रोजचा दिवस. ऑफिसेस सुटण्याची गर्दीची वेळ. लोकल ट्रेनच्या त्या लेडीज डब्यात खचाखच गर्दी. गर्दीत धक्के खात सुमन बराच वेळ उभी होती. अखेर तिचं कधीतरी बसायला जागा मिळाली. मनात विचारच विचार. ‘नोकरीत ताण वाढत चाललाय… घरचा ताणही काही कमी नाही. आता यापुढे घरी पोहोचायला साडेआठ वाजणार. बस लवकर नाही मिळाली तर नऊच. मग कुकर लावायचा. पोळ्याही करायच्यात आज. जेवणानंतर भांडी… रात्री कपडे भिजवून ठेवायला लागतील, म्हणजे सकाळी उठून ते धुवायचे… हल्ली खर्च फार वाढलेत. कामाला बाई परवडत नाही. घरातल्या कामांमध्ये कुणी मदतही करत नाही. सासूबाई म्हणतात, “मुलं सांभाळतोय ना आम्ही तुझी…आणखी काय करायचं!” नवरा म्हणतो,”करोना असताना करतच होतो ना घरातलं काम?… आता नाही जमणार बुवा! दमून येतो मी.”
हेही वाचा- तान्ह्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक असते? कसे ओळखावे?
आपल्या विचारांचा सुमनला फार राग आला. काय हे लाईफ आहे! हे असंच चालायचं का?… आपल्या विचारांची धावसुद्धा कुंपणपर्यंत काय, माजघराच्या पुढे काही जात नाही! ती एक उसासा टाकून मनाशी खिन्नपणे हसली.
तेवढ्यात “केक… वेफर्स… चाकलेट…” अशी हळी ऐकू आली आणि अर्थातच सुमनचं लक्ष तिकडे गेलं. एक बाई डब्यात मोठ्ठी पिशवी घेऊन छोटी ५-५ रुपयांची केकची पाकिटं, वेफर बिस्किट्स विकत होती. सावळी, कपाळावर आडवं छोटं गंध लावलेलं, कुरळे केस आंबड्यात बांधलेले. ‘साऊथ इंडियन असावी!’ सुमननी मनाशी ठरवून टाकलं! ‘ट्रेनच्या भर गर्दीत या बायकांना कशा या पिशव्या घेऊन वावरता येतं देव जाणे!’ काही जण त्या बाईकडून वेफरची बिस्किटं घेतसुद्धा होते. ‘पाच-पाच रुपये किंमत! काय कमाई होत असेल हिची?… ही काही रस्त्यावर राहणारी वाटत नाही. हिच्या घरी कोण असेल… हे इतके कष्ट करून हीसुद्धा आपल्यासारखी घरी जाऊन पुन्हा कामाला जुंपत असेल का?…’ सुमनच्या डोक्यात उगाच विचार!
हेही वाचा- विवाह समुपदेशन : प्रेमाचे काचणारे बंध
तेवढ्यात कुठून तरी खणखणीत आवाज आला, “ये लो दस रुपये. मेरेको १० को तीन बिस्किट देना!” आवाज लहान मुलीचा वाटला, म्हणून सुमननं लगेच तिकडे बघितलं… लहान मुलगीच. हीसुद्धा सावळीच, तरतरीत नाकाची, नऊ-दहा वर्षांची असावी. मळका फ्रॉक, अनेक दिवस तेल न लावलेल्या भुरभुरीत केसांचं पोनी घातलेलं आणि पायाशी बांबूच्या पाटीत संत्री! ‘म्हणजे हीपण छोटी विक्रेतीच!’ सुमनचे विचार सुरू! ‘ “पाच रुपयांना एक संत्र, दहाला दोन” असं मगाशी इथून ओरडत गेली ती हीच!’ हातात छोटा चाकू- संत्र कापून द्यायला! आणि तिखटामिठाची वाटी.
‘हो, नाही’ करता करता त्या तरतरीत पोरीनं बिस्किटवालीला भरीस पाडलंच! इतर कुठल्याही ग्राहकाला न दिलेली सूट देऊन पोरीला दहा रुपयांना तीन वेफर बिस्किटं मिळाली. तीसुद्धा मुलीनं अगदी निवडून घेतली. “एक चाकलेट दिया, तो दुसरा व्हॅनिला देना” वगैरे.
मग वेफरवाली म्हटली, “अभी मेरेको एक संत्रा दे! पर मेरेको भी डिसकाऊंट चाहीये! दो रुपयेका एक देना…”
सुमनसकट सगळ्या आजूबाजूच्या बायकांचं लक्ष त्या छोटीचं उत्तर काय असेल इकडे!
“दो रूपये मे नही परवडता रे! तुम्हे तीन रूपयेमे एक संत्रा देती हूं!” तिनं उदारपणे जाहीर करून टाकलं. सुमनला खुदकन हसायला आलं! वेफरवालीही हसली. तिनं तीन रुपये छोटीच्या हातावर ठेवले आणि त्यातल्या त्यात छान दिसणारं संत्र निवडलं. मुलीनं हातातल्या सुरीनं त्याचं साल अगदी कौशल्यानं कापलं, तिखटमीठ पेरून संत्र बाईच्या हातावर ठेवलं. सुमनला फार कौतुक वाटलं, जरा भीतीही वाटली, ‘हातबीत कापला तर…’
मग उगाच वेफरवाली आणि छोटीच्या ‘विक्रेता टु विक्रेता’ गप्पा सुरु झाल्या! ‘तू याच गाडीत असतेस का?’ ‘संध्याकाळीच येतेस का?’ वगैरे. त्यांच्या वयातला भेदसुद्धा जणू काही काळासाठी पुसट झाला!
शेवटचं स्टेशन जवळ आलं, तशी उतरण्याच्या तयारीत लोकलच्या दाराजवळ गर्दी व्हायला लागली. त्यातून वाट काढत छोटी शिताफीनं दाराजवळ जाऊ लागली. “हटो आंटी, हटो आंटी” करत. एक तरुण मुलगी हसत तिला म्हणाली, “आंटी मत बोल यार. दीदी बोल. आंटी बोले तो हर्ट होता हैं!”
“अच्छा, आंटी नही तो अंकल बोलती हूं!” छोटीच्या उत्तरावर सगळ्या हसल्या. ती तरुणी लटक्या रागानं म्हणाली, “और तुझे क्या इतनी जलदी हैं रे? सबको धक्का देके तुझे आगे जाना हैं!” “अरे दीदी, आज मेरेको जलदी घर जानेका हैं. कल मेरा पाचवी का एक्साम हैं!” तिच्याकडे कौतुकानं बघत स्टेशनवर सगळ्या उतरल्या. छोटी लगबगीनं निघून गेली.
कुणीतरी म्हणालं, “ये लडकी ना, बहुत आगे जाइगी!”
सुमनच्या मनात आलं, ‘आपणही फार कष्टानं शिकलो… कष्टानं काम करतो… पण घरी ‘कामाला खपी’ यापलीकडे आपली किंमत नाही! आपल्या महत्वाकांक्षा काय असतील, कुणी कधी विचारतसुद्धा नाही. आपल्याला आपली कदर करणारी माणसं नाही मिळू शकली. हिलातरी ती मिळावीत!… तसं झालं, तर मात्र खरंच ये लडकी बहुत आगे जाइगी!….’ आणि सुमन आणखी गर्दीत मिसळून बस स्टॉपकडे चालू लागली.