बिकिनी हे अनेक स्त्रियांचे आवडते आणि आकर्षण असणारे वस्त्र आहे.बहुतांशी लोकांना बिकिनी हे आधुनिक वस्त्र आहे, असे वाटते. परंतु, बिकिनी या वस्त्राशी साधर्म्य साधणारे वस्त्र रोमन काळातही होते. पुढे १९४६ मध्ये बिकिनी हे नाव स्वीकारून हे वस्त्र उपलब्ध झाले. केवळ स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांसाठीही बिकिनीची निर्मिती करण्यात आली. बिकिनी म्हणजे काय? पहिली बिकिनी कधी तयार झाली? तिला बिकिनी का म्हणतात? बिकिनीची विकास प्रक्रिया कशी आहे हे समजून घेणे रंजक ठरेल…
बिकिनी म्हणजे काय ?
बिकिनीची निर्मिती ही स्विम सूट या वस्त्रापासून झाली आहे. दक्षिण अनाटोलियातील एक मोठी प्राचीन वसाहत असलेल्या भागातील Çatalhöyük देवता बिकिनीसदृश वस्त्र परिधान केलेली आहे. तसेच इसवी सन पूर्व १४०० च्या काळातील ग्रीक कलशांवर काही स्त्रियांची चित्रे कोरलेली आहेत. या स्त्रियांची वस्त्रे ही केवळ दोन वस्त्रांपुरती मर्यादित आहेत. प्राचीन ग्रीसमधील स्त्रिया मास्टोडेटन किंवा ऍपोडेस्मॉस नावाचा ब्रेस्टबॅण्ड घालत असत. फ्रेंच ऑटोमोटिव्ह अभियंता लुई रेआर्ड यांनी पॅसिफिक महासागरातील बिकिनी ॲटोलवरून हे नाव स्वीकारून ‘बिकिनी’ असे नाव दिले. कारण- १९ व्या शतकात बिकिनी हा स्विम सूटशी साधर्म्य साधणारा होता. लॅटिनमध्ये ‘bi-‘ म्हणजे दोन. बिकिनीमध्ये दोन वस्त्रांचा समावेश असतो म्हणून या वस्त्राला बिकिनी म्हणतात. नुमोकिनी, युनिकिनी, सीकिनी, टँकिनी, कॅमिकिनी, हिकिनी, मिनीकिनी, फेस-किनी, बुर्किनी व मायक्रोकिनी असे ‘किनी’ वस्त्रप्रकारातील बिकिनीचे उपप्रकार उपलब्ध आहेत.
हेही वाचा : महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४x ७ कार्यरत असणारे पथक माहीत आहे का ? ‘निर्भया पथक’ म्हणजे काय ?
बिकिनीची पहिली निर्मिती कधी झाली ?
१९३० मध्ये स्विम सूट वस्त्रप्रकाराला ‘फॅशन’चे स्वरूप देण्यात आले. ५ जुलै १९४६ रोजी प्रथम बिकिनी या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. फ्रेंच अभियंता लुई रेआर्ड यांनी आधुनिक बिकिनी सादर केली. फ्रेंच महिलांनी या वस्त्रप्रकाराचे स्वागत केले. १९५१ मध्ये पहिल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्य स्पर्धेतील स्पर्धकांनी ‘बिकिनी’ परिधान केली होती. १९५३ मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलदरम्यान अभिनेत्री ब्रिजिट बार्डोटने बीचवर बिकिनी घालून फोटो काढले आणि ती अधिक चर्चेत आली.
बिकिनीला हळूहळू पाश्चात्त्य समाजात व्यापक मान्यता मिळू लागली. फ्रेंच वस्त्रप्रावरण तज्ज्ञ ऑलिव्हियर सैलार्ड यांच्या मते, ”बिकिनी हा वस्त्रप्रकार त्याच्या रचनेमुळे आणि तो परिधान केलेल्या स्त्रियांमुळे अधिक प्रसिद्ध झाला. बिकिनी ही कम्फर्टेबल आणि बीचवेअर आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीस बिकिनी वस्त्रप्रावरणाचा ८११ दशलक्ष यूएसडी डॉलर व्यापार झाला. तसेच बिकिनीमुळे वॅक्सिंग आणि सन टॅनिंगसारख्या स्पिन-ऑफ सेवांना चालना मिळाली.
मूळ बिकिनी आणि बिकिनीचे आधुनिक रूप
आज आपण जे बिकिनी हे वस्त्र ओळखतो, त्यात आणि मूळ बिकिनीमध्ये फरक आहे. १८ व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये समुद्रात किंवा उघड्या जागी स्त्रियांना अंघोळ करण्यास बंदी होती. त्यानंतर अंघोळ करण्यासाठी सैलसर आणि पूर्ण बाह्यांच्या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. सामाजिक सभ्यता धोक्यात येऊ नये यासाठी या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. १९ व्या शतकामध्ये या वस्त्राचा आकार कमी झालेला दिसतो. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात स्विमवेअरचे बिकिनीमध्ये रूपांतर करण्यात आले.
१९५१ मध्ये, पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा एरिक मॉर्ले यांनी आयोजित केली होती. स्वीडनमधील विजेत्या किकी हॅकन्सन यांना बिकिनीमध्ये मुकुट घालण्यात आला. परंतु, हॅकन्सन ही बिकिनीमध्ये मुकुट घातलेली पहिली व शेवटची ‘मिस वर्ल्ड’ ठरली. त्यानंतर सौंदर्य स्पर्धांमध्ये बिकिनी घालण्यावर बंदी घालण्यात आली. १९ व्या शतकात स्पेन, पोर्तुगाल, इटली, फ्रान्सच्या शेजारील तीन देश, तसेच बेल्जियम व ऑस्ट्रेलियामध्ये आणि अनेक अमेरिकेतील राज्यांमध्ये स्विम सूटवर बंदी घालण्यात आली होती.
नॅशनल लीजन ऑफ डिसेन्सीने हॉलीवूड चित्रपटांमध्ये बिकिनी दाखवण्यापासून रोखण्यासाठी दबाव आणला. अमेरिकेतील चित्रपटांसाठी १९३० मध्ये हेस प्रॉडक्शन कोड सादर केला गेला. त्याअंतर्गत दोन भागांमध्ये विभाजित वस्त्रे घालण्यास परवानगी देण्यात आली; परंतु नाभीप्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली. दरम्यान, टारझन द एप मॅन (१९३२) व टार्झन अँड हिज मेट (१९३४) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले; ज्यात अभिनेत्री मॉरिन ओ’सुलिव्हन हिने बिकिनीसारखे चामड्याचे पोशाख परिधान केले होते.
हेही वाचा : विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास
१९६२ मध्ये बॉण्ड गर्ल उर्सुला अँड्रेस ही पांढरी बिकिनी परिधान करून समुद्रातून बाहेर आली. या दृश्याला मालिकेतील सर्वांत आकर्षक दृश्य ठरवण्यात आले. ‘हेराल्ड’च्या सर्वेक्षणाच्या आधारे हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट दृश्य ठरले आहे. २००१ मध्ये चित्रपटातील अँड्रेसने परिधान केलेली बिकिनी १,५०० यूएसडी डॉलरला लिलावात विकली गेली.
१९६६ मध्ये रॅकेल वेल्च हिने घातलेली फर बिकिनी आकर्षक ठरली होती. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही तिचा फर बिकिनीमधील फोटो वापरण्यात आला होता. या फोटोमुळे हा चित्रपट अधिक ‘हिट’ झाला. १९८३ मध्ये ‘रिटर्न ऑफ द जेडी’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीला धातूची बिकिनी घालण्यास सांगण्यात आले होते. १९९७ मध्ये बिकिनीच्या पदार्पणाच्या ५१ वर्षांनंतर आणि मिस अमेरिका पेजेंटची स्थापना झाल्यानंतर ७७ वर्षांनी स्पर्धकांना स्विम सूट घालण्याची परवानगी होती. त्याला स्विम सूट म्हणण्याऐवजी ‘बुलेटप्रूफ व्हेस्ट’ असे नाव देण्यात आले.
भारतात ‘बिकिनी’चे आगमन
१९७० च्या दशकात भारतात बिकिनीचे आगमन झालेले दिसते. काही अभिनेत्रींनी ‘फिल्मफेअर’साठी आणि मासिकांच्या मुखपृष्ठासाठीही बिकिनीमधील फोटो काढले. परवीन बाबी (ये नजदिकियां -१९८२), झीनत अमान (हीरा पन्ना -१९७३, कुर्बानी -१९८०) डिंपल कपाडिया (बॉबी -१९७३) यांनी भारतामध्ये ‘बिकिनी’ पोशाख रुजवण्याचे काम केले. २००५ पासून चित्रपटांमध्ये, सार्वजनिक ठिकाणीही बिकिनी घालण्यास सुरुवात झाली आणि बिकिनी भारतामध्ये जनमान्य झाली. बिकिनीमधील फोटो, चित्रीकरण ‘ट्रोल’ होण्याचे प्रमाण भारतामध्येच जास्त आहे.
बिकिनी हा बहुतांश महिलांचा आवडीचा पोशाख आहे. स्विम सूटचे पुढील रूप म्हणजे बिकिनी हे आहे. हा आधुनिक पोशाख नसून, तिची निर्मिती १९ व्या शतकात झाली आहे.