संदीप चव्हाण
बागेसाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक घटकांचे महत्त्व समजून घेणार आहोत. बागेला पूरक ठरणारे नैसर्गिक घटक म्हणजे ऊन, वारा, पाऊस, हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि तापमान, आर्द्रता, वातावरण या विषयी एकत्रितपणे जाणून घेणार आहोत.
सूर्यप्रकाश
झाडे म्हटले की त्याला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी सूर्य प्रकाशाची गरज असतेच. कोणत्याही झाडास किमान दोन ते तीन तास स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते. पूर्वेकडील म्हणजे सकाळचे ऊन प्रत्येक झाडांस पोषक असते. काही झाडं हे कमी प्रकाशात, अर्ध प्रकाशात वाढतात. त्याबाबत थोडा अभ्यास करून त्या त्या प्रकारची झाडे निवडावीत आणि त्याप्रमाणे बागेत लागवड करावी. पण, भाजीपाला हवा असल्यास त्यास स्वच्छ, पूर्णवेळ सूर्यप्रकाश असलाच पाहिजे. बरेचदा अतिरिक्त उन्हापासून संरक्षणापासून शेड नेटचा वापर करतो. पण ऊन, वारा, हवा अडल्यामुळे बागेत कीड वाढण्याची शक्यता असते आणि त्यामागोमाग खर्च सुद्धा येतोच. सुरण, आलं, अळू हे अर्ध प्रकाशात येऊ शकतात.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग : खतासाठी माठाचा उपयोग
हवा
बागेतील झाडांची लागवड किंवा कुंड्याची मांडणी करताना बागेत हवा खेळती राहिल याचा विचार करणे गरजेचे आहे. हवा खेळती असल्यास कीड, दुर्गंध येत नाही. तसेच कडक उन्हापेक्षा उष्ण वारा हा बागेला जास्त घातक असतो. वाहत्या उष्ण वाऱ्यामुळे पाण्याचे जलदगतीने बाष्पीभवन होते आणि झाडे दगावण्याची शक्यता वाढते. तसेच बागेतून वारा जोरदार वाहत असल्यास वेलवर्गीय वनस्पती तग धरत नाहीत. जोरदार वाऱ्यामुळे कुंड्या पडून अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा बागेत पुरेशी हवा खेळती ठेवणे, वारा नियंत्रित करणे अर्थात त्यास प्रतिबंध करणे गरजेचे असते.
आणखी वाचा-गच्चीवरील बाग : बागेतील कीड नियंत्रण…
तापमान
आपल्याकडील तीनही ऋतूत वेगवेगळे तापमान असते. तापमानाचा थोडा विचार करून त्याप्रमाणे बागेला पाणी देणे गरजेचे आहे. बागेला पाणी देण्याची वेळ ही सकाळी सूर्योदयापूर्वी तसेच सायंकाळी वातावरणात गारवा वाढल्यावर देणे योग्य असते. पाणी हे अगदी जमिनीवर, कुंडीत साचेल अथवा वाहून जाईल इतके देऊ नये. झाडाला पाणी कमी दिले तरी चालते पण ते योग्य प्रमाणात व वेळेवर देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात दोन्ही वेळेस बागेला पाणी देणे गरजेचे आहे तर हिवाळ्यात एक वेळ म्हणजे सायंकाळी द्यावे. गरज भासल्यास दोनही वेळेस दिले तरी चालते. पावसाळ्यात मात्र पावसाचा जोर, त्याची सातत्यता पाहून बागेस पाणी द्यावे. झाडांना शक्यतो पाणी झारीनं किंवा शॉवर पाईपने द्यावे म्हणजे बागेला अंघोळ ही होते आणि झाडांची मुळेही उघडी पडत नाहीत.
आणखी वाचा- गच्चीवरची बाग : फुलांची बाग
बागेला आठवड्यातून एकदा पाण्याचा उपवास घडवावा. बागेचे पाणी तोडल्यानं झाडांची मुळं सक्रिय होतात. हा प्रयोग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंचा अंदाज घेऊन करावा. कुंडी, वाफा, त्यातील माती यांची गरज ओळखून पाणी द्यावे. बरेचदा बागेसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करतो. पण त्यामुळे बागेला अंघोळ घालणे हा कीड नियंत्रणाचा तसेच बागेचे रोजचे निरीक्षण असे पर्याय गमावून बसतो. त्यामुळं बागेला पाणी देतांना ते प्रत्यक्ष हजेरीत देता आलं पाहिजे. प्रत्यक्ष झाडाजवळ जावून पाणी दिल्यानं बागेतील झाडाचं अपसूक निरीक्षण कौशल्य वाढते.
वातावरण
गच्चीवरची बाग म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत बाग फुलवायची असते. दुपारचे तापमान प्रचंड वाढलेल असते. त्यात वाहत्या वाऱ्यासोबत उष्ण हवा वाहत असते. अश्या वेळेस कुंड्या या दाटीवाटीने ठेवाव्यात. उष्ण वाऱ्याला प्रतिरोध करणाऱ्या उंच झाडांची, प्लिंथ वॉलची सोय करावी. कुंड्या जवळ जवळ मांडणी केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तसेच बाग करपण्यापासून संरक्षण होते.
sandeepkchavan79@gmail.com