डॉ. अभिजित देशपांडे (निद्राविकारतज्ज्ञ)
‘लक्षात ठेवा, रात्र ही झोपेकरिता नाही, तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यावर बसल्यावरही घेता आली पाहिजे.’ हे सुप्रसिद्ध उद्गार थोरल्या बाजीराव पेशव्यांचे. आपल्या धाकट्या भावाला, चिमाजीआप्पाला जरी गनिमी काव्याविषयी समजावताना सांगितले असले तरी या उद्गारामागे एक महत्त्वाची बाब दृष्टीस पडते, ती म्हणजे बाजीरावांचे स्वत:च्या झोपेबद्दल असलेले नियंत्रण! कुठून आली असेल ही हुकमी झोप?
बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे, ही नोंद अनेक ऐतिहासिक बखरींमध्ये स्पष्ट आहे. आगगाडीमध्ये बसलो असता, लयबद्ध गती प्राप्त झाली की, आपल्यापैकी बरेच जण पेंगू लागतात. यालाच ‘एनट्रेन्मेंट’ असे म्हणतात. मला वाटते की, बाजीरावानेदेखील घोड्यांच्या टापांच्या लयीचा तसेच कमीजास्त गतीचा वापर करून दिवसभरामध्ये निद्रा घेण्याची किमया (एनट्रेन्मेंट) वापरलेली असावी. बाजीराव पेशव्यांनी ४१ महत्त्वाच्या लढाया केल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. सन १७२७ ची पालखेडची लढाई बाजीरावाच्या सैन्याने महिनाभर द्रुतगतीच्या गनिमी काव्याने जिंकली. दुसऱ्या महायुद्धामध्ये नेतृत्व केलेल्या जनरल माँटगोमेरीने युद्धविषयक लिहिलेल्या पुस्तकामध्ये या लढाईचा गौरवास्पद उल्लेख आढळतो.
आणखी वाचा- आपल्या मुलींनीही आजीसारख्याच चौकटी भेदाव्यात- अक्षता मूर्ती
अनेक बौद्धिक प्रश्नांवर निद्रेनंतर उत्तर सापडते हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. युद्धविषयक व्यूहरचना करण्यामध्ये बाजीरावाला या प्रकारच्या (घोड्यावरच्या) निद्रेची निश्चितच मदत मिळालेली आहे. वरील सर्व विवेचन हुकमी झोपेचे महत्त्व स्पष्ट करते. मराठेशाहीच्या या सर्वात यशस्वी सेनापतीच्या हुकमी झोपेचा पाया हा बहुभाजित (पॉलीफेजिक) निद्रेमध्ये आहे. पॉलीफेजिक झोप म्हणजे २४ तासांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने घेतलेली खंडित झोप.
विशेष म्हणजे आपल्याला हवा तेव्हा झोपेचा एक टप्पा आपल्या हुकमावर पार करता आला पाहिजे. अशा हुकमी झोपेचे वरदान आपल्यास मिळावे अशी सर्व महत्त्वाकांक्षी वाचकांची अपेक्षा असेल, पण त्याकरिता आपल्याला थोडेसे झोपेबद्दल जाणून घ्यावे लागेल. झोपेचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एकाला आर.ई.एम. (रॅपिड आय मोशन), तर दुसऱ्याला नॉन-रॅपिड आय मोशन असे म्हणतात.
आणखी वाचा- विवाह समुपदेशन : लग्नाचाही प्रोबेशन पीरियड असतो?
अ) रॅपिड आय मोशन – याला विरोधाभासयुक्त (पॅराडॉक्सिकल) झोप म्हणतात, कारण या अवस्थेत मेंदू जागृतावस्थेपेक्षादेखील दीड पटीने जास्त काम करत असतो, तर शरीर हे पूर्णपणे लुळे पडलेले असते. या अवस्थेला पतंजलीने तेवीसशे वर्षांपूर्वी स्वप्नावस्था असे नाव दिलेले आहे. आधुनिक शास्त्राला मात्र हा शोध १९५७ साली लागला. या शोधामुळे निद्राशास्त्रात एक क्रांती घडून आणली.
सरासरी २० टक्के झोप ही या प्रकारात मोडते. या झोपेचे महत्त्व अजूनही पूर्णत: कळलेले नाही. एका सिद्धांतानुसार अगोदर घडलेल्या घटना तसेच शिक्षण हे या झोपेमध्ये व्यवस्थित रचले जाते. ही झोप रात्रीच्या उत्तरार्धात वाढत जाते, किंबहुना सकाळी ४ ते ६ च्या दरम्यान असलेली साखरझोप बहुतांश हीच झोप असते. माणूस शारीरिकदृष्ट्य़ा कष्ट करून दमला तरीही ही झोप आणता येत नाही. काही विशिष्ट वेळांनाच ही झोप येते.
२) नॉन रॅपिड आय मोशन – झोपेतील ८० टक्के भाग हा या प्रकारच्या झोपेने व्यापला आहे. ही झोप तीन पायऱ्यांमध्ये विभागली आहे. पहिली पायरी म्हणजे ही संधी झोप (ट्वायलाइट) असते. या झोपेचे वैशिष्ट्य म्हणजे स्नायूंमध्ये कमी प्रमाणात शिथिलीकरण झालेले असते. तसेच नेत्रगोलही हळूहळू फिरत असतात. ही झोप जास्तीत जास्त ५ टक्के असावी, कारण या झोपेतून विश्रांती मिळत नाही.
आणखी वाचा- Open Letter: “आम्हाला आळशी म्हणण्यापेक्षा…” सोनाली कुलकर्णीला भारतीय मुलीचं खुलं पत्र
दुसऱ्या पायरीच्या झोपेत मेंदू स्थिरावतो. काही विशिष्ट प्रकारच्या लहरी मेंदू आलेखनात दिसतात. ही झोप ७० टक्के प्रमाणात असते. झोपेची औषधे या पायरीची झोप वाढवतात. तिसरी पायरीवरच्या या प्रकारच्या झोपेला लहान मुलांची झोप, गाढ झोप असेही म्हणतात. लहान मुले ५० टक्के किंवा जास्त प्रमाणात या पायरीवर असतात. जसे वय वाढते तशी ही झोप कमी होत जाते. वयाच्या तिसाव्या वर्षी ३० टक्के, साठाव्या वर्षी १५ टक्के आणि सत्तराव्या वर्षांनंतर ५ टक्क्यांपेक्षाही कमी होते. शारीरिक कष्टानंतर अथवा व्यायामानंतर या झोपेचे प्रमाण वाढते, तर अतिरिक्त कॉफी पिणे, मानसिक चिंता यांनी या झोपेचे प्रमाण खूप कमी होते. झोप हुकमी होण्याकरिता पॉलिफेजिक झोपेचा अवलंब करावा लागतो. निसर्गत: मनुष्यप्राण्याचा प्रवासदेखील पॉलिफेजिक ते मोनोफेजिक असाच झालेला आहे. उत्क्रांतीकडे लक्ष दिले असता हीच बाब लक्षात येते.
पॉलिफेजिक ते मोनोफेजिक : उत्क्रांतीचा प्रवास
माकड आणि मानव सोडल्यास इतर सर्व सस्तन प्राण्यांमध्ये ‘निद्रावस्था’ आणि ‘जागृतावस्था’ दिवसातून अनेक वेळेला आलटून-पालटून येतात (पॉलिफेजिक पॅटर्न). अगदी लहान जनावरांमध्ये मेटाबॉलिझमचा (चयापचयाचा) वेग जास्त असल्यामुळे ऊर्जेची निकड ही तासागणिक असते. त्यामुळे सतत खाणे ही त्यांची गरज असते. सलग झोपणे त्यांना परवडत नाही. तसेच अतिधोक्याच्या वातावरणामध्ये एकगठ्ठा झोप म्हणजे प्राणाशी गाठ ठरू शकते. जिराफासारखा उंच प्राणी उठून उभे राहायलाच दहा सेकंद घेतो. या कारणामुळेच कदाचित जिराफ रात्रीत एका वेळेला ६० ते ७५ मिनिटांचीच झोप घेतो.
झोपेनंतर जागेपणा हे चक्र माकडांमध्ये १२ तासांत पूर्ण होत असल्यामुळे २४ तासांत हे दोनदा घडते. यालाच द्विभाजित झोप म्हणतात. चिंपाझींमध्ये द्विभाजित झोप आढळते. संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत १० ते ११ तास झोप काढल्यावर दुपारी परत ३ ते ४ तासांची वामकुक्षी असते, पण ही वामकुक्षी गाढ झोपेची नसून मधेमधे सजगता असते. सर्वसामान्य माणसांमध्ये झोप २४ तासांत एकदाच (मोनोफेजिक) घडते.
प्राणिसृष्टीच्या उत्क्रमणानुसार झालेले बदल हे आपल्याला प्रत्येक मानवी आयुष्यप्रवाहात दिसतात. अगदी जन्म झाल्यानंतर अर्भकावस्थेत बहुभाजित (पॉलिफेजिक) झोप, बाल्यावस्थेत वानरांप्रमाणेच द्विभाजित झोप आणि तरुणपणी अखंड रात्रभर झोप असा प्रवास आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. अर्थात ही निसर्गत: असलेली पॉलिफेजिक झोप ही हुकमी झोप नाही, पण या सर्व विवेचनाचा उद्देश अशासाठी आहे की, आपण हुकमी झोप मिळविण्यासाठी मोनोफेजिक (२४ तासांत एकदाच) ते पॉलिफेजिक (बहुभाजित) असे परिवर्तन केले तरी ते अनैसर्गिक ठरणार नाही.
काही वैज्ञानिकांच्या तर्कानुसार इ.स. दहा हजार वर्षांपूर्वी मानव एकसंध झोपेकडे वळू लागला.
(हे सदर दररविवारी प्रसिद्ध होईल)
abhijitd@iiss.asia