द केरला स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. केरळमधील ३२ हजार महिलांना ISIS मध्ये दाखल करण्यात आल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आल्यावर देशाच्या राजकारणात नव्या वादाला सुरुवात झाली. चित्रपटातील सर्व कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, एवढंच नाही तर मुख्य अभिनेत्री अदा शर्माचा फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर लीक करण्यात आली, या घटनेबाबत वाचल्यावर आणि हा चित्रपट पाहिल्यावर मनात पहिला विचार येतो खरंच एकविसाव्या शतकात महिला सुरक्षित आहेत का? एका अभिनेत्रीचा वैयक्तिक डेटा व्हायरल होऊ शकतो, तर आपलं काय?
हेही वाचा : “सेटवर अभिनेत्याला मारहाण…” ‘तारक मेहता’मधील ‘बावरी’चा धक्कादायक खुलासा, म्हणाली “तो अतिशय घाणेरडा…”
राजकारण, प्रपोगंडा हे सगळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करणारे शब्द बाजूला काढून जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली होती. निर्मात्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे संबंधित चित्रपटाचे कथानक खरे आहे असे आपण फक्त ५ मिनिटांसाठी जरी गृहित धरले तरीही देशातील मुलींना अगदी सहज अफगाणिस्तानात नेले जाते यावरून परिस्थिती किती वाईट आहे याची कल्पना तुम्हाला येईल. ३२ हजार नाही, अगदी ३२ पण नाही, मी म्हणेन एका महिलेचा जरी असा अमानुष छळ झाला असेल तरीही ते अयोग्यच आहे.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा फोन नंबर लीक? अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर दिली धमकी…
शालिनी उन्नीकृष्णन हे पात्र प्रभावीपणे साकारलेल्या अदा शर्माच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले, परंतु आजही लोक चित्रपट अशा धाटणीचा होता म्हणून चालला नाही तर अदाला कोणीही विचारले नसते, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया तिने पोस्ट केलेल्या फोटोंखाली देत असतात. पण, अदाने दाखवलेल्या हिंमतीचे काय? एका मुलाखतीदरम्यान अदा म्हणाली होती, “चित्रपटातील बलात्काराची दृश्य पाहून माझी आजी काय विचार करेल याची माझ्या मनात भीती होती…” अदाला एक गोष्ट आवर्जून सांगेन तू जी भूमिका साकारलीस ते पात्र जिवंत करण्यासाठी जी मेहनत घेतलीस ते कदाचित अलीकडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनादेखील जमणार नाही, कारण बॉलीवूडचे चित्रपट सुंदर बंगले, चैनीत आयुष्य जगणारे हिरो-हिरोइन यांची कथा दाखवण्यासाठी परिपूर्ण असतात पण, द केरला स्टोरीच्या निर्मात्यांनी आयुष्यातील एका चुकीच्या निर्णयामुळे महिलेच्या आयुष्याची राखरांगोळी कशी होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर चित्रपटांमधील महिला पात्र तुम्हाला नव्याने कसे जगावे आणि बरंच काही शिकवतात. याउलट अदाने साकारलेले पात्र आयुष्यात काय चुका करू नये हे शिकवते. चित्रपट बघताना मला स्वत:ला एवढा तणाव जाणवला की, ही भूमिका अदा शर्माची मानसिकस्थिती काय झाली असेल याबाबत कल्पनाही करू शकत नाही.
सत्य-असत्य, प्रोपंगडा-राजकारण यामध्ये न पडता केवळ एक महिला म्हणून चित्रपट पाहिल्यावर, आपण आपली खरी ओळख जपून किती चांगले, सुखी आयुष्य जगतोय याची प्रचिती मला आली. आयुष्यात काहीही झाले तरीही घरच्यांना विशेषत: आई-वडिलांना अंतर देऊ नये ही, शिकवण यातून मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं “मेरी मॉं सब ठिक कर लेगी…” चित्रपटातील या डायलॉगप्रमाणे सर्व संकटं ‘आई’ अगदी सहज दूर करेल हा विश्वास मिळाला.
पीडित स्त्रियांचा आकडा ३२ हजार असो, ३२ असो किंवा फक्त १…अन्याय हा अन्यायच असतो. ३२ हजार महिलांचे आणि एका स्त्रीचे दु:ख वेगळे नसते. किती महिलांवर अन्याय झाला या आकड्यापेक्षा अन्यायाविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. समाजातील काही भागात अजूनही स्त्रियांकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जाते हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. या मानसिकतेत लवकरच बदल होईल हीच अपेक्षा.