मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी कॉलेजमध्ये होते, तेव्हा पहिल्यांदा पुरुषांच्या कमरेवर पेजर्स दिसायला लागले होते. वायरलेस मेसेजेसच्या क्रांतीमधलं ते पहिलं पाऊल होतं. पॅन्टच्या बेल्टला लटकवलेली पेजर केस आणि त्यात असणारा छोटासा डबीसारखा पेजर ही शोभेची आणि प्रतिष्ठेची गोष्ट होती आणि त्याचमुळे, अर्थातच फक्त पुरुषांकडे पेजर्स होते. पेजर्स वापरणाऱ्या स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत फारच कमी दिसायच्या. त्या वेळी ‘समर जॉब’ म्हणून मी एका पेजर मेसेज डिलिव्हरी कंपनीत आलेला मेसेज पुढे ढकलण्याचे काम करायचे. त्या काळी या गोष्टी मॅन्युअल होत्या. त्यामुळे पेजर वापरणाऱ्यांमध्ये स्त्री-पुरुषांचं प्रमाण किती याचा अंदाज होताच. अठरा, एकोणिसाव्या वर्षी तिथे काम करत असतानाही बायका पेजर्स का वापरत नाहीत, असा प्रश्न पडायचाच.

आता, थोडं त्या आधी जाऊया. वायरचे आणि वायरलेस फोन आले, तेव्हाही हे फोन प्रामुख्याने पुरुषांच्या नावाने घेतले जायचे. आणि त्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरूषांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. बिलं किती येतात, त्यानुसार घरातल्या स्त्रियांनी किती वेळा फोन वापरायचा याचं रेशनिंग आणि त्यावर बारीक नजर ठेवण्याचं काम घराघरातले पुरुष करतच होते, त्याच वेळी मात्र पुरुषांच्या वापरावर नजर ठेवण्याची कुठलीही व्यवस्था आपल्या कुटुंब रचनांमधून नव्हती. कुटुंबप्रमुख म्हणून घरातल्या चमच्यांपासून लँडलाईन फोनपर्यंत प्रत्येक गोष्टीवर पुरुषांच्या नावाचा शिक्का आवश्यक मानला गेला. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतरही परंपरागत री आधुनिक काळातही ओढली गेलेली दिसते. विशेषतः इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडिया या तीन आधुनिक क्रांतीचा विचार करता याही प्रामुख्याने पुरुषकेंद्रीच होती आणि आहेत. तंत्रज्ञान विकसित करताना निर्मात्यांनी केलेला विचार वेगळा असेलही, पण जेव्हा हे तंत्रज्ञान आणि माध्यमे सर्वसामान्य माणसांच्या ताब्यात आली, त्यानंतर जे एरवी कुटुंबातून, समाजातून दिसतं तेच याही बाबतीत बघायला मिळालं.

आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

नोकरदार जोडप्यात पहिला मोबाईल फोन सर्वसाधारणपणे पुरुषाकडे आला. बाईला कशाला लागतो मोबाईल ही धारणा सुरुवातीच्या काळात होतीच. बाईने लँडलाईन वापरावा आणि पुरुषाने मोबाईल ही सरळ विभागणी काही काळ पाहायला मिळाली. बाईकडे लँडलाइनची सूत्रं आली कारण त्यापेक्षा वरचढ काहीतरी अस्तित्वात आलं आणि जे जवळ बाळगणं प्रतिष्ठेचं मानलं गेलं. त्या काळी अनेक पुरुष बायकोला मुद्दामून घरून, लँडलाईनवरून मोबाईलवर फोन करायला लावत आणि चारचौघांत फोन उचलून गप्पा मारत. पण लवकरच हा प्रकार बंद झाला. कारण, तंत्रज्ञान नेहमीच बाजारधार्जिणे असते. आणि बाजार ग्राहक शोधत असतो. पुरुष ग्राहक मिळाल्यानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी अर्थातच कंपन्या स्त्री ग्राहकांकडे वळणारच होत्या. त्यातच, मोबाईलच्या किंमती झपाट्याने उतरल्या, सिम कार्ड आणि इनकमिंग, आउटगोईंगच्या किमती कमी झाल्या. सुरुवातीला ३६ रुपये आउटगोइंग आणि १८ रूपये इनकमिंग होतं ते रुपयावर आलं. आणि पुढे इनकमिंग फुकट झालं. ३६ आणि १८ रुपये खर्च करून घरातल्या बाईला मोबाईल देण्याची मानसिकता अर्थातच आपल्या समाजात नाही. कारण बाईचं काम हे कायमच दुय्यम मानलं गेलं आहे. घराबाहेर पडून नोकरी करणाऱ्या पहिल्या पिढीच्या स्त्रियांच्या नोकरीकडेही ‘कुटुंबाला/नवऱ्याला मदत’ याच दृष्टिकोनातून बघितलं गेलं होतं. त्यामुळे स्वतःसाठी एखादी वस्तू, तंत्रज्ञान विकत घेणं हे पुरुषासाठी गरज आणि बाईसाठी अनावश्यक खर्च किंवा मौज मानलं गेलं आणि स्त्रियांनाही त्यात काही वावगं वाटलं नाही.

पण मोबाईल फोन्सनी हे गणित फार झटकन बदलून टाकलं. पाट्या वरवंट्यापासून मिक्सरपर्यंत आणि वॉशिंग मशीनपासून मायक्रोवेव्हपर्यंत सगळी गॅजेट्स चकटन स्वयंपाक घरात शिरली कारण त्यात बायांबरोबर कुटुंबाचीही सोय होती. कमावती स्त्री गृहकृत्यदक्ष आहे हे दाखवण्यात स्त्री, पुरुष आणि कुटुंब सगळ्यांनाच प्रचंड अभिमान वाटून आणि त्यासाठी बाईची कामे कमी करण्याची मानसिकता तंत्रज्ञान घरात शिरण्यामागे होतीच. सुपर वुमनची कल्पना तिथूनच जन्माला आलेली आहे. घरात आणि घराबाहेर सगळं एकटीने पेलणारी आणि तरीही सदैव हसतमुख असणारी, गृहकृत्यदक्ष नोकरदार करियरिस्ट स्त्री अशी काहीतरी भीषण आणि विचित्र व्याख्या मधली बरीच वर्ष बाईला जोडली गेलेली होती. तरीही तंत्रज्ञानांबाबतची असमानता शिल्लक होतीच.

आणखी वाचा : खासगीपणाच्या मूलभूत अधिकारावर घाला, ‘पेहेराव कोणता’ हा नोकरीवरून काढण्याचा मुद्दाच नाही

पण जसजसं इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर वाढला, बाजारपेठ पसरत गेली स्त्री पुरुष दोघांच्याही आयुष्यात या तंत्रज्ञानाने मोठी उलथापालथ घडवून आणली. आणि यातला मोठाच भाग होता किंवा आहे तो म्हणजे, व्यक्त होण्याचं तुफान स्वातंत्र्य. जे स्त्रियांना नव्हतं, किंवा असलं तरीही मर्यादित स्वरूपात होतं आणि अटीशर्तीसह होतं. इंटरनेटने फक्त जग जवळ आणलं असं नाही तरी स्त्रियांना स्वतःची स्पेस तयार करण्याची प्रचंड मोठी संधी आणि ताकद बहाल केली. जे वापरायला बायकांनी सुरुवात केल्यावर मात्र पारंपरिक समाज धारणा हादरल्या. आणि बाईच्या एकूण अभिव्यक्तीवर, तिच्या मतप्रदर्शनावर, तिला इंटरनेटने देऊ केलेल्या अमर्याद स्वातंत्र्यावर हल्ले आणि बंधनांची एक साखळी सुरु झाली. इंटरनेट, सोशल मीडिया ही माध्यमं एकीकडे सगळ्यांना वापराच्या आणि व्यक्त होण्याच्या समान संधी देतात तर दुसरीकडे समाजाचंच असमानतेच प्रतिबिंब तिथेही बघायला मिळतंच.

(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत.)
muktaachaitanya@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The women who changed the tech world digital technology gender equality nrp