गेल्या खेपेस मी आणि माझी मुलगी आम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असताना तिची भेट झाली होती. दोन खूप छान कामं तिनं एकाच दिवसात केली, दोन प्रहरात. तिचा तो चांगुलपणा पाहिल्यानंतर आम्ही तिला विचारलही की, अगं तुझं नावं काय? तर ट्रेनमधून उतरता उतरता म्हणाली होती, चांगुलपणाला कुठे नाव असतं? ‘ती’च ‘ती’; काल परत एकदा भेटली पण या खेपेस पश्चिम रेल्वेमध्ये. चर्चगेटला चढलो आणि गप्पा मारत असतानाच ती ग्रँटरोडला समोरच्याच सीटवर येऊन बसली. आम्ही दोघांनीही तिला दुसऱ्या सेकंदाला ओळखलं. हीच ती चांगुलपणाचा आदर्श घालून देणारी मॉड ताई!
आणखी वाचा : चांगुलपणाला कुठं नाव असतं?
बोलायला सुरुवात करणार एवढ्यात एक थरथरता हात समोर आला. एक आज्जी त्या थरथरत्या हाताने चमचमते चिनी दिवे, पेन- पेन्सिली विकत होती. ती आमच्या समोर आली त्याचवेळेस मागच्या बाजूने एकाने तिला ते दिवाळीचे चमचमते दिवे दाखवायला सांगितले. त्याने पन्नास रुपयाचे दोन दिवे घेतले आणि दोनशेची नोट तिच्या हातावर टेकवली. बाजूला रिकाम्या असलेल्या सीटवर हळूवार बसत तिने कसेबसे तिच्या कनवटीला लावलेल्या पैशांतून सुटे पन्नास रूपये काढले… एवढेच आहेत म्हणाली. तर या पठ्ठ्याने तिला थेट शिव्याच घालायला सुरुवात केली. तिच्या हातातून दोनशेची नोट हिसकावून घेतली दिवे तिच्या हातावर फेकले, ते खाली पडले… तक्क्षणी ‘ती’ उठली आणि त्या माणसाला जाऊन थेट भिडली!
आणखी वाचा : करून पाहा: प्रांतोप्रांतीचा आगळावेगळा फराळ!
ती म्हणाली… अरे तुझं वय काय, तिचं काय? तू तर तरुण दिसतोयस. दोनशे रूपये हातात आहेत मग कमावतही असशील… तर मग हा असा भिकाऱ्यासारखा का वागतोयस? तिच्याकडे पाहा. ती वयोवृद्ध आहे, भीक मागू शकते. लोक देतीलही भीक… पण काही तरी विकून पोट भरायचा प्रयत्न करतेय… सन्मानानं जगायचा प्रयत्न करतेय. तर तुला कसला आला एवढा माज? …तिच्या कपाळावरची शीर तडतडत होती! आणि म्हणाली आधी आजीची माफी माग, नाही तर इथेच डब्यात लोळवेन तुला. ज्युदो शिकल्येय. आणि शिवी कसली देतोस रे मला तर शिव्यांची पूर्ण बाराखडी येते, करू का सुरुवात? ‘ती’नं आता रुद्रावतार धारण केला होता!
आणखी वाचा : मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा
तो म्हणाला, तुल काय एवढा पुळका आलाय? तुझी कुणी लागते का ती? आणि मग तू का नाही विकत घेत तिच्याकडून? एव्हाना संपूर्ण डब्यातल्या सर्व प्रवाशांच लक्ष तिच्याकडे गेलं होतं… तिने पर्समधून दोनशे रूपये काढले, त्या आजीच्या हातात दिले आणि ते दिवे घेऊन त्याच्या हातात देत म्हणाली… जा, तुला दान केले मी!
आणखी वाचा : दिवाळीत असा असू द्या आहार
मला नको फुकट, असं म्हणतं त्यानं ५० ची नोट काढून आजीला दिली आणि स्टेशन येताच उतरायला गेला तर हिने त्याची कॉलर पकडली आणि म्हणाली, सॉरी कोण म्हणणार आजीला? उतरता उतरता तो आजीला सॉरी म्हणाला… आजीने ती त्याने दिलेली पन्नासची नोट घेतली आणि दोनशेची नोट तिला परत केली… तर ती म्हणाली, अगं आज्जी दिवाळी आहे! ठेव हे पैसे. आज तुला नातीकडून दिवाळी भेट!