नीलिमा देशपांडे
गेल्या लेखात (४ ऑगस्ट) आपण ‘स्त्रीची कामेच्छा’ म्हणजे काय हे पाहिले. या लेखात त्यामागची कारणे पाहू. यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्त्रीचं गर्भवती होणे.
बाळंतपण हा प्रत्येक स्त्रीसाठी आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात अनेकदा तिची कामेच्छा कमी होत असते. गर्भारपण, प्रसूती आणि त्यानंतरचे स्तनपान या सगळ्याच अवस्था स्त्रियांसाठी अनेकदा गुंतागुंतीच्या ठरू शकतात. याकाळातल्या वेदना आणि अस्वस्थता यामुळे त्याकाळात स्त्रीची कामेच्छा अनेकदा कमी होते. तसेच पुरेशी झोप घेता न येणे आणि थकवा यामुळेदेखील कामेच्छा तात्पुरती कमी होऊ शकते. गर्भारपणात आणि प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंतांमुळे स्त्रीची मानसिक अवस्था काहीशी निराश असते. बहुतेक स्त्रिया प्रसूतीनंतर सहा ते आठ महिन्यांनी गर्भधारणेपूर्वीच्या लैंगिक इच्छेच्या पातळीवर परत येतात.
हेही वाचा – ग्राहकराणी : दुकानदारांनी विकलेला माल परत घेतला पाहिजे..
गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर स्त्रियांच्या शरीराचा आकार अनेकदा बदलतो. बऱ्याचदा लठ्ठपणाकडे झुकतो. या तिच्या बदलत्या शारीरिक टप्प्यावर तिला धीर देणे आणि तिचे कौतुक करणे हे पतीचे कर्तव्य आहे जेणेकरून तिला पुन्हा स्वतःच्या लैंगिक आकर्षणाबद्दल आत्मविश्वास वाटेल.
लैंगिक संबंधांच्या वेळी कामेच्छा असणे आणि आपल्या जोडीदाराला आपण हवेहवेसे वाटणे, तसेच या प्रक्रियेत उत्तेजित होण्यासाठी लागणारा वेळ, कामोत्तेजना घडून येण्यासाठी निर्माण होणारी परिस्थिती हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. दीर्घकालीन नातेसंबंधांमध्ये कामेच्छा कायम राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी या सर्व गोष्टी जबाबदार असतात. जोडप्याने एकमेकांच्या आवडीनिवडी आणि नापसंती जाणून घेण्यासाठी, आपल्या गरजा आणि प्राधान्यांबद्दल बोलण्यासाठी, मुख्य म्हणजे नाते ताजे आणि रोमांचक ठेवण्यासाठी नवरा बायको दोघांनीही पुरेसा वेळ काढणे आवश्यक आहे. त्यासाठी जोडप्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ असेल तर जोडप्यांमध्ये कामेच्छा निर्माण होतेच.
कामेच्छा कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे दीर्घकालीन आजार. मधुमेह, उच्चरक्तदाब आणि अतिलठ्ठपणा यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याचा लैंगिकतेवर परिणाम होतो. या गोष्टींमुळे कामेच्छा, उत्तेजना आणि भावनोत्कटता कमी होते.
याशिवाय लैंगिक संक्रमित संसर्ग, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स इत्यादींसारख्या विविध परिस्थितींमुळे स्त्रियांना ओटीपोटात वेदना होणे, वेदनादायक मासिक पाळी असणे आणि संभोग करताना वेदना होणे या अनुभवातून जावे लागते. यावर योग्य उपचार आणि कायमस्वरुपी त्याची काळजी घेतल्यास लैंगिक आनंद वेदनादायी होणार नाही.
हेही वाचा – आहारवेद : रोगप्रतिकारशक्ती वर्धक लवंग
स्त्रीच्या कामेच्छेवर परिणाम करणारे इतर घटक म्हणजे कुटुंबियांशी असणारे नातेसंबंध. कौटुंबिक हिंसा मग ती शारीरिक असो वा भावनिक, नात्यावर परिणाम करतेच. याशिवाय नवऱ्याचे प्रेमप्रकरण वा नात्यातले तणाव यामुळे निर्माण होणारी असुरक्षिततेची भावना हीसुद्धा नात्यावर परिणाम करते. याशिवाय खासगीपणाचा अभाव हेही लैंगिक आनंदात बाधा आणतात. लहान घर वा घरात खूप माणसे असणे यामुळेही जोडप्याची कामेच्छा कमी होऊ शकते.
रजोनिवृत्ती हा एक गंभीर काळ आहे. याकाळात इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनची कमी होणारी पातळी जवळीकता आणि कामेच्छा कमी होण्यास कारणीभूत ठरते. तसेच याकाळात स्त्रीला योनी कोरडी झाल्याने वेदनादायी अनुभव येऊ शकतात. अशावेळी मॉइश्चरायझर आदीचा वापर करून चांगले शरीरसंबंध घडू शकतात.
कामेच्छा विकारांवर उपचार करण्यासाठी परवानाकृत अनेक नवीन औषधे उपलब्ध आहेत जी स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीपूर्व कामेच्छा विकारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचाही वापर करता येणे शक्य आहे.
हेही वाचा – गच्चीवरची बाग: बॉटल गार्डन ‘टेरॅरियम’
जोडप्यांना आपल्या लैंगिक गरजा आणि त्यांचा प्राधान्यक्रम माहीत असणे आणि त्यासाठी एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याने नात्याचा आनंद घेता येणे शक्य आहे. अशी सेक्स थेरपी दोघांमधील आनंद वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तात्पर्य, स्त्रियांमधील कामेच्छा हा एक जटिल विषय आहे. त्याची कारणे तसेच त्यावरच्या उपाययोजना याचे अनेक पैलू आहेत. ज्ञान, शिक्षण, एकमेकांविषयीचा समजूतदारपणा यामुळेच स्त्रीची कामेच्छा जिवंत राहाण्यास मदत होऊ शकेल.