मुलाखत : अभिनेत्री/ निर्माती/ दिग्दर्शिका/ सामाजिक कार्यकर्ती रेवथी

१९९१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत माझा पहिला चित्रपट ‘लव्ह’ प्रदर्शित झाला. मी त्यात सलमान खानची नायिका होते. त्याला ३२ वर्षे पूर्ण झालीत, पण माझे करिअर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप आधीपासून सुरू झाले होते, त्यामुळे तसं बघायला गेलं तर माझ्या कारकीर्दीला ४० वर्षे पूर्ण झालीत. वयाच्या आणि कारकिर्दीच्या या वळणावर अभिनय आणि दिग्दर्शन यात मी छान रमले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझं मूळ नाव आशा केलुनी कुट्टी, पण चित्रपटांसाठी मी रेवथी. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढले. कॉलेजमध्ये असतानाच मी अभिनय, लेखन, दिग्दर्शन, अगदी नेपथ्य व्यवस्था, अशा सगळ्यांमध्ये आघाडीवर असे. एकदा आमच्या नाटकाची तालीम चालू असताना सर म्हणाले, तुझं नाव खूप मोठं आहे. पुढे अभिनयाच्या क्षेत्रात, चित्रपटात जायचं ठरवत असशील तर शॉर्ट आणि सिम्पल नाव चांगलं. ‘रेवथी हे नाव कसं वाटतं तुला?’ या त्यांच्या प्रश्नावर मी आक्षेप घेतला नाही इतकंच! पण रेवथी नावानेदेखील माझी भरभराटच झाली.

हेही वाचा – ए बाई तू मध्ये बोलू नको… नवऱ्याचे ‘हे’ शब्द प्रत्येक बायकोने ऐकायलाच हवेत कारण…

सध्या ‘नेटफ्लिक्स’वर नुकत्याच रीलीज झालेल्या ‘टूथपरी – व्हेन लव्ह बाइट्स’ वेब शोची जोरदार चर्चा आहे. माझ्या भूमिकेचे नाव आहे, ल्यूना ल्यूका. ही स्त्री पिशाच आहे. माझ्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत मी प्रथमच ‘आऊट ऑफ द बॉक्स’ आणि ‘आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन’ व्यक्तिरेखा स्वीकारली आहे. मी हे आव्हान स्वीकारलं, त्यामागे माझी १० वर्षांची मुलगी माही आहे. तिला तिची आई सुपर वूमन वाटते. तिच्या आईला जगात काहीच अशक्य नाही, अशी तिची भावना आहे. मलाही याची कथा आणि भूमिका दोन्ही आवडली आणि मी होकार दिला.

ल्यूना ल्यूकामध्ये शिरण्यासाठी मला किमान दोन तास मेकअप करावा लागतो. मेकअप काढतानाही तितकाच वेळ लागतो. वेशभूषा, रंगभूषा, केशभूषा यात माझे दररोज साडेचार तास खर्ची पडत. ही झाली शारीरिक तयारी; पण ल्यूना ल्यूका पिशाच असल्याने तिच्यातली नकारात्मकता अंगी बाणवणे हेदेखील मोठं आव्हान होतं. त्यामुळे मी मन लावून हे काम केलं. सिकंदर खेर, झरीना वहाब, तिलोत्तमा शोम, शांतनू माहेश्वरी असे कसलेले कलावंत यात आहेत. एक यादगार अनुभव होता माझ्यासाठी हा.

हेही वाचा – काय आहेत ‘व्हेगन सिल्क साड्या’?

‘सलाम व्हेंकी’ हा चित्रपट काजोलने करावा अशी माझी मनापासून इच्छा होती. स्नायूंना एक असाध्य रोग झालेल्या एका मुलाची आणि त्याच्या आईची ही सत्यकथा. बायोपिक म्हणा ना! या दुर्धर आजारात रुग्ण १५ वर्षांपेक्षा अधिक काळ जगत नाही, पण कथेचा नायक व्हेंकी तब्बल २४ वर्षं जगला. त्याच्या आईने मुलाला मानसिक बळ दिलं. मुलाने मृत्यूशी झुंज दिली. ही कथा मी काजोलला ऐकवली तेव्हा तिने नकार दिला. ‘रोनेधोने वाले रोल अभी नहीं करने,’ असं तिचं मत होतं. मी खट्टू झालं; पण मग काजोलचंच मतपरिवर्तन झालं आणि तिने सुजाता, ही व्हेंकीच्या आईची भूमिका स्वीकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. अशा सिनेमांचे प्रेक्षक मर्यादित असतात, पण मला अनेक रुग्णांच्या आयांचे फोने आले ज्यांच्या मुलांना या विकाराने ग्रासले आहे. त्यांच्या व्यथा ऐकून अशा विषयावर मी चित्रपट काढल्याचे मला समाधान मिळाले.

माझ्या हिंदी सिनेमांची सुरुवात मी सलमान खानची नायिका म्हणून केली – १९९१ मध्ये रीलीज झालेल्या आमच्या ‘लव्ह’ चित्रपटाला उत्तम यश लाभलं. पुढेदेखील मी काही चित्रपट केले. नंतर मला दिग्दर्शनाची संधी मिळाली. ‘फिर मिलेंगे’ या २००४ मध्ये रीलीज झालेल्या माझ्या या चित्रपटाचा हिरो सलमान खानच होता! माम्मुटी, शिल्पा शेट्टी, काजोल अशा अनेक नामवंतांना मी दिग्दर्शित केले आहे. मी माझ्या कारकीर्दीवर संतुष्ट आहे.
‘ॲबिलिटी फाऊंडेशन’साठी मी अनेक वर्षं काम करतेय. ही संस्था दिव्यांगांसाठी काम करते. तसेच १९९५ पासून मानसिक आजार असलेल्या महिलांसाठीदेखील मी काम करतेय. सामाजिक बांधिलकी मानते. अभिनय माझी एक ओळख आहे, अर्थात अभिनय हा या रेवथीच्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे!

(samant.pooja@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The role of the witch was out of my comfort zone says actress revathi ssb