विविध क्षेत्र पादक्रांत केल्यानंतर त्या क्षेत्रातील वरिष्ठ पातळीव पोहोचणं आणि त्यासाठी आपल्या वरिष्ठांच्या मनात तसा विश्वास निर्माण करणं हे आजच्या काळात महिलांसमोरील मुख्य आव्हान आहे. पुरुषांची मक्तेदारी असेल्या क्षेत्रात पाय रोवून घट्ट उभं राहताना आपणही पुरुषांच्या तोडीस तोड काम करू शकतो हा विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. असाच विश्वास चेन्नईतील एका कंपनीतील महिलांनी सार्थ करून दाखवला आहे. चेन्नईतील एल अॅण्ड टीच्या मानापक्कम कॅम्पसमध्ये १३ मजली व्यावसायिक इमारत बांधकामाची जबाबदारी १८ महिलांच्या खांद्यावर सोपवली आहे. या महिलांचं नेतृत्त्व कनागबीहाई टी यांच्याकडे देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कनागबीहाई टी या स्थापत्य अभियंता असून या क्षेत्रात त्यांना वीस वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखील सोपवण्यात आलेला बहुमजली इमारत बांधकाम प्रकल्प जवळपास ५०० कोटींचा आहे. या क्षेत्रात आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु, महिलांनी आता ही मक्तेदारी मोडीत काढत इमारत बांधकाम प्रकल्पातही स्वतःचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा >> महिला आठवड्यात किती तास काम करतात? राधिका गुप्ता म्हणतात…

सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि आर्किटेक्चर अशा विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील महिला या प्रकल्पासाठी एकत्र आलेल्या आहेत. नियोजन, गुणवत्ता हमी आणि नियंत्रण, सुरक्षा, व्यवहार आणि प्रशासन आदी सर्व कामे महिला हाताळणार आहेत.

उच्च शिक्षित असलेल्या या महिलांचं ऑफिस म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी असलेलं कंटेनर. या कंटनेरमध्ये या महिला एकत्र येऊन रोज एक बैठक घेतात. या बैठकीत दिवसभरातील कामकाजाचा आढावा घेतला जातो. कामाचे पर्यवेक्षण, बांधकामाचे डिझाइन, गुणवत्ता यावर चर्चा केली जाते. तसंच, सर्व कामागारंनी सुरक्षेची काळजी घेतली आहे की नाही याचीही खातरजमा केली जाते.

प्रकल्प व्यवस्थापक कनगांबीहाई म्हणाल्या की, या समूहात १८ महिला आहेत. यामध्ये २२ ते ४२ वयोगटातील महिला आहेत. म्हणजेच सर्वाधिक तरुणींची संख्या आहे. तसंच, १८ पैकी सात जणींची ही पहिलीच नोकरी आहे. या सर्व महिला एकमेकींसोबत अत्यंत कम्फर्ट असतात हेच या समूहाचं वैशिष्ट्य आहे.

या प्रकल्पाचे नियोजन, व्यवस्थापन महिलांच्या हातात असले तरीही बांधकाम कामगार पुरूष आहेत. या क्षेत्रातील आव्हानाविषयी सांगताना प्रकल्प प्रमुख म्हणाल्या की, इमारत बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खोलवर खोदावं लागतं. खोदताना आम्ही जसेजसे खाली गेलो तसं आम्हाला पाणी दिसू लागलं. पण आम्ही हे खोदकाम यशस्वीरित्या पार पाडलं. यामागे आमच्या हुशार आणि कौशल्यपूर्ण कामगारांचा हात आहे.

टीसी ४ आणि एल अॅण्ड टीचा हा पहिलाच प्रकल्प आहे जिथे मुख्य प्रकल्प टीममध्ये फक्त महिलांचा समावेश आहे. महिलांच्या नेतृत्त्वाखील बांधण्यात येणारी इमारत ७ लाख चौरस फूट क्षेत्रफळाची आहे. तर या इमारतीत ५ हजार १०० कर्मचारी बसू शकतील एवढी आसनक्षमता आहे. एप्रिलमध्ये हे बांधकाम सुरू झाले असून ते जून २०१४ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालं आहे.

“लैंगिक समानता आणण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांत पदवीधर आणि पदव्युत्तर महिला अभियांत्रिकांची नियुक्ती केली आहे. व्यवस्थापन, नियोजन, गुणवत्ता, सुरक्षा विभागात महिलांचीही संख्या अधिक आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास येण्याकरता त्यांच्या हातात पूर्णपणे एक प्रकल्प देणं गरजेचं होतं, त्यामुळे हा प्रकल्प महिलांच्या स्वाधीन करण्यात आला आहे”, अशी माहिती एल अॅण्ड टी कंन्स्ट्रक्शनचे आरोग्य, निवासी आणि व्यावसायिक इमारत प्रमुख व्ही. सुकुमार यांनी दिली.

इमारत बांधकाम वेळखाऊ प्रकल्प असतो. तसंच, त्यासाठी दिवसातील अनेक तास खर्ची घालावी लागतात. महिलांच्या दृष्टीने हे क्षेत्र तसं आव्हानात्मक आहे. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करणे जिकरीचे आहे. परंतु, तरीही हे अवघड काम महिलांकडून अगदी सहजरित्या केलं जातंय. याविषयी माहिती देताना आर्किटेक्चर एस. वासुकी म्हणाल्या की, सुरुवातीला घर आणि कामात संतुलन राखणं कठीण गेलं होत. पण आता माझ्या कुटुंबाला याची सवय झाली आहे.

महिलांच्या हाती दिलेलं कोणतंही काम योग्य व्यवस्थापन आणि नियोजनपूर्ण होतं. त्यामुळे त्यांच्या या प्रकल्पाकडे अनेकांचे लक्ष आहे. त्यांच्या या यशस्वी प्रकल्पानंतर देशभरात महिलांच्या हाती हा कारभार आला तरी आश्चर्य वाटणार नाही.