दीपाली बागेत तरातरा चकरा मारत होती. तिच्या मनातली पुटपुट बाहेर ऐकू येत नसली, तरी काहीतरी धुमसतंय हे तिला समोरून हात करणाऱ्या आरतीनं ओळखलं.

“कुणावर वैतागली आहेस एवढी?” आरतीनं विचारलं. “ओह, तू होय? आज लवकर आलीस बागेत?” दीपाली भानावर येत म्हणाली. “हो. तुझी काय चिडचिड चाललीय?” “अगं, माझी नणंद आलीय सकाळपासून. ती आणि तिची आई दोघींनी टोमणे मारून मारून मला हैराण केलंय. नणंदेच्या जिममधल्या काही मुली कशा दर महिन्याला ड्रेस घेतात, ‘आयटी’त नोकरी असल्यावर काय?… असली काही तरी बडबड मुद्दाम माझ्यासमोर करत होत्या. मी फिरायला बाहेर पडले रोजच्यासारखी, तेव्हाही ‘आजकालच्या मुलींना पाहुणे कसे नको असतात…’ वगैरे चालू होतं दोघींचं.”

हेही वाचा – ही कसली आई? प्राईम टाईमच्या मालिकांमध्ये ‘हे’ गंडलेलं आईपण दाखवण्यापेक्षा…

“अगं, पण हल्ली पाहुणे जरा जड होतात हे खरंच आहे. आणि तिच्या जिममधली कुणीतरी खरंच घेत असेल खूप कपडे. तू स्वत:वर कशाला घेतेयस?”
“मला माहीत आहे ना, त्या मलाच म्हणतायत म्हणून…”

आरती हसायला लागली. “अगं, त्यांनी तुझं नाव घेऊन डायरेक्ट काही म्हटलं का? मग त्या दुसऱ्या कुणाबद्दल तरी बोलतायत असं समजायला काय हरकत आहे? अशा तरतरा चकरा मारण्याएवढी चिडचिड कशाला?”

“अगं, असं कसं?” दिपाली गोंधळली तेव्हा आरती कीर्तनकारासारख्या टोनमध्ये म्हणाली, “टोमण्यांचं पण एक शास्त्र असतं ताई, ज्याला टोमणा मारलाय, त्याला तो लागला आणि तो रागवला-दुखावला, तरच टोमण्याचं सामर्थ्य वाढतं. त्या व्यक्तीला टोमणा कळलाच नाही, जीवाला लागलाच नाही, तर तो उलटा जाऊन मारणाऱ्याचं सामर्थ्य कमी करतो, म्हणजे त्याला ‘फ्रस्ट्रेट’ करतो. उद्देश सफल झाला नाही, की टोमणे मारणारा थकतो. टोमणे कमी होतात. हे शास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे वागलात, तर कुणीही तुमच्या मनाला धोका पोहोचवू शकणार नाही असा माझा आशीर्वाद आहे.”

“मस्करी करू नकोस. त्यांनी माझ्या नवीन ड्रेसेस घेण्यावर, लोकांना फारसं घरी न बोलवण्यावर कॉमेंट्स केल्या तरी मी चिडायचं नाही? म्हणजे लोकांनी बाण मारू देत, तू जखमी व्हायचं नाहीस, असं सांगतेयस तू…”

“अगं, त्यांनी तुझं नाव घेऊन बाण मारलाय का? त्या सहजही बोलत असतील. आणि समजा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी तुझ्या दिशेनं बाण सोडलाही असेल, पण तू कशाला छातीवर झेलून जखमी होतेयस? बाजूला सरकून बाण चुकवूपण शकतेस ना?”

“पण मला राग येणारच ना? तुझ्या सासरचे चांगले आहेत म्हणून तुला कळत नाही मला किती त्रास होत असेल ते.”

“आता बाजूनं चाललेले सगळे बाण धावून धावून आपण छातीवर झेलले, लांबून जाणारे बाण पण हातानं झेलून स्वत:च स्वत:च्या छातीत खुपसून घेतले, तर कुणीही रक्तबंबाळ होणारच ना? मला पहिल्यापासून माहितीय तुझं. आपल्या मैत्रिणीसुद्धा तुलाच टार्गेट करत असतात असं वाटतं तुला नेहमी.”

“हो, मग करतातच.”

“अग राणी, प्रत्येक जण तुला दुखवण्यासाठीच जन्माला आलाय, असं गृहीत धरणं जरा जास्त होत नाही का? मग तुला आपलं असं कुणी उरतच नाही. हे बघ, काही लोक कधी कधी ‘टार्गेट’ करतात, काहींना टार्गेट करणं आवडतच नाही. तर काही सतत टार्गेट शोधत असतात. अशा टार्गेट शोधणाऱ्या लोकांसाठी तू एकदम ‘सॉफ्ट टार्गेट’ असतेस! तू चिडचिडी, शंकेखोर झालीस की त्यांना मजा येते. तूही चिडून टोमणे मारलेस, उत्तरं दिलीस, की आणखी मजा येते. मग तू आणखी अस्वस्थ होतेस. असं दुष्टचक्र असतं टोमण्यांचं.”

हेही वाचा – विचित्र मेकअप उत्पादनं; केस रंगवून ‘इंद्रधनुष्यी’ करणारा खडू!

“पण म्हणजे ऐकून घ्यायचं?”

“टोमणे आपल्याला ऐकूच येता कामा नयेत, असं ट्रेन करायचं स्वत:ला! हवेतून जाणारे बाण स्वत:च आपल्या अंगात खुपसून विव्हळत बसणार नाही, असं ठरवायचं. डायरेक्ट कुणी काही म्हणालं तर संवाद करायचा. तर मी काय म्हणते दीपा, आता एक चॉइस तुझ्या हातात आहे. या ‘टोमणे’नामक काल्पनिक आणि हवेतल्या गोष्टी हवेतच सोडून देऊन त्या दोघींसाठी भेळेचं पार्सल घेऊन घरी जायचं, की बागेत आणखी पन्नास चकरा मारायच्या? हे ठरवता येईल तुला.” आरती हसत म्हणाली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com