प्रिया भिडे

परसबागेत बिया रुजवणे, त्यांचे अंकुरणे अन् नंतर फुललेली, फळलेली रोपे पाहणे म्हणजे श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आपल्या बागेतली ताजी भाजी खाण्यातला आनंद काही वेगळाच असतो. पण सगळेच परसबाग फुलवू शकतील असे नाही. कोणाकडे जागा नसेल तर कोणाकडे वेळ; पण मनात फुलांची, पानांची, हिरवाईची, निसर्गाची आवड असेल तर त्यांनी काय करायचे? निसर्गाच्या सृजनयात्रेत त्यांनी कसे सामील व्हायचे? तर, निसर्गानेच त्यांच्यासाठी खजिना खुला केला आहे. वसंत ऋतूत रंगांची बरसात केल्यानंतर खूपशा वृक्षांनी फळे धारण केली आहेत.

करंजाच्या करंज्या, बहाव्याच्या टिपऱ्या, शिरीषाच्या सोनसळी शेंगा, तामणची फले झाडांवर लटकत आहेत. काही फळे उकलून बियांची उधळण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी झाडाच्या खालीच खूप बिया पडल्या आहेत. एकाच ठिकाणी या बिया पडल्या, रुजल्या तर किती बियांचे वृक्ष होणार? एका झाडाखाली दुसरा वृक्ष होणे कठीण, पण योग्य जागी बिया पडल्या अन् त्याची देखभाल झाली तर तो वाढून वृक्ष होऊ शकतो. चिंचेच्या, बाभळीच्या झाडाला असंख्य शेंगा येतात. त्यातील प्रत्येक शेंगेत पाच-सहा बिया असतात, पण त्यातील किती बियांपासून पूर्ण वाढलेला वृक्ष होतो? विचार करा, बी ते वृक्ष या प्रवासात खूपच अडथळे असतात. झाडासही विविध ताणांचा सामना करावा लागतो. पाणी, मातीतली पोषण मूल्ये, तापमान, सूर्यप्रकाश यासाठी झगडावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानवनिर्मित अडथळे.. गुरांपासून बचाव करणे, आगीपासून बचाव होणे, विकासाच्या रेटय़ात जेसीबी-सूरापासून बचाव करणे हे सगळे किती अवघड आहे. हे सगळे जणू निसर्गास माहीत आहे अन् म्हणूनच हजारो, लाखो बियांची निर्मिती निसर्गात होते. आता आपले काम आहे हे धन योग्य ठिकाणी पोचवण्याचे. ज्यांना निसर्गाची माया आहे, त्यांनी झाडाखाली पडलेल्या एकूण बियांपैकी वीस टक्के बिया जरी गोळा केल्या तरी खूप झाले. कारण बीज प्रसाराचे इतर अनेक प्रकार निसर्गत: होतात. गोळा केलेल्या बिया योग्य हातात जाणे महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग: पुष्पलता दारात रंगगंधांची बरसात!

आपण गोळा केलेल्या बिया त्यांच्याकडे सुपूर्द केल्यास निसर्ग संवर्धनात खारीचा वाटा उचलण्याचे समाधान मिळेल. विविध बिया गोळा करताना त्या झाडांशी अन् झाडांची ओळख होईल. काय जपायचे अन् का जपायचे हे जाणून घेतले तर डोळस संवर्धन होईल. अनेक संस्था, कंपन्या, गृहनिर्माण संस्था, तरुण, उत्साही गट वृक्षारोपणासाठी उत्सुक असतात. पण त्यांना देशी वृक्षांबद्दल माहिती नसते. अशा वेळी महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे तज्ज्ञ त्यासंबंधी माहिती देऊ शकतात.

गेल्या दोन वर्षांपासून बीज संकलनाच्या उपक्रमात खूप लोकांनी सहभाग घेतला. कडूलिंब, कवठ, बेल, जांभूळ, आंबा, ऐन, अर्जुन, रिठा, आवळा, मोह अशा विविध वृक्षांच्या बिया संकलित झाल्या. हे खरे निसर्ग मित्र. आपणही असे काही करू शकतो. बीज संकलनाद्वारे संवर्धन करू शकतो. परसबाग फुलवण्यासारखा आनंद नाही, पण ते शक्य नसेल तर त्याहूनही व्यापक परीघ आपणास खुणावत आहे. त्यामध्ये खारीचा वाटा उचलणे शक्य आहे. भारतातील जैवविविधता अपार आहे. जेवढी विविधता अधिक, तेवढी समृद्धी अधिक, या समृद्धीची वृद्धी होईल, सृष्टी अधिक वर्धिष्णू होईल. यासाठी आपणही कृतिशील होऊ या. हिरवाईचे शिलेदार, निसर्गाचे मित्र होऊ या.

Story img Loader