नीलिमा किराणे
आज सुमेधाच्या ड्रीम कंपनीतला फायनल इंटरव्ह्यू झाला खरा, पण परफॉर्मन्स तिच्या मनासारखा झाला नव्हता. अखेरीस ज्याची भीती होती, तेच झालं. पोस्ट दोन होत्या आणि ती तिसरी आली. पॅनल ऑफिसरने तिला रिझल्ट सांगून सॉरी म्हटलं, ‘तुम्ही वेटिंगलिस्टवर आहात. पुढच्या रिक्वायरमेन्टसाठी तुमचा विचार पहिल्यांदा होईल,’ असंही सांगितलं. ती ‘थँक यू’ म्हणून बाहेर पडली.
‘दर वेळी असंच का होतं? अगदी हाता-तोंडाशी आलेला घास का जातो?’ विचाराच्या तंद्रीत घराजवळ पोहोचता पोहोचता, समोरून येणाऱ्या बाईकला सुमेधा जवळजवळ धडकतच होती, पण “ओ, हॅलो, सुमेधा मॅडम…” कचकन थांबून हेल्मेट काढत बाईकवाला म्हणाला.
“अरे, तू? सॉरी, माझं लक्ष नव्हतं.” रोहितला, सोसायटीतच राहणाऱ्या वर्गमित्राला ओळखून सुमेधा म्हणाली.
“आज फायनल इंटरव्ह्यू होता ना? काय झालं?” या प्रश्नावर सुमेधाचा सर्रकन उतरलेला चेहरा पाहून रोहित म्हणाला,
“चल, आपण कॉफी घेऊ.” सुमेधालाही कॉफी हवीच होती.
“नेहमीप्रमाणे थोडक्यात जॉब हुकला, रोहित. वेटिंग लिस्टवर ठेवतोय म्हणाले, पण ते गृहीत थोडीच धरता येतं? दर वेळी असं का रे होतं माझ्याच बाबतीत?” कॉफीशॉपमध्ये बसल्यावर सुमेधा म्हणाली.
आणखी वाचा-सीआरपीएफची नोकरी ते आयपीएस ऑफिसर, तनुश्रीची सक्सेस स्टोरी एकदा वाचाच
“दर वेळी म्हणजे किती वेळा?” रोहितनं विचारलं.
“शाळेपासून बघतेय. माझं मॅथ्स इतकं चांगलं, दहावीत पैकीच्या पैकी मिळवण्याचं स्वप्न होतं, ऐन शेवटच्या पाच मिनिटांत सुपरवायझरने सप्लिमेन्ट दिली नाही. त्यामुळे दोन मार्क गेले. बारावीला टॉपर असले असते, नेमका टॉयफॉईड झाला, रँक गेली.
क्षितिज मला आवडत होता, फीलिंग्ज आहेत असं वाटेपर्यंत परदेशी युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळून तो गेलासुद्धा. बंगळूरुमध्ये ड्रीम जॉब मिळूनही करोनामुळे सोडावा लागला. या आधीचा जॉबही गेलाच. मला जे मनापासून हवं असतं ते हातात येतायेता हुकणार, हा पॅटर्नच झालाय का, माझ्या नशिबाचा?”
रोहित काहीच बोलला नाही.
“तुला पटत नाही का? सांग ना.”
“काय बोलू? तू फक्त दु:खच दाखवणारा फिल्टर लावलायस असं वाटतंय. दहावीच्या पेपरला शेवटच्या दहा मिनिटांत सप्लिमेंट देत नाहीत हे काय तुला माहीत नव्हतं? तुझा वेळेचा आणि सप्लिमेंटचा अंदाज चुकला, त्यात नशिबाचं काय? बारावीला रँक चुकली तरी हवी तिथे अडमिशन मिळाली, पुढे जे यश मिळवायचं ते मिळवलंसच की तू. क्षितिजला पुढे परदेशातच स्थायिक व्हायचं होतं हे कळल्यावर तुही त्याचा विचार सोडलास, पण नंतर किती मुलांनी तुला प्रपोज केलं आणि आणखी किती जणांना प्रपोज करण्याची इच्छा होती हे जाहीर आहे. करोनाने संपूर्ण जगाचंच नुकसान झालंय, ते धरायचंच नाही.
आणखी वाचा-‘मुलांसाठी ‘ब्रेक’ घेताना घालमेल झाली नाही; कारण स्वतःच्या कामावर विश्वास होता!’ – पल्लवी जोशी
या कंपनीतसुद्धा तू वेटिंग लिस्टवर आहेसच आणि प्रोफाइल आवडलं नाही म्हणून याआधीची ऑफर तू स्वत: नाकारलीस हे माझ्या लक्षात आहे. मग हे ‘नशिबाचा पॅटर्न’ वगैरे काय?”
“तू म्हणतोस ते खरं आहे रोहित, पण वाईट वाटणारच ना?”
“मनापासून हवी असलेली गोष्ट मिळाली नाही की वाईट वाटणारच. पण ‘माझं नशीबच असं’ मध्ये घुसलं की काय होतं माहीत आहे का? तुम्ही फक्त त्या अपेक्षेप्रमाणे न मिळालेल्याच्या दु:खामध्ये गरगरत राहता. अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षा न करताही जे मिळालंय त्याकडे दुर्लक्ष करण्याचा चॉइस करते आहेस तू. मग दु:ख संपेल कसं?”
“असं म्हणतोस?” सुमेधा विचार करायला लागली.
“अर्थात. तुला इतकी वर्षं ओळखतोय मी. आणि सुमेधा, ही सगळी दु:खं तू कोणाला सांगतेयस? ज्याला सगळं लिहूनही ७० टक्क्यांच्या वर जाता आलं नाही, ज्याला आत्तापर्यन्त दोन मुलींनी नकार दिलाय, ज्याला ६ इंटरव्ह्यू दिल्यानंतर ठिकठाक जॉब मिळालाय, त्याला? मग आता काय, ‘हो गं, किती बिचारी तू सुमेधा’ असं तुझ्या दु:खाला कुरवाळून मी मैत्री निभवायचीय का?” रोहित मिष्किलपणे म्हणाला.
“काही गरज नाही. ‘नशिबाची ऐशी तैशी’वर मला लेक्चर झोडून तू उत्तम मैत्री निभावली आहेस. आता फक्त पुढच्या इंटरव्ह्यूसाठी शुभेच्छा दे आणि बिल दे. कारण सध्या तरी मी बेकार आहे आणि तू कमावतोयस.” सुमेधा हसत म्हणाली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com