आरुषीला आज हसतखेळत गप्पा मारताना पाहून निखिलला बरं वाटलं. आरुषी पट्टीची ट्रेकर, पण दोन महिन्यांपूर्वी घरात पाय घसरून पडली आणि दोन ऑपरेशन्स झाली तरी ते दुखणं बरं व्हायचं नावच घेत नव्हतं. प्लास्टर काढल्यानंतरदेखील बरीच ट्रीटमेंट घ्यावी लागणार होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला आरुषीला ‘होईल लवकर बरं’ असं वाटलं होतं. तसं तिला काठीचा आधार घेऊन गरजेपुरतं चालता-फिरता येत होतं. मात्र सुधारणेच्या संथ गतीमुळे ती अस्वस्थ व्हायला लागली. काठीकडे नजर गेल्यावर ती उदास किंवा चिडचिडी व्हायला लागली. कुठल्याही विषयावर गप्पा मारताना आरुषी तिचा अपघात, तिचं नशीब किती वाईट वगैरेवर आपोआप यायची. ग्रुपमधलं कुणी ट्रेकला जाणार असेल तर तिला फारच त्रास व्हायचा. तिच्या वागण्याने घरचे कंटाळले, मित्र-परिवार टाळायला लागला.

आज मात्र निखिल बऱ्याच दिवसांनी आणि एक ट्रेक करून भेटायला आला असूनही आरुषीने ‘अलभ्य लाभ, सूर्य कुठे उगवला?’ वगैरे टोमणे न मारता उत्साहाने चौकशी केली.

“आज एकदम खुशीत, आरुषी?” निखिलनं विचारलंच.

“खुशीत नाहीये, पण दुःखातून बाहेर पडले आहे.” आरुषी म्हणाली.

“कसं काय जमवलंस बुवा? कारण हल्ली तुझ्या मूडची धास्तीच वाटायची.”

“अरे, मला भेटायला येणारे लोक कमी होत गेले. तूही मला टाळतोयस असं वाटलं. त्यात एकदा मी संतापाच्या भरात आईवर जोराने ओरडले आणि काठी लांब फेकून दिली. आई नेहमीच खूप समजून घेते, पण तीही मला एक लुक देऊन शब्दही न बोलता खोलीबाहेर निघून गेली. त्यामुळे रागाचा झटका उतरला. फारच अपराधी वाटलं. मग मात्र परिस्थितीचा, माझ्या वागण्याचा आणि परिणामांचा मी शांतपणे आढावा घेतला.

हेही वाचा… जॉर्जिया मेलोनी यांच्यासारखं वागायला आपल्याला जमेल का?…

माझ्या लक्षात आलं, की ती काठी दिसली की माझा राग उफाळून येतोय. मला माझ्या फिटनेसचा किती अभिमान होता. तुलाही माहितीय. ‘आरुषी=फिटनेस’ अशीच माझी इमेज होती.”

“होती नाही, आहे.” निखिलने दुरुस्ती केली.

“तेच, पण त्यामुळे काठीचा आधार घ्यावा लागला की माझा संताप व्हायचा. ‘माझ्यासारख्या slim n swift मुलीवर काठीशिवाय उठताही येत नाही अशी वेळ येणं किती दुर्दैवी.’ अशी सेल्फ पिटी होतीच. त्यात दुखणं लांबत चालल्यावर, ‘समजा पुन्हा चालता नाहीच आलं तर?’ चा धसका बसायचा. ‘या वर्षीचा एव्हरेस्ट बेस कॅम्प तर हुकलाच, पण ट्रेकिंगच संपणार का?’ असं कायकाय मनात यायचं. काठीवर नजर पडून कासावीस व्हायचं.

“त्या दिवशी आई न बोलता निघून गेली, थोड्या वेळाने वॉशरूमला जायचं होतं, पण काठी मीच लांब फेकलेली. मला जागेवरून उठताही येईना आणि त्या क्षणी मला रियलाईझ झालं, की ही काठी तर माझी मैत्रीण आहे. ती आहे म्हणून मी नैसर्गिक क्रियांसाठी तरी कुणावर अवलंबून नाही. नाहीतर किती लाजिरवाणं झालं असतं. घरच्यांना त्रास आणि मला किती हेल्पलेस वाटलं असतं. तरीही मी तिचा फक्त तिरस्कार करतेय. फार अपराधी वाटलं. तो क्षण माझा टर्निंग पॉइंट होता.”

हेही वाचा… साटे-लोटे लग्नांबद्दल कायदा काय म्हणतो?

“खरंच.” निखिल म्हणाला.

“त्यानंतर मी काठीकडे प्रेमानेच पाहायला लागले रे एकदम! आईला हाक मारून ‘‘सॉरी” म्हणाले आणि काठी मागितली तेव्हा माझा टोन अगदी सहज होता. मनातली चिडचिड स्वच्छ धुतली गेली होती. त्या स्वरानं माझं मलाच खूप छान वाटलं. नंतर मी काठीला प्रेमाने कुरवाळून ‘‘सॉरी” म्हणाले. माझ्या मनानं तिला मैत्रीण म्हणून स्वीकारल्यावर जादू झाली बहुतेक. काठीमधला ट्रीगर संपला तसा मनातला रागच संपला. मग मी तिच्याशी गप्पा मारायला लागले.

‘डॉक्टर सांगताहेत बरी होणार आहे म्हणून, तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मला मदत करणाऱ्यांच्या प्रेमाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. तसंही बरी होण्याची तारीख कुणालाच माहीत नाही. पण मन फ्रेश राहिल्याने हीलिंगला मदत होईल, चिडचिडीने नक्की नुकसान आहे. आपल्या माणसांना दुखावणं, त्यांनी मला टाळणं हे मात्र यापुढे चालणारच नाही. आता रडगाणं गाण्याऐवजी मी खुशीचा चॉइस केला आहे हे मी तिला सांगितलं आणि बघ, लगेच तू भेटायला आलास.”

“अगदी बरोबर. तुझा नजरिया बदलला हे टेलिपथीनेच कळलं मला.” निखिल हसत म्हणाला.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The choice is yours in a difficult situation physically weak either can you be self pity or be strong dvr
Show comments