभा नक्कीच वाढेल, यात शंकाच नाही. ‘कॅन्डीड्स’ या प्रकारात फिकट हिरव्या रंगाच्या पानांवर मध्यभागी पांढरा ठिपका असल्यामुळे हा उपप्रकारही ‘युनिक’ दिसतो. ‘गोल्डन बेड्डर’ प्रकारात पिवळी पानं सोनेरी रंगाची होतात. सूर्यप्रकाशात याची झाडं जास्त चमकतात. ‘पिंक रेनबो’ या प्रकारात पानं तांबडट-कॉपरी असतात, तर त्याच्या कडा गडद पोपटी-हिरव्या रंगाच्या असल्यामुळे ही जात इतर कोलियसच्या प्रकारापेक्षा वेगळी दिसते. ‘सनसेट’ या प्रकारात पानं गुलबट, हिरवी असल्यामुळे फिकट भिंतीच्या पुढे हे ‘कोलियस’ हॉलची शोभा वाढवतं!

भरपूर सूर्यप्रकाश असेल तर ‘कोलियस’ चांगला वाढतो. कमी प्रकाश येत असलेल्या ठिकाणी हे झाड लावलं तर पानं दाट न वाढता, नुसते खोडच लांब वाढत जाते, त्यामुळे ते बेडौल दिसते. हॉलमध्ये सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी असेल आणि हवा उबदार असेल त्या ठिकाणी ‘कोलियस’ जोमाने वाढते. याचे खोड नाजूक असल्यामुळे पाणी घालताना जोराचा फवारा मारू नये. हॉलमध्ये अती उष्णता झाल्यास लालसर ‘कोळी’ या झाडावर भराभर वाढतात, परिणामी पानांचे रंग फिकट होतात. ते होऊ नये म्हणून अधून-मधून पाण्याचा फवारा झाडावर मारावा. कोलियसचा शेंडा सतत खुडावा लागतो, त्यामुळे झाड झुडपाप्रमाणे दिसतं.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terraced garden multicolour crotons and coleus mrj