शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला सरकारकडून जनजागृती केली जाते. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ म्हणत अनेक योजना राबविल्या जातात. पण फक्त एखादी व्यक्ती सांगतेय म्हणून कोणीही आपल्या मुलांना, मुलींना शिकवत नाही. त्यासाठी आई-वडिलांना शिक्षण किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. खेड्यापाड्यांमध्ये अजूनही मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शिक्षणाबद्दल उदासीनता आढळते. नुकतीच माझ्या परिचयातील कुटुंबात एक घटना घडली, ज्यामुळे खरंच लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय का की, अजून ते कळायला कित्येक वर्षे जातील असे प्रश्न मला पडले.

साधारण दोन महिन्यांपूर्वी तीन सख्ख्या बहिणी लग्नाच्या चार दिवसांआधी घरातून पळून गेल्या. (मुलींच्या वयात फार अंतर नव्हतं, त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी एकाच दिवशी तिन्ही मुलींची लग्नं करायचं असं ठरलं होतं.) या मुली परिचयातल्या असल्याने बातमी ऐकून धक्का बसला. मुलींची शोधाशोध सुरू होती, पण त्या सापडत नव्हत्या. घरातल्यांनी त्या गेल्यानंतर दोन दिवस कुणालाही कळूच दिलं नव्हतं. पण लग्न अगदी तोंडावर आलं आणि मुली घरात नाहीयेत हे कळलं. मग फोनाफोनी सुरू झाली आणि मुलींना शोधण्याचं काम चालू झालं. आता लग्नघरातून मुलीच पळून गेल्या म्हटल्यावर ‘त्यांची अफेअर्स असतील म्हणून पळून गेल्या असतील’ असं लोक म्हणू लागले. अनेकांनी तर या मुलींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्या पळून गेल्यात असं पसरवलं. माझ्या सोशल मीडियावरही ते फोटो, व्हिडीओ आले. मुली पळून गेल्या म्हटल्यावर त्यांच्या पालकांना पोलिसांत तक्रार द्या, असं सांगण्यात आलं. ते गेले आणि पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला, पण त्यांचा काहीच पत्ता नव्हता, कारण तिघीही त्यांचे फोन घरीच ठेवून गेल्या होत्या. प्रवासासाठी लागणारे काही पैसे घेऊन त्या घराबाहेर पडल्या होत्या. बाजारात जातोय, असं सांगून त्या निघून गेल्या त्या परतच आल्या नाही.

तिने लग्नाच्या आठ दिवसाआधी त्याला दिला नकार

तक्रार आल्यावर पोलिसांनी शोधाशोध केली, पण काहीच माहिती मिळाली नाही. अशातच पोलिसांची एक व्हॅन त्यांच्या घरी येऊन पोहोचली. ती मुलींच्या आई- वडिलांना सोबत नेण्यासाठी होती. पोलिसांनी सांगितलं की, मुली कलेक्टर ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांनी आई-वडिलांविरोधात तक्रार दिली आहे. पालकांना तिथं नेल्यावर कळलं की, आई-वडील जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याची लेखी तक्रार त्या मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती. मुलींच्या तक्रारीत एका गोष्टीचा उल्लेख होता, तो म्हणजे शिक्षण!

तिघीही बहिणी १९ ते २२ या वयोगटातल्या आहेत. तिघींनाही पुढे शिकायचं होतं, पण वडिलांनी लग्न ठरवलं, त्यात मुलाकडची मंडळीही फारशी शिकलेली नव्हती. मुलंही जेमतेम ८ वी, १० पर्यंत शिकलेली, लग्न जमवलं तेव्हाही आम्ही पालकांना सांगितलं होतं की, आम्हाला ही स्थळं पसंत नाहीत. आम्हाला शिकायचं आहे, शिक्षण पूर्ण झालं की लग्नाचं बघू असं त्या मुलींचं म्हणणं होतं. त्यांनी आई-वडिलांना समजावून सांगितलं, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाहीच मग या मुलींनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या काही मैत्रिणींची मदत घेतली होती.

पद्मश्री विजेत्या आहेत ईशा अंबानीच्या सासूबाई, करिअर अन् घर सांभाळून यश मिळवणाऱ्या स्वाती पिरामल यांच्याबद्दल जाणून घ्या

पहिल्या भेटीनंतर लग्नाची तारीख निघून गेल्यावरच आई-वडिलांना भेटू, असं मुलींनी प्रशासनाला सांगितलं. पुन्हा भेट झाल्यावर मुलींची प्रतिक्रिया अशी होती, “आम्ही तुम्हाला समजावलं होतं की आम्हाला शिकू द्या, लग्न आता करायचं नाही. तुम्ही जिथं तिघींची लग्न ठरवलीत ती लोकं शिकलेली नाहीत, जोडीदार म्हणून निवडलेली मुलंही फारशी शिकलेली नाहीत, मग आम्ही तिथं आयुष्य कसं घालवायचं? आम्ही काय जनावरं आहोत का की, तुम्हाला वाटेल त्या व्यक्तीशी हवं तेव्हा लग्न लावून द्याल. आम्हाला लग्न करायचं नाही, शिक्षण पूर्ण करून नोकरी करू. आम्ही तुमच्यासोबत घरी येणार नाही.”

या घटनेला दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यात कुटुंबियांनी, नातेवाईकांनी अनेकदा मुलींना भेटून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही घरी परत चला, लग्न लावणार नाही, शिक्षण पूर्ण करू असं वचनही आई-वडिलांनी दिलं. पण आमचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही घरी नेऊन मारून टाकाल किंवा लग्न लावून द्याल, असं म्हणत त्या मुलींनी नकार दिला. ही घटना घडली त्यानंतर आठवडाभरातच जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांना कॉलेजला प्रवेश मिळवून दिला. आता त्या तिघीही तिथे राहून अभ्यास करत आहेत, पण घरी परतायला मात्र तयार नाहीत.

भारतात फिरायला आल्या अन् पडल्या उद्योगपतीच्या प्रेमात; उभारली १,३०,००० कोटी रुपयांची कंपनी, ‘त्या’ रतन टाटांच्या…

शिक्षणाचा मुलभूत अधिकार असूनही जन्मदात्या आई-वडिलांच्या विरोधामुळे घरातून पळून जायची वेळ या मुलींवर आली. त्यांनी समजून घेतलं असतं तर कदाचित तिन्ही मुली लग्नाआधी पळून गेल्या म्हणून, जी बदनामी वाट्याला आली ती झाली नसती आणि आज मुली त्यांच्याचबरोबर असत्या. या मुलींचं वय पाहता त्यांना सध्याच्या दुनियेची खूप समज नाही, पण त्यांनी उचललेल्या या पावलानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना केलेली मदत कौतुकास्पद आहे. तिथं राहून त्या शिकतील, पाहिलेली स्वप्नं पूर्ण करतील पण जन्मदात्या आई-वडिलांवरचा विश्वास उडाला आहे तो परत कसा येणार?

हेही वाचा – मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

आईवडील हे मुलांसाठी आधारवड असतात. पण सगळ्या मुलांच्या नशिबी हे भाग्य नसते. ज्यांनी साथ द्यायची ते आईवडीलच हट्टाला पेटले. मात्र या प्रकाराने खचून न जाता या मुलींनी वेगळी वाट चोखाळली. सुदैवाने प्रशासनाने साथ दिल्याने या मुलींची परवड थांबली आहे. या उदाहरणातून बोध घेत समाजातले अन्य पालक मुलींप्रति संवेदनशील होऊन वागतील अशी आशा आहे.

Story img Loader