स्त्रियांच्या पादत्राणांचं विश्व खूप मोठं आहे. एकेकाळी आपल्याकडे सामान्य ‘चतुरां’साठी चपला, सँडल्स आणि क्वचित खास प्रसंगी घालण्यासाठीचे ‘टॉक टॉकचे बूट’ (‘हाय हील’ बुटांना पूर्वी असंच म्हटलं जात असे!) इथे ते संपत असे. आता मात्र पादत्राणांमध्ये इतकं वैविध्य आलं आहे, की कोणती पादत्राणं कोणत्या प्रकारची आहेत हे माहीत करून घेणं फार गरजेचं झालं आहे. तुम्हाला जर पादत्राणांचे प्रकार ओळखता आले, तर तुम्ही दुकानात किंवा शॉपिंग ॲप्सवरही आपल्याला हवी ती स्टाईल चटकन शोधू शकाल. आज आपण पादत्राणांचे काही लोकप्रिय प्रकार पाहू या.

स्टिलेटोज्

Stiletto
Stiletto

स्टिलेटोज् हा ‘हील्स’मधला सर्वाधिक पाहायला मिळणारा प्रकार. ‘स्टिलेटो’ या शब्दाचा मूळचा अर्थ अणकुचीदार, धारदार सुरा असा आहे! नंतर स्त्रियांच्या पाॅइंटेड हील्सना बोली भाषेत ते नाव पडलं. नावाप्रमाणेच या हील्स पातळ, निमुळत्या आणि खाली बारीक पाॅइंटेड टोक असलेल्या असतात. अर्थातच त्या घालून वावरणं अतिशय अवघड, सवय नसेल तर धोकादायकही. फार वेळ त्या घालणंही शक्य नाही.

Stiletto

पण घातल्यावर त्या अतिशय ‘ग्लॅमरस’ दिसतात हेही खरं. व्यक्तीची उंची वाढलेली दिसण्याबरोबरच त्यावर तोल सांभाळताना चालताना आपसूकच ‘कॅटवॉक’ केला जातो! त्यामुळे मॉडेल्स, सेलिब्रिटी आणि फॅशनप्रेमींमध्ये त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. स्टिलेटोज् ची हील कमीत कमी १ इंच उंचीची असते, पण तुम्ही बाजारात पाहिलंत, तर कमीत कमी ३ इंच वा त्याहून अधिकच हीलच्या स्टिलेटोज अधिक प्रमाणात दिसतात. स्टिलेटोजचे अनेक प्रकार आहेत. स्टिलेटो सँडल (बारीक हील्सच्या सँडल्स), स्टिलेटो पंप शू (पुढून ‘क्लोज्ड’ आणि टोकदार वा बसकं नाक असलेले हील्सचे बूट), स्टिलेटो पीप-टोज (बोटं अर्धवट दिसतील असे, पुढून थोडे ‘ओपन’ हील्सचे बूट) वगैरे…

किटन हील्स

किटन हील्स आणि मांजरींचा काहीही संबंध नाही! या हील्ससुद्धा अगदी स्टिलेटोज् सारख्याच दिसतात. फरक इतकाच, की किटन हील्सची उंची ३ इंचांपेक्षा कमी (साधारणपणे १ ते २ इंच) असते. या हील्सदेखील पाॅइंटेड असतात, पण ज्यांना हील्सची सवय नाही आणि त्यांना हील्सचा सोस असल्यास आधी अशा कमी उंचीच्या हील्सवर सवय करावी असं म्हणतात. ऑड्री हेपबर्न या प्रसिद्ध अभिनेत्रीनं वापरल्यानंतर किटन हील्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या होत्या. त्या एकाच वेळी ‘क्यूट’ आणि ‘सोफेस्टिकेटेड’ समजल्या जातात. अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या स्त्रियांनीही अनेकदा किटन हील्स वापरलेल्या पाहायला मिळतात.

वेजेस (Wedges)

Wedge heels

‘वेजेस’नाही हील असते, पण ती स्टिलेटो हीलसारखी नसून एकसंध असते- अर्थात शरीराचं वजन तुलनेनं अधिक ‘बॅलन्स’ केलं जातं. वेजेस घालून चालणं हाय हील्सपेक्षा बरंच सोपं असल्यामुळे हील्स आवडणाऱ्या अनेक स्त्रिया वेजेसची निवड करतात. वेजेससुद्धा सँडल्स आणि बूटांच्या प्रकारात मिळतात.

प्लॅटफॉर्म हील्स

अनेक जणांना कदाचित वेजेस आणि प्लॅटफॉर्म हील्स सारख्याच वाटतील. मात्र प्लॅटफॉर्म हील्समध्ये दोन प्रकार आहेत. त्यातला एक म्हणजे पुढच्या बाजूस आणि हीलपाशीही रुंद आणि जाड तळ असलेल्या, कमी पाॅइंटेड, चालायला त्यातल्या त्यात सोप्या अशा हील्स. प्लॅटफॉर्म चपला, प्लॅटफॉर्म पंप शूज, प्लॅटफॉर्म सँडल्स, प्लॅटफॉर्म पीप-टोज् असे प्रकार आहेतच. त्याचप्रमाणे पूर्णत: एकसंध तळ असलेली, पण तरीही उंची देणारी प्लॅटफॉर्म पादत्राणंही मिळतात आणि वापरायला सोपी असल्यानं त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

एस्पाड्रिल्स (Espadrilles)

हे साधे, ‘कॅज्युअल’ बूट असतात. हील नसलेल्या किंवा अगदी कमी उंच एकसंध हीलच्या स्नीकर्ससारखे ते दिसतात. मात्र ‘एस्पाड्रिल्स’ ज्यूट मटेरिअलचे बनलेले असतात हे त्यांचं वेगळेपण. हल्ली कॅज्युअल लूकमध्ये या प्रकारचे बूट मोठ्या प्रमाणावर घातले जातात. ते कम्फर्टेबल असतातच, पण ज्यूट वा कापडाच्या मटेरिअलमुळे, रस्टिक लूकमुळे स्टायलिश दिसतात.

Espadrilles
Espadrilles

एस्पाड्रिल्समध्येही साधे बॅलेरीना शूजसारखे शूज, ‘स्लिप ऑन’ स्नीकर्ससारखे कॅज्युअल शूज किंवा पुढून बंद आणि मागून ओपन असलेले ‘म्यूल्स’ प्रकारचे शूज असे प्रकार आहेत. एस्पाड्रिल्समध्येही वेजेस मिळतात, पण वेजेस कमीअधिक प्रमाणात हीलसुद्धा देतात आणि एरवी एस्पाड्रिल्सना हील नसते. अर्थातच ज्यूट मटेरिअलमुळे एस्पाड्रिल्स पावसाळ्यात घालता येणार नाहीत.

आपल्याला आवडणारी कोणतीही पादत्राणं निवडा, पण ती घालून चालताना ‘लूक’पेक्षा तुम्हाला त्याची सवय असणं, तुमचा कम्फर्ट आणि आरोग्य या गोष्टींना अधिक महत्त्व आहे, हे विसरू नका!

Story img Loader