“सुजित सगळी तयारी झाली आहे. तू आई-बाबांना घेऊन येऊ शकतोस.”

सारिकाचा फोन आल्याबरोबर सुजित आईबाबांना घेऊन घराकडे निघाला. वसंतराव आणि जयश्रीताईंना सुजित हा एकुलता एक मुलगा होता. एकच मूल होऊ द्यायचं, असं दोघांनी ठरवलं होतं. दोघांची नोकरी होती. घरात सुजितकडं बघणारं कुणीच नव्हतं. त्यामुळं घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करता करता त्यांनी सुजितचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

सारिका आणि सुजित एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांची छान मैत्री होती आणि पुढं त्यांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा वसंतराव आणि जयश्रीताई यांनी त्यांचं लग्न करून दिलं. एवढंच नाही, तर लग्न झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र संसार थाटून दिला. सारिकाला सासू-सासऱ्यांसोबतच राहायचं होतं, पण जयश्रीताईंनी ‘तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य असू देत. सणासुदीला, वेळेला आपण एकत्रच असू’, असं तिला समजावलं होतं.

हेही वाचा – हुंडाबळीच्या दोषी पतीस पत्नीच्या मालमत्तेत वारसाहक्क मिळेल का?

आज तिथीने वसंतरावांचा ६० वा वाढदिवस आणि तारखेने त्यांच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस होता. म्हणूनच सारिका आणि सुजितने त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. काही नातेवाईक, वसंतराव आणि जयश्रीताईंच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनाही आमंत्रित केलं होतं. त्यांची कार घरापाशी पोहोचल्यानंतर सर्वांनी गुलाबाच्या पाकळ्या उधळून त्यांचं स्वागत केलं. सारिकानं औक्षण करून त्यांना घरात आणून आसनावर बसवलं. घराची उत्तम सजावट तिनं केली होती. वसंतराव आणि जयश्रीताई यांना एकावर एक आश्चर्याचे धक्के बसत होते आणि दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते.

सारिकानं काही मनोरंजनाचे कार्यक्रम, नंतर वसंतराव आणि जयश्रीताई यांची मुलाखत, त्यानंतर डिनर, असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. राघवकाका आणि राजश्री काकू कार्यक्रमाला आले होते, पण एवढं सगळं नियोजन असूनही नेहमीप्रमाणे काहीतरी चुका काढायची त्यांची सवय अजूनही गेली नव्हती. आमच्यापेक्षा इतर कुणीही आयुष्यात यशस्वी असूच शकत नाही, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी सारिकाकडे सतत काही तक्रारी करण्यास सुरुवात केली. दोघांच्या ३५ वर्षांच्या सहजीवनाबद्दल चर्चा सुरू झाली. तेव्हा राघवकाका म्हणाले, “आमचा वसंता म्हणजे, जयश्री वहिनीच्या ताटाखालचं मांजर. त्या म्हणतील तसं ऐकत आला म्हणून यांचा संसार झाला.’

सुजितच्या कानावर हे गेल्यावर तो भयंकर चिडला होता. तो काहीतरी बोलणार तेवढ्यात सारिका पुढे झाली आणि म्हणाली, “गेली ३५ वर्षं एकमेकांसोबत सहजीवन व्यतीत करताना दोघांनी कोणतं सूत्र पाळले? हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. थोडक्यात त्यांच्या सुखी सहजीवनाचा मंत्र आज ते आपणास सांगणार आहेत”. त्यानंतर वसंतराव आणि जयश्रीताई यांनी सहजीवनात दोघांनी एकमेकांना कशी साथ दिली हे सांगितलं. वसंतराव म्हणाले, “खरं तर आमच्या दोघांचाही स्वभाव आणि आवडीनिवडी वेगळ्या आहेत. सुरुवातीच्या काळात आमचीही भांडणं व्हायची, रुसवेफुगवे व्हायचे मग दोघांच्याही लक्षात आलं की, यामुळं दोघांचंही नुकसान होतंय. मग एकमेकांना स्वीकारून समजून घ्यायला हवं असं आम्ही ठरवलं आणि आम्ही एक मंत्र लक्षात ठेवला. त्यामुळं आमचे त्यानंतर वाद झालेच नाहीत. तो मंत्र म्हणजे ‘टी एम टी’.

हेही वाचा – शहीद जवान, नॉमिनेशन आणि वारसाहक्क…

राघवकाकांनी खोचकपणे विचारलंच, “हा कसला मंत्र? आणि तो कोणत्या गुरूंनी दिला?” मग जयश्रीताईंनी शांतपणे सांगितलं, “भावजी, हा मंत्र आम्हाला अनुभवानं मिळाला. तो कुणीही द्यावा लागत नाही, स्वतःलाच घ्यावा लागतो. टी एम टीचा अर्थ, ‘तुम्ही म्हणाल तसं’. यांच्या काही गोष्टी मला आवडल्या नाहीत तरीही मी त्यांना विरोध केला नाही आणि त्यांनाही माझ्या काही गोष्टी खटकल्या तरीही मला विरोध न करता ते माझ्या समाधानासाठी त्या गोष्टी करत राहिले. मग कुणी काहीही म्हटलं, आम्ही ते मनावर घेतलं नाही. सहजीवन म्हणजे फक्त एका घरात एकत्र राहणं नव्हे, तर ‘घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल’, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणायलाच हवा. एकमेकांच्या मानसिकतेचा, भावनेचा विचार करायला हवा म्हणजे सहजीवन. हे केवळ एकत्र राहणं नाही, तर तो एक आनंद सोहळाच होतो”.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या. राघव काका शांत बसले होते. केवळ पती-पत्नीच्या नात्यातच नाही, तर कोणतंही नात टिकवण्यासाठी टी एम टी आवश्यक आहे, हे त्यांनाही समजलं.

प्रत्यक्ष काहीही न बोलता राघवरावांना जे ऐकवायचे ते सारिकानं ऐकवलं होतं, म्हणून आता आपणही सारिकाला समजावून घेण्यासाठी टी एम टी मंत्र वापरायचा हे सुजितनं ठरवलं.

smitajoshi606@gmail.com

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)