केतकी जोशी

काळ बदलला तशी स्त्रीची रूपं बदलली, भूमिका बदलल्या; पण जबाबदाऱ्याही वाढल्या. तिनं अनेक नवी आव्हानं स्वीकारली; पण परंपरांच्या साखळदंडांमधून तिची सुटका झाली नाही. ‘स्त्रीची प्रगती झाली,’ असं आपण कितीही म्हटलं तरी काही वेळेस धक्कादायक परिस्थिती समोर येते. स्त्री बाहेर पडते, मोकळेपणाने फिरू शकते, असं आपण म्हणतो; पण खरोखरच किती स्त्रिया बाहेर पडतात, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर धक्कादायक आहे. भारतातील जवळपास ५३ टक्के गृहिणी- म्हणजे ज्या पूर्णवेळ घरीच असतात त्या- घरकामात अडकल्यामुळे दिवसातून एकदाही घरातून बाहेर पडत नाहीत, असे समोर आले आहे. ‘Gender Gap In Mobility Outside Home In Urben India’ या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भारतीय महिला काही कारण असेल तरच घराबाहेर पडतात, पण पुरुषांना बाहेर जाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज लागत नाही, असंही या अहवालातून स्पष्ट झालं आहे. ‘ट्रॅव्हल बिहेवियर अँड सोसायटी’मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला

या अहवालानुसार महिला घरकामात इतक्या व्यस्त असतात की, त्या स्वत:च्या तब्येतीची काळजी घेऊ शकत नाहीत, स्वत:साठी वेळ देऊ शकत नाहीत किंवा हवं तेव्हा बाहेर जाऊन आपल्याला हवं तसं मोकळेपणाने फिरू शकत नाहीत. कारण घरकामाची, घरातल्या वृद्धांच्या देखभालीची, मुलांचं खाणंपिणं, त्यांचं शिक्षण, त्यांच्यावरील संस्कार, पाहुणे, सणवार, रूढी-प्रथा-परंपरा या सगळ्या गोष्टी फक्त बाईचीच जबाबदारी आहे, असं आजही मानलं जातं. घरातून बाहेर पडून नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या आपल्या देशात आजही गृहिणींपेक्षा कमीच आहे. त्यातही मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रियल क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. बाहेर जाणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांची तुलना केली तर त्यात प्रचंड तफावत आहे, असं या रिपोर्टचे लेखक राहुल गोयल यांनी म्हटलं आहे. गोयल हे दिल्ली आयआयटीच्या Transportation Research and Injury Prevention Centre मध्ये कार्यरत आहेत. गोयल यांचा हा अभ्यास मुख्यत: शहरी भागावर केंद्रित आहे. यामध्ये साधारणपणे ८४ हजार २०७ महिला आणि ८८ हजार ९१४ पुरुष सहभागी झाले होते. २०१९ मधील सर्वेक्षणावर आधारित या अभ्यासात १.३८ लाखपेक्षा जास्त कुटुंबं सहभागी झाली होती. साधारणपणे ४७ टक्के महिला कमीत कमी एकदा तरी घरातून बाहेर पडतात. म्हणजेच ५३ टक्के महिला दिवसातून एकदाही घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. दिवसातून कमीत कमी एकदा तरी बाहेर जाणाऱ्या पुरुषांचं प्रमाण ८७ टक्के आहे. याचाच अर्थ स्त्रियांच्या तुलनेत पुरुष घरामध्ये कमी वेळ असतात.

आणखी वाचा-मोबाइलवरच्या ‘या’ ॲप्सना महिलांची सर्वाधिक पसंती!

शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या मुलींचं प्रमाण ८१ टक्के आहे, तर पुरुषांचं प्रमाण ९० टक्के आहे. मात्र मुलींनी शिक्षण सोडलं किंवा नोकरी सोडली तर त्यांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण अगदी कमी होतं असंही यात म्हटलं आहे. शिक्षण सुटल्यानंतर नोकरी मिळाली तरच महिला त्या कारणाने दररोज घराबाहेर पडू शकताता. मात्र बाहेर जाऊन नोकरी न करणारी किंवा शिक्षण न घेणारी महिला असेल तर अशा महिलांपैकी फक्त ३० टक्के महिलाच किमान एकदातरी दिवसातून बाहेर पडतात. याचाच अर्थ ७० टक्के महिला तर दिवसातून एकदाही घराबाहेर पडत नाहीत. तर दुसरीकडे कोणतंही काम न करणारे किंवा शिक्षण न घेणारे फक्त ३५ टक्केच पुरुष घरात राहतात, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच फक्त घरकाम करणारी महिला असेल तर ती कामांमध्ये इतकी गुंतलेली असते की, तिला अन्य कशासाठीही वेळ मिळत नाही. पण घरात असणारा पुरुष काहीही कारण नसेल तर घराबाहेर पडू शकतो.

यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वयाच्या २५व्या वर्षानंतर वाढत्या वयानुसार पुरुष आणि महिलांमध्ये नव्याने शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी होतं. या वयामध्ये पुरुषांच्या रोजगारात वाढ झालेली दिसून येते, त्या तुलनेत महिलांना रोजगाराच्या संधी फारशा मिळत नाहीत असं दिसून येतं. २६ वर्षांच्या ८०.७ टक्के पुरुषांकडे नोकरी किंवा रोजगार होता, पण महिलांमध्ये हेच प्रमाण फक्त १९.१ टक्के होतं, असं आकडेवारीवरून स्पष्ट होतं. भारतीय समाज आजही पारंपरिकच समजला जातो. त्यामुळे महिलांचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी आजही अनेक पारंपरिक भूमिका स्त्रीनंच पार पाडाव्यात अशी अपेक्षा असते. अगदी पूर्वीपासूनच घरातलं काम, मुलांच्या जबाबदाऱ्या स्त्रीच्या आणि अर्थार्जनाचं काम पुरुषाचं अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये आता फरक पडला आहे. बायकाही अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागल्या. पण त्यांच्यावरच्या घरातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या नाहीत. त्यामुळे नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर पडणाऱ्या बहुतेकजणीही काम वगळता स्वत:च्या मर्जीने अन्य कारणांसाठी फारशा घराबाहेर पडताना दिसत नाही. शहरांमधील परिस्थिती बरी असली तरी आजही ग्रामीण भागात घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांचं प्रमाणही कमीच आहे. घरी राहणाऱ्या महिलांचा पाच तासांपेक्षा जास्त वेळ घरकामातच जातो. यामध्ये स्वयंपाक, साफसफाई, घराची सजावट, मुलांची, घरातल्यांची देखभाल अशी सगळी बिनपगारी कामं आहेत. याच गोष्टींवर, म्हणजे ज्याच्यासाठी मोबदला मिळत नाही त्यावर, वेळ घालवणाऱ्या पुरुषांचं प्रमाण नगण्य म्हणजे फक्त १.५ टक्के इतकंच आहे. अनेकदा महिला या घरकामातच इतक्या अडकतात की, त्यांना बाहेर जाण्याची ताकदही उरत नाही आणि इच्छाही उरत नाही. त्यामुळे मग जरा निवांत वेळ मिळाला की, कित्येकजणी बाहेर जाण्यापेक्षा पुन्हा घरातच राहणं पसंत करतात, असंही दिसून आलं आहे.

आणखी वाचा-‘बॉलीवूड ते हॉलीवूड’- प्रियांका चोप्रा जोनास

आता परिस्थिती बदलत असली तरी काही ठरावीक वर्ग वगळता बिनधास्तपणे बाहेर फिरायला जाणाऱ्या महिला किती आहेत? किंवा काहीही कारणाशिवाय म्हणून घरातून बाहेर जाणाऱ्या महिलांचं प्रमाणही किती आहे? घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेण्याबरोबरच घरातल्या स्त्रीलाही बाहेर पडण्याचा, तिच्यासाठी जगण्याचा तितकाच हक्क आहे हे जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात रुजत नाही तोपर्यंत ही दरी अशीच राहणार. ही दरी दूर करण्यासाठी बायकांनीही मानसिकता बदलली पाहिजे. थोडा वेळ का होईना पण घराच्या बाहेर स्वत:साठी म्हणून पडलं पाहिजे.