चारुशीला कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मणिपुरमधल्या ‘त्या’ घटनेबद्दल वाचल्यापासून, ऐकल्यापासून गेले काही दिवस मन विषण्ण झालं आहे. ते सर्व ऐकलं आणि आत आत कुठे तरी एकदम तुटल्यासारखं झालं! कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं. ‘शब्द अबोल झाले’ असं वगैरे काही म्हणणार नाही, कारण ‘स्त्री’ म्हणून आम्हा स्त्रियांना हे कळलंय, की ‘बाई ही उपभोगाची वस्तू’ हेच बहुतेक वेळा समोरच्याच्या नजरेत जाणवतं. कारण तेच बहुतेक कुटुंबांत नकळत मुलांच्या मनावर बिबंवल गेलं आहे.

मुलगी घराबाहेर पडतांना ‘ओढणी घे…’ ‘किती वाजता येणार?’ ‘कुठे चाललीस?’ ‘जाणं गरजेचंच आहे का?’ अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू राहते. ‘सारे नियम एकट्या मलाच का?’ हा प्रश्न विचारायची मात्र तिला सोय नसते. या ‘सो कॉल्ड’ नियमांच्या चौकटीत राहूनसुद्धा कधी कधी समोरच्या व्यक्तीची नजर केवळ आपल्या शरीराच्या दोन अवयवांवर फिरते आहे असं जाणवतं. ती नजर जाणीव करून देते, की ‘तू स्त्री आहेस आणि आमचा हक्क आहे तुझ्यावर!’ ती बोचरी नजर. हा विषय घरात काढला किंवा असं एकटक बघणाऱ्या माणसाच्या विरूद्ध तक्रार केली, की घरातून, समाजातून पहिला प्रश्न ठरलेला- ‘पण तू तिकडे का पाहिलंस? की तूही त्याच्याकडेच पाहात होतीस?’ या पालुपदापुढे काय बोलावं?… या वातावरणात विखारी नजरा झेलत आला दिवस घालवायचाय हे मनाशी पक्कं केलं जातं.

काही अपवाद वगळता बहुसंख्य मुली निमुटपणे, आखून दिलेल्या, ठरलेल्या ‘मर्यादांच्या’ चौकटीत, ‘संस्कारा’च्या परिघात राहण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही निर्भया, श्रध्दा, अशी प्रकरणं समोर येतच राहतात. नावं बदलतात, ठिकाणं बदलतात… पण तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन?… ती ‘उपभोग्य वस्तू’च राहते. कधी दोन जमातींमधला संघर्ष, कधी दोन घरांतील वैर, कधी दोन धर्मांतील, जातींतील… पहिली शिक्षा तिला मिळते. तिच्या अस्मितेला धक्का लागेल अशी कृती… शारिरीक अत्याचार तिच्यावर केला जातो. खरं तर विखारी नजरांमध्ये इतर वेळीही तिला नेहमीच तिची नग्नता जाणवत असते, तो अत्याचार ते सारं प्रत्यक्षात आणतो.

अगदी साधं पाहा- मुलगी वयात येण्यााधीच खेळताना ‘तो मुलगा तुझा भाऊ नाही… त्याच्यापासून दूर रहा.’ किंवा सरळ ‘तो मुलगा आहे, त्याच्यापासून दूर रहा,’ असं सांगतात. अगदी काही काही मुलींना ‘वडिलांपासून दूर रहा…’ असंही सांगितलं जातं. ‘चांगला स्पर्श-वाईट स्पर्श’ असं बरंच काही हल्ली सांगितलं जातं. त्यातल्या काही गोष्टी- उदा. चांगले-वाईट स्पर्श ओळखणं गरजेचं असलं, तरी यातून ‘स्त्री आणि पुरूष यांच्यात मोठा भेद आहे आणि पुरूषांपासून तुला धोका आहे,’ असा संदेश जातो की काय असंही वाटतं. मग मुलं-मुली किंवा स्त्री-पुरूष सहकारी मोकळ्या मनानं, निखळ मैत्रभावनेनं कसे वावरायला शिकणार? आणि मुळात लहानपणापासून निर्मळ मन ठेवण्याजोगं वातावरण कधी निर्माण होईल?…

‘मणिपूर’ घटनेसारखं काही समोर आलं, की झोपी गेलेल्या, बोथट झालेल्या संवेदना पुन्हा एकदा जाग्या होतात. मेणबत्ती मोर्चे, निदर्शनं निघत राहतात. एका वळणावर हा मुद्दा राजकीय भांडवल होऊन जातो. ‘महिला अत्याचारा’चं नाव घेऊन शिमगा करत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. ‘महिला किती असुरक्षित आहेत,’ हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं जातं आणि त्याच वेळी दुसरा पक्ष ‘ ‘त्या’ महिलांचीच कशी चूक आहे’ हे सांगण्यात ‘बिझी’ होतो. हे फार व्यापक झालं हो! आपल्या घरातलंच पाहू या. आपल्या लेकी, सुना किंवा अन्य ओळखीच्या स्त्रियांची कोणी छेड काढली, त्यांना त्रास दिला, तर आपण काय सल्ला देतो? किंवा अगदी रस्त्यावरून जाताना आपल्यासमोर अशी काही घटना घडत असेल तर काय करतो?… याचं उत्तर प्रत्येकानं स्वत:ला देऊन पाहावं. कारण काही दिवस तापला, तरी आपल्याला मागील अनुभवांवरून हे माहिती आहे, की पुढील काही भयंकर घटना घडेपर्यंत ‘महिला अत्याचारा’चा विषय पुन्हा बाजूला पडणार आहे…

lokwomen.online@gmail.com