२ ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिन सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात येतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहेच. परंतु, महिला सक्षमीकरणामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. स्त्रियांनी मानसिक आणि शारीरिकरित्या खंबीर होण्याची गरज आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रयत्नही केले. गांधी जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधीजींनी स्त्रियांना सक्षम होण्याकरिता दिलेला सल्ला जाणून घेणे आणि तो आचरणात आणणे महत्त्वाचे ठरेल.
महात्मा गांधीजींना संपूर्ण समाजाचे उत्थान करायचे होते. भारताचा विकास होण्याकरिता गावांचा विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेसह खेड्यांकडे चला असा सल्ला दिला. ग्रामीण स्तरावर येऊन लोकांसाठी कार्य करताना, सामान्य लोकांमध्ये मिसळून जनजागृती करताना त्यांना महिलांचे खडतर आयुष्य दिसले. केवळ चूल आणि मूल, पतीपरमेश्वर, घर-संसार यामध्येच या महिला गुंतून पडल्या होत्या. आपण अबला आहोत, आपल्याकडून कोणतेच कार्य होणार नाही, असा समज त्यांनी केलेला. मुख्यतः त्यांच्यावर असणारी सामाजिक बंधने, पुरुषप्रधान संस्कृती यामुळे त्यांचे अधिकाधिक खच्चीकरण झालेले. त्यातही हिंदू स्त्रिया आणि मुस्लिम स्त्रिया यांच्याही स्वातंत्र्यामध्ये फरक होता. स्त्री म्हणून असणारी बंधने आणि धार्मिक बंधने यामुळे स्त्रियांचे आयुष्य खडतर झाले होते.
हेही वाचा : Gandhi Jayanti 2023 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये धारातीर्थी पडलेली ‘ही’ वीरांगना माहीत आहे का ?
जनजागृती करताना, रविवारच्या सभांमधून महात्मा गांधीजींनी स्त्रियांना सक्षम होण्याचा सल्ला दिला. त्यांनी मुख्य मुद्दा मांडला की, स्त्री ही अबला नसते. स्त्रीला तू अबला आहेस असा सांगून सातत्याने कमी लेखण्यात आले. पुरुषांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात आले. परंतु, स्त्री ही अबला नसते. हिंदू धर्मातील सीतामाई किंवा सावित्री यांची उदाहरणे त्यांनी दिली. या दोन्ही स्त्रियांनी वनवास सहन केला, संकटांमध्येही स्थिर राहिल्या, आपल्या पतीचे प्राण जिद्दीने परत आणले, अशी अनेक खंबीर स्त्रियांची उदाहरणे हिंदू धर्मशास्त्रात आहेत. महात्मा गांधींनी महिलांना हिंदू धर्मातील कर्तृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांचा आदर्श घेण्यास सांगितले
केवळ मानसिक दृष्ट्या सक्षम न होता, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. महिलांनी केवळ घरची कामे न करता, पतीसेवा आणि मुलांमध्येच गुंतून न पडता स्वतःसाठीही वेळ द्यावा. ग्रामीण स्तरावर जनसेवा करणे, सूत कातणे, अशी कामे काही तास करणे आवश्यक आहेत. त्यातून त्या स्वतः सक्षम होतील. तसेच हिंदू स्त्रियांना मुस्लिम स्त्रियांपेक्षा थोडे अधिक स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे हिंदू स्त्रियांनी समाजामध्ये मिसळून, जे वंचित आहेत, अज्ञानी आहेत, त्यांच्यामध्ये जागृती करून महिला सक्षमीकरण करण्याचे कार्य महात्मा गांधीजींनी केले.
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य जाणून घेताना महिलांच्या सक्षमीकरणाकरिता केलेले कार्यही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.