अनेक लाखो वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य या पृथ्वीवर अस्तित्वातदेखील नव्हता, तेव्हा प्रचंड आकाराचे डायनोसॉर या पृथ्वीवर असल्याचे आपण कायम पुस्तकांमध्ये वाचले आहे. व्हिडीओ किंवा संशोधनाच्या आधारावर त्याचे पुरावे वेळोवेळी समोर आले आहेत. मात्र, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा पृथ्वीवर आदळलेल्या दोन लघुग्रहांमुळे शेवटी हे महाकाय प्राणी ह्रास पावले असल्याचे म्हटले जाते. परंतु, सध्याच्या या प्रगत आणि सतत विकसित होत असणाऱ्या जगातही पृथ्वीवरून नामशेष होण्याचा धोका अद्यापही असंख्य प्राणी-पक्ष्यांना कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ह्रास पावणारे प्राणी म्हटले की आपल्यासमोर एक शिंगी गेंडा, वाघ, सिंह, काळवीट, पेंग्विन्स, यांसारख्या किती वन्यजीवांची नावे लगेच डोळ्यासमोर येतात. परंतु, आपल्याच भारतात आसाम राज्यातील ‘हरगीला’ नावाच्या पक्षाबद्दल क्वचितच कुणी ऐकले असेल. हरगीला हे पक्षीदेखील नामशेष होण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. परंतु, आसाममधल्या ‘पूर्णिमादेवी बर्मन’ यांच्या पुढाकाराने आणि त्यांनी या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे आज हे पक्षी ‘लुप्त’ होत चाललेल्या पक्ष्यांच्या श्रेणीतून काढून, त्यांचे ‘नियर थ्रेटन्ड’ या श्रेणीमध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने (IUCN) वर्गीकरण केले आहे. इतकेच नाही तर नुकत्याच व्हिटली फंड फॉर नेचरने (WFN) पूर्णिमादेवी बर्मन यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना २०२४ च्या व्हिटली गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोण आहेत या पूर्णिमादेवी बर्मन आणि त्यांची दहा हजारांहून अधिक स्त्रियांची ‘हरगीला आर्मी’ पाहूया. परंतु, त्याआधी नामशेष होण्याची भीती असलेल्या हरगीला पक्षाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ.

हेही वाचा : ‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…

हरगीला पक्षी [The greater adjutant stork]

हरगीला हा आकाराने अतिशय मोठा असून, हा करकोचा समूहातील पक्षी आहे. या पक्षाची उंची साधारण साडेचार ते पाच फूट इतकी असू शकते. त्याच्या पंखांची लांबी ही साधारण आठ फूट इतकी असू शकते. अतिशय जाड, लांब चोच आणि निळेशार डोळे असे या पक्षाचे साधारण वर्णन करता येते. या पक्षाच्या गळ्याभोवती लालसर रंगाची लटकणारी पिशवी असल्याचेदेखील आपल्याला खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहता येते.

फोटो :

हरगीला पक्षी -The greater adjutant stork [credit – BBC]

बेडूक, साप, मासे, कोणतेही मृत जीव, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उपलब्ध असणारे खाद्य असा या पक्ष्यांचा आहार आहे. तसेच मानवी वा प्राण्यांच्या शरीरातून उत्सर्जित केलेले टाकाऊ पदार्थदेखील हरगीला खातात. त्यामुळे त्यांना सफाई कामगार असेदेखील म्हटले जाते. म्हणूनच धोक्यात असणाऱ्या या पक्ष्यांची संवर्धन करणे आणि त्यांना लुप्त होण्यापासून वाचवणे महत्त्वाचे आहे, असे पूर्णिमादेवी बर्मन यांचे मत आहे.

हरगीला संवर्धन प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?

पूर्णिमादेवी बर्मन या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ [wildlife biologist] आहेत. २००७ साली, पूर्णिमादेवी यांनी त्यांच्या पीएचडीसाठी ‘हरगीला’ पक्ष्यांवर अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना संवर्धन म्हणजे एखाद्या विषयावर केवळ अभ्यास आणि संशोधन करणे इतकेच महत्त्वाचे असते असे वाटत होते. परंतु, त्यांना आलेल्या एका फोनमुळे त्यांचा संवर्धन आणि हरगीला पक्ष्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला.

पूर्णिमादेवी यांना, ‘कुणीतरी झाड तोडत आहे’ असा संदेश देणारा गावातील एका कुटुंबाचा फोन आला. तेव्हा त्या ठिकाणी नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी पूर्णिमादेवी तिथे पोहोचल्या असताना त्यांना दिसले की, एका झाडावर नऊ हरगीला पक्ष्यांची घरटी असून, त्यात नऊ पिल्लं होती आणि त्या माणसाने झाड तोडताच, सर्व घरटी आणि त्यामधील पिल्लं उंचीवरून खाली जमिनीवर कोसळली.

खाली पडलेल्या पिल्लांपैकी अगदी काही पिल्लंच जिवंत राहिली होती. हा सर्व प्रकार पाहून पूर्णिमा देवींनी झाड तोडणाऱ्या माणसाला ‘त्यांनी असे का केले’ असा प्रश्न केल्यावर त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. आजूबाजूचे लोकदेखील पूर्णिमा देवींची खिल्ली उडवू लागले. इतकेच नाही, तर हे पक्षी अतिशय अस्वच्छ, दुर्गंध पसरवणारे आणि अशुभ आहेत; हे पक्षी जिवंत असण्याची काहीही गरज नाही, असे तेथील लोकांचे म्हणणे असल्याचे पूर्णिमा देवींना समजले.

पूर्णिमा देवींसह घडलेला हा प्रकार त्यांना या पक्ष्यांबद्दल, पक्ष्यांच्या भविष्याबद्दल विचार करायला लावणारा होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या पक्ष्यांवर केवळ अभ्यास आणि पीएचडी पुरेशी नसून, या पक्ष्यांबद्दल लोकांचे विचार बदलण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी नेस्ट ट्री मालक [nest tree owner], शाळा आणि विद्यार्थी, महिला, सरकार, वन विभाग अशा विविध समूहांची मदत घेण्यास सुरुवात करून, हरगीला संवर्धनाच्या प्रकल्पाला सुरुवात केली.

हेही वाचा : हडप्पा संस्कृतीमध्ये झाला का वांग्याच्या भाजीचा उदय? वाचा शेफ कुणाल कपूरने दिलेली माहिती….

‘हरगीला आर्मी’ कशी तयार झाली?

सुरुवातीला नेस्टिंग ट्री मालकांचे जाहीरपणे कौतुक करून, त्यांना प्रोत्साहन आणि शिक्षण देण्याचे काम पूर्णिमा देवींनी सुरू केले. विविध कार्यक्रमाचे आणि सभेचे नियोजन त्या करू लागल्या. परंतु, या सर्वांमध्ये महिलांचा सहभाग अतिशय कमी होता. त्याचे कारण विचारता असे लक्षात आले की, घरातील कामांमुळे महिला हरगीला संवर्धनाकडे लक्ष देऊ शकत नव्हत्या. मात्र, यावर उपाय म्हणून पूर्णिमादेवी यांनी महिलांना पारंपरिक पाककला स्पर्धेसाठी बोलावण्यास सुरुवात केली. पूर्णिमा देवींची ही युक्ती काम करून गेली.

हळूहळू बऱ्याच महिलांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. पुढे, पूर्णिमादेवी आणि या महिलांनी मिळून हरगीला पक्ष्यांसाठी ‘बेबी शॉवर’ म्हणजेच डोहाळेजेवण कार्यक्रम सुरू केला. सुरुवातीला पूर्णिमादेवी यांची ही कल्पना ऐकून सर्व स्त्रियांनी त्यांची मस्करी केली. परंतु, इतर गरोदर स्त्रियांचे जसे कौतुक केले जाते, त्यांना आशीर्वाद दिले जातात, त्याचप्रमाणे हरगीला पक्षालादेखील अशी वागणूक मिळावी यासाठी त्यांनी ही पद्धत सुरू केली.

एकमेकांच्या मैत्रीतून आणि एकच ध्येय असणाऱ्या या महिलांनी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपली ‘हरगीला आर्मी’ स्थापन केली. या आर्मीमध्ये एकूण दहा हजारांहून अधिक स्त्रिया असून, वर्ष २०२३ पर्यंत तब्ब्ल चार हजार स्त्रिया दररोज हरगीला पक्षाच्या संवर्धनासाठी, जनजागृतीसाठी काम करत आहेत. आता या आर्मीचा आकडा दुप्पट करण्याकडे म्हणजेच २० हजार स्त्रियांची हरगीला आर्मी तयार करण्याचे ध्येय पूर्णिमा देवींचे असल्याचे त्यांनी व्हिटली गोल्ड पुरस्कार सोहळ्यात सांगितले आहे.

संवर्धन करण्यासाठी लोकांना एकत्र करणे आणि पुढील पिढीला त्याचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे असल्याचे पूर्णिमादेवी म्हणतात. पूर्णिमादेवी यांचे हरगीला संवर्धन महिलांसाठी आणि आसाममधील लोकांच्या उपजीविकेसाठीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. “आसाममधील विणकाम करणाऱ्या स्त्रिया, कपड्यांवर हरगीला पक्ष्यांचे नक्षीकाम करून अशी उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीसाठी पाठवली जातात. त्यामुळे सुरुवातीला केवळ काम म्हणून विणकाम करणाऱ्या या स्त्रिया, आता हरगीला संवर्धनाचे एक ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विणकाम करत आहेत”, असे पूर्णिमादेवी म्हणतात.

फोटो :

हरगीलाचे नक्षीकाम करणाऱ्या या स्त्रिया [credit – BBC]

हरगीला संवर्धनाला मिळालेले यश आणि पुरस्कार

२००७ सालापासून पूर्णिमादेवी बर्मन यांनी हरगीला संवर्धनाला सुरुवात केली होती. त्यावेळेस नामशेष होणाऱ्या या हरगीला पक्ष्यांचा आसाम राज्यातील आकडा हा ४५० पेक्षाही कमी असल्याचे बीबीसीच्या एका लेखातून समजते. परंतु, पूर्णिमा देवींच्या अथक प्रयत्नांतून आणि विविध उपक्रमांमुळे या पक्ष्यांचा आकडा हा १८०० पर्यंत पोहोचला आहे. या आकड्यांची आणि पूर्णिमा देवींच्या कामाची दखल घेऊन, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने (IUCN) या पक्ष्यांना नामशेष प्रजातींच्या श्रेणीमधून काढून, धोक्यात असणाऱ्या प्रजातींच्या श्रेणीमध्ये वर्गीकृत केले आहे.

पूर्णिमादेवी यांच्या या कार्यासाठी त्यांना वर्ष २०१७ साली व्हिटली फंड फॉर नेचर (WFN) तर्फे व्हिटली पुरस्कार देण्यात आला होता, तर यंदा २०२४ रोजी व्हिटली गोल्ड पुरस्कार देऊन पूर्णिमादेवी आणि त्यांच्या हरगीला आर्मीला सन्मानित करण्यात आले आहे.

“सुरुवातीला हरगीला पक्षाची केवळ २४ घरटी गावामध्ये होती. मात्र, आता त्यांची संख्या २५० पर्यंत पोहोचली आहे. इतकेच नाही तर हा आकडा जगातील हरगीला पक्ष्यांचा सर्वात मोठ्या समूहाचा / वस्तीचा आकडा आहे.” “वर्ष २०१० पासून एकही झाड या गावामध्ये कापले गेले नाहीये. त्यामुळे हे चित्र अत्यंत आशादायी आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास ४०० हरगीला पक्ष्यांचे जंगलात यशस्वीरीत्या पुनर्वसनदेखील केलेले आहे”, असे पूर्णिमादेवी म्हणतात.

“संवर्धन करताना त्या कामात खंड पडता कामा नये, हे पूर्ण वेळ लक्ष देण्याचे काम आहे. १५ वर्षांच्या माझ्या या प्रवासामध्ये माझ्यासमोर अनेक अडथळे आले, अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला; परंतु मी हार मानली नाही. लोकांचा आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या कृतीवर अधिक विश्वास असतो, त्यामुळे परंपरा आणि संस्कृती यांच्या जोडीने या पक्ष्यांना अशुभ न म्हणता त्यांची ओळख एक सांस्कृतिक चिन्ह म्हणून नक्कीच करता येऊ शकते. आता हरगीला पक्ष्यालादेखील इतर सर्व प्राण्यांप्रमाणे समान ओळख आणि वागणूक दिली जात आहे आणि याचा मला प्रचंड आनंद होत आहे. त्यामुळे, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हरगीला पक्ष्यांसाठी लढत राहीन”, असे पूर्णिमादेवी बर्मन यांनी टेड एक्समध्ये दिलेल्या भाषणात म्हटले आहे.

[https://www.discoverwildlife.com/environment/how-10000-women-saved-indias-rarest-stork
https://whitleyaward.org/winners/on-the-double-rapidly-increasing-greater-adjutant-numbers-through-scaling-up-women-led-advocacy/
https://www.youtube.com/watch?v=sYztruMbzWo%5D

वर दिलेल्या संदर्भ लिंक या बीबीसी वाईल्ड लाईफ, व्हिटली फंड फॉर नेचर, पूर्णिमादेवी बर्मन यांचे टेड एक्समधील भाषण यांच्या आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The greater adjutant stork indian endangered species how purnima devi barman trying to save these birds with 10 thousand women hargila army chdc ltdc dha
Show comments