“ताई, मी उद्या कामावर येणार नाही, मला उद्याची सुट्टी हवी आहे,” आपलं काम करता करता मंदा सुनीतीताईंशी बोलत होती.
“अगं, पण उद्या सुट्टी कशासाठी पाहिजे तुला?”
“ताई, दिवाळीचा फराळ करायचा आहे. मुलांना कपडे, फटाके आणायचे आहेत, मुलांना दिवाळीची सुट्टी लागली आहे.”
मंदा तिचं काम उरकून निघून गेली, पण सुनीतीताई भूतकाळात पोहोचल्या. त्यांना आठवलं, दिवाळीचा सण आला, की घरातील स्वछता, मुलांसाठी कपड्यांची, फटाक्यांची खरेदी, फराळाचे पदार्थ तयार करणं याची किती लगबग असायची. फार पैसे नव्हते,पण कटकसरीतही सर्व काही व्हायचं. चकल्या तळायला, करंज्या, शंकरपाळे करायला सर्वजण मदत करायचे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे सर्वांचे तेल मालिश करून अभ्यंगस्नान आणि नंतर दहीपोहे आणि फराळ सर्वजण एकत्र करायचे. सकाळी सात वाजता फराळ झाल्यानंतर दिवाळी अंकाच्या वाचनाची मजा घ्यायची आणि ‘दूरदर्शन’वरील दिवाळीसाठीचा खास कार्यक्रम बघत लोळत पडायचं. ते सारे दिवस त्यांना आठवले.
आता सर्व सुखसोयी आहेत, पण घरात माणसं नाहीत, निरंजन नेदरलँडला आणि अनुष्का जर्मनीला. घरट्यातून पिलं उडून गेली होती. सुनीतीताई आणि सुनीलराव दोघेच रहात होते. आता दिवाळी असो की कोणताही सण असो, त्यांना काही उत्साहाच राहिला नव्हता. तब्येतीमुळं गोड, तेलकट, मसालेदार पदार्थ खायचे नव्हते. फराळ करायचा कुणासाठी? कधी कधी त्यांना वाटतं, मुलं उगाचच एवढी हुशार निघाली, थोडं शिक्षण कमी घेतलं असतं तर आपल्याजवळ राहिली तरी असती. अनुष्का दोन वर्षांपूर्वी येऊन गेली, पण निरंजनचं लग्न झाल्यावर जो गेला तो अजून आलाच नाही. त्याचा मुलगाही आता पाच वर्षांचा झाला. त्याच्या जन्माच्या वेळेस त्या अमेरिकेला गेल्या होत्या. ६ महिने होत्या. त्यानंतर सुनीलरावांच्या आजारपणामुळे पुन्हा त्याच्याकडे जाता आलं नाही आणि निरंजनलाही त्याच्या कामांमुळे भारतात यायला जमलं नाही. मुले आपल्या जवळ नाहीत म्हणून त्या सतत नाराज असायच्या. मुलं बऱ्याच वेळा व्हिडीओ कॉल करायची, पण तरीही त्यांचं समाधान व्हायचं नाही. आजही त्या उदास बसून होत्या.
हेही वाचा… सरोगसीने मातृत्व प्राप्त झालेल्या मातेला मातृत्व रजेचा हक्क
सुनीतीताई आणि मंदाचं बोलणं सुनीलराव ऐकत होतं. त्यानंतर सुनीतीताईंचे कोणते विचार चालू असतील हे त्यांच्या लक्षात आले. प्रवाहानुसार बदलत राहिलो, तरंच आपण आपलं आयुष्य आनंदानं जगू शकतो, पण सुनीतीताईंच्या हे लक्षात येत नव्हतं. मुलं आपल्याजवळ नाहीत, याचं दुःख त्यांना असायचं. म्हणूनच सुनीलरावांनी मुलांशी बोलून या दिवाळीचा एक प्लॅन ठरवला होता.
सुनीतीताईंनी दिवाळीचा फराळ घरात केलेला नसला तरी सुनीलरावांनी घरगुती फराळ करणाऱ्या मावशींच्या कडून सर्व फराळ बनवून घेतला, दोन्ही मुलांना कुरिअरने पाठवून दिला आणि घरीही आणला होता. दिवाळीच्या पहाटे त्यांनी सुनीतीताईंना लवकर उठवलं, अभ्यंगस्नान झाल्यानंतर नवीन कपडे घालून त्यांना तयार व्हायला सांगितलं. त्यांनी दोन्ही मुलांना व्हिडीओ कॉल केला आणि कॉन्फरन्सवर घेतलं. निरंजन आणि अनुष्का त्यांच्या जोडीदारासह आणि मुलांसह नवीन कपडे घालून आणि फराळाचे ताट घेऊन तयारच होते. निरंजन म्हणाला, “आई, आमच्या लहानपणी दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घातल्यावर तू सर्वांना औक्षण करायचीस, आजही सर्वाना ऑनलाइन औक्षण कर, आम्ही सर्वजण तयार आहोत.”
सुनीतीताईंना खूपच आनंद झाला, सुनीलरावांनी औक्षणाचं ताट तयारच ठेवलं होतं. त्यांनी सर्वांना अतिशय उत्साहात औक्षण केलं.
त्यानंतर अनुष्का म्हणाली, “आई,आता आपण सर्वजण एकत्र फराळ करूया.”
तेवढ्यात सुनीलरावांनी फराळाचे ताट आणि दही पोह्यांची डिश आणली, सुनीतीताईंना खूपच आश्चर्य वाटलं.
निरंजन म्हणाला, “आई,आता आपण सगळे एकत्र फराळ करूया, बाबांनी पाठवलेले सगळे पदार्थ अगदी वेळेवर मिळाले आणि सर्व पदार्थ खूप छान आहेत आणि बरं का आई, आपण दिवाळी पहाटेचा सांस्कृतिक कार्यक्रमही करणार आहोत. पिंकी, प्रतीक तयार आहेत आणि अनुष्काची मोनाही तयार आहे.”
मोनाही आपल्या बोबड्या बोलांनी म्हणाली, “आजी, माझ्या स्कुलमध्ये शिकवलेली पोएम मी तुला म्हणून दाखवनाल आहे आनि ना पिंकी दीदी डांश्श कलनाल आहे.”
सुनीलरावांनी मोठ्या स्क्रीनवर कॅमेरा सेट केला होता, त्यावर सुनीतीताईं नातवंडांचे कौतुक पाहात होत्या. सर्वांशी गप्पा, हसणं खिदळणं झाल्यावर अनुष्काच्या गोड आवाजातील गाणीही त्यांनी ऐकली. सर्वांशी भरभरून बोलणं झालं.
मुलांना बाय बाय केल्यानंतर सुनीलराव सुनीतीताईंचे निरीक्षण करीत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. कृतार्थ नजरेनं त्यांनी विश्वासरावांकडे पाहिले आणि म्हणाल्या,
“एवढं सगळं केलंत आणि मला पत्ताही लागू दिला नाहीत.”
हेही वाचा… गरजू स्त्रियांसाठीची ‘साडी बँक’!
”सुनीती, तू खूष झालीस ना, मग बस, मला हेच हवं होतं. अगं, आहे त्या परिस्थितीत आपला आनंद आपणच शोधायचा, उगाच दुःख कशाला करीत बसायचं? आपण आपलं कर्तव्य केलंय, आता मुलांना त्यांचं आयुष्य आहे. पिल्लांच्या पंखात ताकद येईपर्यंत पक्षीणही आपल्या पिल्लांना जपते, उडायला शिकवते. मग त्या विस्तिर्ण आकाशात ते झेपावतात. ती कधीच पिलं परत येण्याची वाट बघत बसत नाहीत. मुलं फक्त त्यांच्या कामासाठी परदेशात गेली आहेत, पण तुझ्यापासून ती दूर गेलेली नाहीत, हे आज तुला पटलं की नाही? तुझे संस्कार, तुझ्या आठवणी त्यांच्याकडे आहेतच. आता स्वतःला बदलायचं, नाती आणि प्रेम ऑनलाइनही साजरं करता येतं.”
“ हो खरंय तुमचं म्हणणं, माझी दिवाळी खरचच खूप चांगली झाली, यापुढे मुलं जवळ नाहीत याचं दुःख करत बसण्यापेक्षा मी त्यांच्याशी कोणत्या पद्धतीनं कनेक्ट होता येईल याचा विचार करेन.”
कधी नव्हे ते सुनीतीताई भरभरून बोलत होत्या आणि सुनीलराव समाधानाने सर्व ऐकत होते.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smitajoshi606@gmail.com)