डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“ मधुरा, कधी आलीस तू? जावईबापूसुद्धा आलेत का?”
“ आत्या, त्याला जावईबापू म्हणू नकोस, फक्त मंदार म्हण.”
“अगं तो आमचा जावई आहे ना, मग त्याला नावाने हाक कशी मारणार?”
“तुम्ही त्याला सारखं सारखं असं जावईबापू म्हणता ना ते मला आजिबात आवडत नाही, खरं म्हणजे त्यामुळेच तो माझा अगदी नवरोबा झालाय.”
‘‘राणी सरकारांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.”
“आत्या, बस हं, माझी चेष्टा करू नकोस, खरं तर किती वेळ झालं मी तुझीच वाट बघत होते. मला तुझ्याशी बोलायचं आहे.”
मधुराचं लग्न होऊन अवघे सहा महिने झालेत. तिचा हा प्रेमविवाह आहे, दोघांची मागील चार वर्षांपासून चांगली मैत्री होती. मंदारही स्वभावाने खूप चांगला होता, त्याच्या आणि मधुराच्या आई-वडिलांनी दोघांच्याही लग्नाला मुक्तपणाने संमती दिली कारण जोडा खरंच अनुरूप होता. सासू-सासरे प्रेमळ आणि मधुराचं कौतुक करणारे असं सगळं असताना आता काय झालंय आणि हिला काय बोलायचं असेल याच विचारात मी होते, पण तिनं लगेचच बोलायला सुरुवात केली.
“आत्या, मंदार खूप बदलला आहे गं, त्याचं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेमच राहिलेलं नाही. लग्नापूर्वी मला भेटण्यासाठी आतुर व्हायचा, मी म्हणेल तेथे यायचा, मी मागेल ते गिफ्ट घेऊन द्यायचा. सतत माझा आणि माझाच विचार करायचा, एकत्र नसलो तरी आम्ही प्रत्येक क्षण fb, whatsapp किंवा instagram वर एकमेकांशी शेअर करायचो, पण आता एका घरात राहूनही आम्ही एकमेकांच्या जवळ नाही असं वाटतं. तो मला वेळच देत नाही. कुठं जायचं म्हटलं, की याचे नवीन प्रोजेक्ट, मिटिंग काहीतरी असतंच आणि मी काही बोलायला गेले तर म्हणतो टिपिकल बायकोसारखी वागू नकोस, प्रक्टिकल हो, प्रत्येक वेळेला कशाला मी तुझ्या सोबत पाहिजे? मी घरातल्या कामात लक्ष घालावं. त्याच्या आई-वडिलांची मर्जी सांभाळावी एवढीच त्याची अपेक्षा असते. ऑफिसमधून घरी आल्यानंतर आधी आईबाबांशी बोलत बसतो आणि नंतर बेडरूममध्ये येतो, मग थकलेला असतो म्हणून झोपून जातो, पूर्वीसारखं माझ्याशी बोलतच नाही, लग्नाच्या आधी असणारा ‘तो’ कुठेतरी हरवला आहे. आता माझ्यासोबत आहे तो फक्त माझा नवरा. लग्नांनंतर नातं एवढं बदलतं का गं? आता सगळं मिळालं म्हणून त्याला मी नकोशी झाली असेन का? लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत आमचं नातं शीळ झालं – मग आयुष्यभर एकमेकांसोबत कसं रहायचं?’
मधुराला जो प्रश्न पडला आहे तो लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी खूप मुलामुलींना पडतो. कारण नात्यातील बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार होण्यासही वेळ लागतोच. मी मधुराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
“मधुरा, अगं नातं कधीच शीळ होत नसतं, फक्त परिस्थितीनुसार होणारे बदल स्वीकारावे लागतात. लग्नापूर्वीचा प्रियकर लग्न झाल्यानंतर नवरा होतो, ते नातं बदलतं आणि बदलणाऱ्या नात्याबरोबर अपेक्षाही बदलतात, जबाबदाऱ्याही बदलतात. नवीन नाती नवीन जबाबदाऱ्या पेलवायला तुलाही वेळ लागणार आहेच, पण आता अल्लडपणा सोडून तुलाही प्रॅक्टिकल व्हावं लागेल. लग्नापूर्वीचं प्रेम आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या यांचा मेळ घालावा लागेल. तुमच्या दोघांमध्ये मंदारमध्ये जबाबदारीची जाणीव लगेचच आणि जरा जास्तच आली आहे, त्यानंही तुझ्याशी बोलून लग्नानंतरचे नियोजन करायला हवं होतं कारण स्वप्न आणि वास्तव हे वेगळं असतं आणि याबाबत दोघांमध्येही गांभीर्याने चर्चा होणं गरजेचं आहे. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या काय आहेत, आयुष्याचा जोडीदार म्हणून दोघांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत ,कौटुंबिक नात्याबाबत काय अपेक्षा आहेत, आपल्या कुटुंबाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे या सर्वांची चर्चा होणं गरजेचं असतं. हनिमूनचा कालावधी हा शरीराने आणि मनाने एकत्र येण्यासाठी असतो आणि यामध्ये या सर्व चर्चा होणं गरजेचं असतं. नुसतं सेल्फी काढणं आणि तो स्टेट्सवर टाकणं यासाठी वेळ घालवायचा नसतो.”
“आत्या, तुझे टोमणे कळतात बरं मला.”
“ मग त्याबरोबरच स्वप्न आणि वास्तव याचीही जाणीव होऊ देत. मधुरा, आता परीकथेत रमण्यापेक्षा वास्तवात ये. कॉलेजजीवन संपवून तू आता गृहस्थाश्रमात प्रवेश केला आहेस त्यामुळे नाती जोडायची कशी आणि टिकवायची कशी याचं कौशल्यही तुला शिकायला हवं. आतापर्यंत शिक्षणात जशी टॉपर होतीस तशीच नाती संभाळण्यातही अग्रेसर हो, नात्यातील संवेदना जपली, आणि एकमेकांना समजून घेतलं ना तर ती कधीच शिळी होत नाहीत हे लक्षात ठेव वेडाबाई.”
“हो, आत्या मी नक्कीच लक्षात ठेवीन आणि हेच सगळं माझ्या नवरोबालाही समजावून सांग.”
“ तुला पटलंय ना, मग मी त्याच्याशीही बोलेन. खूप दिवसांनी भेटलो ना आपण मग चल एक सेल्फी काढुया.”
मधुराचा मूड बदलला आणि ती वेगवेगळ्या पोजेसमध्ये सेल्फी काढण्यात गर्क झाली.
smitajoshi606@gmail.com