IAS Tina Dabi Mother : केंद्रीय लोकसेवा आयोगाची युपीएससी ( UPSC ) परीक्षा ही भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे. IAS अधिकारी बनू इच्छिणाऱ्यांना या परीक्षेचे तिन्ही टप्पे उत्तीर्ण व्हावे लागतात. अथक परिश्रम, संयम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते.
IAS, IPS, IRS किंवा IFS अधिकारी म्हणून देशसेवा करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयएएस टीना डाबी यांचं हेच स्वप्न २०१६ मध्ये पूर्ण झालं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. टीना डाबी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्यावर अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान झाल्या. सध्या टीना ( Tina Dabi ) या राजस्थानमध्ये जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. यानंतर टीना यांची धाकटी बहीण रिया डाबी यांनी देखील २०२० मध्ये युपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या त्या उदयपूरमध्ये कार्यरत आहेत. पण, तुम्हाला माहितीये का या दोन्ही बहिणींच्या यशामागे त्यांच्या आईचा वाटा आहे.
हेही वाचा : ८० वर्षांची स्विमर आजी! एकेकाळी पोहोण्याची वाटायची भीती, आता आहेत स्विमिंग चॅम्पियन; १३ व्या वर्षी लग्न झालं अन्…; वाचा प्रेरणादायी कहाणी
टीना यांच्या आई हिमानी यांच्याबद्दल जाणून घ्या…
टीना डाबी ( Tina Dabi ) यांच्या आई हिमानी या देखील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी ( IES ) म्हणून कार्यरत होत्या. कालांतराने त्यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी नोकरीचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली. टीना डाबी यांच्या आई हिमानी या ‘मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) भोपाळ’च्या विद्यार्थिनी आहेत. येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. निवृत्तीनंतर हिमानी यांनी केवळ घरची जबाबदारीच घेतली नाही तर टीना यांना युपीएससी परीक्षेची तयारी करण्यात मदत केली.
हिमानी यांचे पती आणि टीना ( Tina Dabi ) यांचे वडील जसवंत डाबी हे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (BSNL) चे महाव्यवस्थापक आहेत. हिमानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “UPSC परीक्षेची तयारी करणं हे सोपं काम नाही. हे समजूनच पूर्ण वेळ माझ्या मुलीला देता यावा या उद्देशाने मी नोकरी सोडली.” टीना डाबी या २०१५ च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ऑल इंडिया टॉपर होत्या. यानंतर त्यांची प्रचंड चर्चा झाली. टीना यांचे पती प्रदीप गावंडे हे देखील आयएएस अधिकारी आहेत.
हिमानी यांची धाकटी लेक रिया यांनी २०२० च्या UPSC परीक्षेत ऑल इंडिया (AIR) 15 वा रँक मिळवला होता. या दोन्ही बहिणींच्या यशाचं श्रेय त्यांच्या आईला जातं कारण, स्वत:चं करिअर पणाला लावून हिमानी यांनी आपल्या दोन्ही मुलींचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.