Women Success Story: कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा ही अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. हल्ली या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण हा आजार झाल्याचे कळताच खचून जातात; पण काही जण असेही आहेत की, जे या आजारावर मात करून, स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात. कॅन्सर झालेल्या लाखो रुग्णांसाठी प्रेरणादायी असलेल्या कनिका टेकरीवाल यांचा प्रवासही असाच आहे.
कनिका टेकरीवाल यांनी कॅन्सर झाल्यानंतर खचून न जाता, त्यावर मात करून जेटसेटगो ही भारतातील पहिली विमान भाड्याने देणारी कंपनी सुरू केली. वैयक्तिक संघर्षापासून ते पायनियरिंग यशापर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.
सामाजिक आव्हानांवर मात
कनिका टेकरीवाल यांना ‘द स्काय क्वीन’ म्हणून संबोधले जाते. कनिका यांचा जन्म १९९० मध्ये एका मारवाडी कुटुंबात झाला होता. त्यांनी लॉरेन्स स्कूल, लव्हडेल व भोपाळमधील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ माध्यमिक शाळा येथून माध्यमिक शिक्षण घेतले आणि नंतर कॉन्व्हेंट्री विद्यापीठातून पदवी मिळवली. पण, कनिका यांना आयुष्यात पालकांचा विरोध आणि प्रासंगिक लैंगिकता यांसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. या अडचणी आणि वयाच्या २० व्या वर्षी झालेल्या कर्करोगाशी झुंज देत असतानाही कनिका यांनी स्वतःला थांबवले नाही.
कनिका यांनी २०१२ मध्ये JetSetGo ची स्थापना केली. या व्यवसायात त्यांना हळूहळू यश मिळत गेले. आता त्यांचा व्यवसाय तब्बल ४२० कोटी रुपयांचा झाला आहे. कनिका यांना उद्योजकतेतील एक प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जाते. आता वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांच्याकडे १० खासगी जेट आहेत.
कनिका यांचा २० व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देण्यापासून ते हुरुन रिच लिस्टमधील सर्वांत तरुण व श्रीमंत महिला उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. सध्या कनिका सध्या त्यांच्या व्यावसायिक पतीसह उद्योजकीय जगात प्रगती करीत आहेत.