साक्षी सावे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजी विकून आपली उपजीविका चालविणाऱ्या विजयालक्ष्मीने अविवाहित राहून शिक्षणावरच आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं; ती कर्नाटक कॅन्सर सोसायटीची उपाध्यक्षा आणि प्रथितयश ऑन्कोलॉजिस्ट अर्थात कॅन्सरतज्ज्ञ झाली. अनुसूचित जातीत जन्म, झोपडपट्टीत घर, घरात खाणारी तोंडंच अधिक अशा कितीतरी अडचणींची मालिका असूनही विजयालक्ष्मी डॉक्टर झाली. कर्करोगतज्ज्ञ होऊन समाजाला, रुग्णांना प्राधान्य देऊन आपलं सामाजिक दायित्वही तिने पुरेपूर निभावलं. येत्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने निवृत्तीनंतरही समाजासाठी काम करणाऱ्या डॉ. विजयालक्ष्मी देशमानेंची ही कहाणी नक्कीच प्रेरक ठरेल.

कर्नाटकातल्या गुलबर्ग्यात मजुरी करणारे वडील बाबूराव शिकलेले नसले तरी त्यांचे विचार पुढारलेले होते. जातीपातीच्या भिंती तोडून ते कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकले. आई रत्नप्पा भाजी विकायची. अशा घरात १९५५ साली विजयालक्ष्मींचा जन्म झाला. सहा बहिणी आणि एक भाऊ असं हे दहा जणांचं कुटुंब एका छोट्याशा घरात राहत होतं. लहानगी विजयालक्ष्मी आणि तिचा भाऊ आईबरोबर भाजी विकत असत. दोन वेळच्या जेवणाची जिथे भ्रांत होती तिथे मूलभूत सोयीसुविधा असणं हे स्वप्नवतच होतं. वडिलांनी मजुरीचं काम सोडून मिलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. त्यांच्यावर स्वातंत्र्य चळवळीचा मोठा प्रभाव असल्याने त्यांना ‘देशमान्य’ असं लोक मोठ्या प्रेमाने म्हणू लागले. त्यानंतर वडिलांनी जातीनुसार आडनाव बदलून देशमान्या असं लावण्यास सुरुवात केली. विजयालक्ष्मीने डॉक्टर व्हावं आणि गरीबांची सेवा करावी, हे तिच्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न होतं.

या दिवसांची आठवण सांगताना डॉ. विजयालक्ष्मी म्हणतात, “मी अभ्यासात हुशार होते, तरीही बारावीनंतर आपल्याला परिस्थितीमुळे शिकता येणार नाही, हे तेव्हाच कळलं होतं. शिवाय माझ्या भावंडांचंही शिक्षण व्हायचं होतंच. अशा वेळी माझ्या उच्च शिक्षणाला लागणारा पैसा आई-वडील कुठून आणणार होते? एका रात्री आईने तिच्याकडचा एकमेव दागिना, अर्थात तिचं मंगळसूत्र, वडिलांच्या हातात ठेवलं आणि ते गहाण टाकून हुबळीला केएमसी येथे होणाऱ्या माझ्या एमबीबीएसच्या प्रवेश परीक्षेसाठी कर्ज घ्यायला सांगितला. आज मी खूप नावारूपाला आले, समाजात प्रतिष्ठा आहे, याचं सगळं श्रेय आई-वडील आणि भावंडांना जातं. त्यांनी माझ्यासाठी जे केलं त्यातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही किंवा तसा विचारही करू शकत नाही.”

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला विजयालक्ष्मी नापास झाल्या. त्याबद्दल सांगताना त्या म्हणतात, “सगळं शिक्षण तोवर कन्नडमध्ये झालं होतं. एमबीबीएसचा अभ्यासक्रम इंग्रजीत होता. मला लेक्चरला काय शिकवलं जातंय, ते कळत होतं, परंतु इंग्रजीतल्या प्रश्नपत्रिका सोडवण्यात अडचणी आल्याने पहिल्या वर्षी मी नापास झाले. परंतु दुसऱ्या वर्षी मात्र मी त्यावरही मात केली आणि नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. यासाठी प्राध्यापकांना मी धन्यवाद देईन. विद्यापीठामध्ये मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ही बातमी कळताच घरामध्ये जल्लोष झाला. त्यानंतर सर्जरीमध्ये एमएस करायला सुरुवात केली. किडवाई इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कॉलॉजीमध्ये वरिष्ठ निवासी सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून रुजू होत कमवायलाही लागले. स्तनांचा कर्करोग या विषयात मी तज्ज्ञता मिळवली. माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सुदैवाने नेहमीच उत्तम मार्गदर्शन, पाठिंबा आणि समवयस्कांचं तसंच रुग्णांचंही सहकार्य लाभलं. दरम्यान, माझा भाऊ अजय घोष हाही तोवर एलएलबीचं शिक्षण पूर्ण करून कमवायला लागला होता.”

त्यांच्या निवृत्तीला आता जवळपास एक दशक होत आलं असलं तरी डॉ. विजयालक्ष्मींचं आपल्या व्यवसायावरील प्रेम जराही कमी झालेलं नाही. सतत नवीन काहीतरी शिकण्याची त्यांची आस आजही तशीच आहे. किंबहुना, काळाबरोबर चालण्यात, ज्ञानात नेहमीच भर घालत राहण्याकडे त्या विशेष लक्ष देतात. रुग्णांशी संवाद साधल्याने त्यांच्या मनावरचा अर्धा भार हलका होतो, अशी त्यांची धारणा आहे. याचा उपयोग शस्त्रक्रिया करतानाही होतो. आपल्याला घडविणारे गुरू, मित्रपरिवार, प्रेम करणारे रुग्ण आणि समाजाचेही त्या ऋण मानतात. या व्यवसायात आपण समाजाची सेवा करण्यासाठी फक्त ‘निमित्त’ आहोत, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

आपल्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. कर्करोगाविषयीची माहिती देणाऱ्या, जागरूकता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा, संशोधनात्मक काम, गावागावांतून आरोग्यशिक्षणाचे उपक्रम यांत नेहमीच सक्रिय राहिल्या. तरीही आपल्या आयुष्यात आतापर्यंत आपण केवळ अर्धंच काम केलं असल्याची त्यांची भावना आहे. त्यांनी आजही महिन्यातील १५ दिवस या स्वरूपाच्या कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेले आहेत. उरलेल्या १५ दिवसांत कर्नाटक कॅन्सर सोसायटीमध्ये मोफत रुग्णसेवा करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. डॉ. विजयालक्ष्मी देशमाने यांच्या या प्रेरक कहाणीचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांच्या इतर चारही बहिणींनी डॉक्टरेट मिळवली असून त्या त्यांच्या त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The astonishing journey of dr vijayalakshmi deshmane from a vegetable seller to a renowned cancer specialist amy