मंगला जोगळेकर
तुम्ही कंपनीचे संचालक असा, नाहीतर कामकरी… पुरेशा झोपेवाचून जीवन अशक्य आहे, याची पक्की खूणगाठ बांधा. ‘झोप ही रिकामटेकड्यांसाठी आहे’, ‘उद्योगी माणसाला झोप परवडत नाही’, असे म्हणणारे बरेच असतात. तरुण वयात काम नाही करायचं तर केव्हा? असाही प्रश्न बरेच जण विचारतात. हा प्रश्न रास्त असला, तरी अति कामाबरोबर अकाली येणारे अनारोग्य स्वागतार्ह नाही. आपल्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते. झोपल्यावर शरीरातील इंद्रियांचे, अवयवांचे कार्य कमीत कमी चालू राहते आणि त्यातून त्यांना विश्रांती मिळून त्यांची झीज भरून येते.
शरीरातील सर्वच इंद्रियांना झीज भरून काढण्यासाठी झोपेची आवश्यकता असते असे नाही. उदा. स्नायू. शरीराची हालचाल थांबून ते विश्रांती घेत असतानादेखील स्नायू भरून येऊ शकतात. परंतु शरीराच्या अशा विसाव्याच्या स्थितीत (म्हणजे झोपलेले नसताना) मेंदूला मात्र दक्षच राहावे लागते. जेव्हा शरीर झोपेच्या स्वाधीन होऊन पूर्ण विश्राम पावते तेव्हाच मेंदूला पाहिजे तो विसावा मिळतो.
हृदयाचा वेग कमी होतो, रक्तदाब कमी होतो. झोपेमध्ये न्यूरॉन्सच्या नवनिर्मितीसाठी आवश्यक अशा प्रथिनांचे उत्पादन केले जाते. शरीरातील पेशी आपली झीज भरून काढतात. नवीन पेशींची निर्मिती होते. मेंदूतील पेशी, न्यूरॉन्सही झीज भरून काढतात, आपल्या अवतीभोवतीची नको असलेली रसायने काढून टाकतात. हव्या असलेल्या रसायनांची निर्मिती करतात. दुकाने जशी ‘स्टॉक टेकिंग’साठी बंद असतात ना, तसेच स्टॉक टेकिंग मेंदूला रोज आवश्यक असते; कारण मेंदूचे काम किती अवाढव्य आहे याची तुम्हाला कल्पना आहेच.
दिवसभर डोळ्यांत तेल घालून राबणाऱ्या मेंदूला हे काम करण्याची संधी फक्त रात्रीच मिळू शकते. रात्री अशा रीतीने विश्रांती झाली, तर दुसऱ्या दिवशीचे काम पूर्ण शक्तीनिशी करायला मेंदू सिद्ध होतो. बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यावर कालच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचा ‘युरेका’ अनुभव तुम्हाला आला असेल. याचे कारण रात्री मेंदूने तुमच्या नकळत त्यावर काम करून ठेवलेले असते.
संशोधकांच्या आवडीचा विषय
झोपेबद्दल आत्तापर्यंत इतके संशोधन झाले आहे, की त्याबद्दल खूप काही सांगता येईल. हे संशोधन ‘एमआरआय’ तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.
मेंदूतील ‘फ्रंटल लोब’ कल्पनाशक्तीचा अधिष्ठाता आहे. माणसात असलेले कौशल्य याची देणगी. पण झोप नसेल, तर या कौशल्याची जादू हरपून बसल्याचा प्रत्यय येतो. मेंदूतील भाषेचा विभाग ‘टेम्पोरल लोब’- याला जागृतावस्थेत थांबायचे ठाऊकच नाही. परंतु अति थकव्यामुळे हा भाग काम करायला जणू नकार देतो. अशा व्यक्तीच्या तोंडून शब्द नीट फुटत नाहीत, शब्दोच्चार नीट होत नाहीत. मेंदू मग त्याचं काम काही काळ वेगळ्या भागाकडे सुपूर्द करतो. भाषेच्या बाबतीत जे दिसतं, तेच गणिताच्या बाबतीतही दिसून येते. रात्री शांत झोपलेल्यांच्या ‘पेरिएटल लोब’मध्ये गणिताचे प्रश्न सोडवण्याचे काम चालू आहे असे दिसून येते. परंतु ज्यांची पुरेशी विश्रांती झालेली नाही, त्यांच्या बाबतीत पेरिएटल लोबच्या कामाचा अधिभार दुसऱ्या भागाकडे दिला जातो.
मेंदूच्या कामाबद्दल एक वेगळी गोष्ट मला समजली. ‘प्री-फ्रंटल लोब’ हा मेंदूचा अतिउद्योगी भाग. त्याला अग्रक्रमानं विश्रांती मिळण्यासाठी आपल्याला झोप लागली की प्रथम हा भाग निवांत होतो. थोडय़ाशा विश्रांतीनं तो ताजातवाना होतो. मग रात्रभर टक्क जागं राहायला तयार.
नमन निद्रादेवीला
- तुमची स्मरणशक्ती बिनभरवशाची झाली आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर प्रथम तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का?, असा प्रश्न स्वत:ला विचारा.
- पूर्ण झोप मिळेल अशा तऱ्हेने तुमचे कामाचे ‘रुटीन’ बसवा. केवळ रोज सात ते आठ तास झोप घेतल्यामुळे तुमच्या स्मरणशक्ती आणि इतर प्रश्नांमध्ये ५० टक्के सुधारणा होऊ शकते असे संशोधक सांगतात.
- पुरेशा झोपेमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि काम करायला तरतरी येईल. पण झोपेवाचून काम करायची वेळ आलीच, तर कामाच्या मध्ये पाच-दहा मिनिटांच्या छोट्या सुट्ट्या घ्या.
- चहा प्यायला बाहेर जा, ऑफिसमध्ये थोडी चक्कर टाकून या, बाहेरच्या झाडांकडे नजर टाका, पक्ष्यांची चिवचिव ऐका, जेवणाच्या सुट्टीत सहकाऱ्यांशी गप्पा मारा, काम करताना तुमच्या आवडीचं संगीत ऐका… यामुळे मेंदूला जरा बदल होऊन सततच्या कामाच्या विचारचक्रातून तो क्षणभर को होईना, बाहेर पडेल. आणि त्याला जरुरीचा थोडासा तरी विसावा मिळेल.
- सात-आठ तासांची झोप तुमच्या कामाच्या धबडग्यात घेणं अशक्य असेल, तर मेंदू आपला सतत गुलाम म्हणून काम करेल अशी अपेक्षा करू नका.
- स्मरणशक्ती कमी होते आहे, म्हणून त्याला दोष देऊ नका. उलट स्मरणशक्ती टिकवण्यासाठी मेंदूला आपण कशी मदत करू शकतो असा विचार करा.
mangal.joglekar@gmail.com