जीवनात आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आणि कठोर परिश्रमाचे फळ एक ना एक दिवस मिळतेच. असंच काहीसं झालंय बिहारच्या लेकीसोबत. बिहारमधील जमुई येथे राहणाऱ्या टिनू सिंग यांनी एकाचवेळी ५ दिवसांत पाच सरकारी नोकरी मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.
टिनू सिंग या बिहारमधील जमुई जिल्ह्यात राहणाऱ्या मुन्ना कुमार सिंग आणि पिंकी सिंग या दाम्पत्याची मुलगी. वडील मुन्ना कुमार सिंग हे सीआरपीएफ मध्ये सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत तर आई पिंकी सिंग यादेखील एमए पर्यंत शिकलेल्या आहेत. कौटुंबिक जबाबदारीमुळे पिंकी सिंग यांनी गृहिणी होण्याचा मार्ग स्विकारला. टिनू सिंग म्हणतात की, आईला बीपीएससी अधिकारी बनायचं होतं, पण आमच्या पालनपोषणासाठी तिने आपल्या स्वप्नांचा त्याग केला.
आणखी वाचा-कसोटीत दहा विकेट्सचा विक्रम करणारी स्नेह राणा
टिनू सिंग जसजशी मोठी होत गेली तसे तिला आपल्या आईच्या त्यागाची जाणीव होऊ लागली. तसेच आजची तरुण पिढी दिवसभर सोशल मीडियावर अपडेट असते अशातच टिनूने सोशल मीडियापासून सोशल डिस्टन्स ठेवून स्वत:चे आणि आईचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री केली. जिथे तरुण पिढी सोशल मीडियावर वेळ वाया घालवत त्याचवेळी टिनू पुस्तके वाचून नोट्स काढत असे. आणि त्याचीच प्रचिती म्हणून ती आज एक मोठी सरकारी अधिकारी बनली आहे. वडील मुन्ना कुमार सिंग हेदेखील सीआरपीएफ सबइन्स्पेक्टर असल्याने त्यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन तिला मिळत राहिले.
टिनूने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय बनली आहे. सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तर ती एक रोल मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
आणखी वाचा-सोलो ट्रॅव्हलर आहात? एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला ‘हे’ सहा नियम माहितच असायला हवेत!
आता टिनू यांनी या पाचमधील सहाय्यक शाखा अधिकारीची नोकरी निवडली आहे. टिनू यांचं यश आज सर्वांना दिसत असलं तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. याआधीही तिने तीन वेळा बिहार राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. परंतु या परीक्षेने तिला तीनही वेळा थोड्या गुणांनी हुलकावणी दिली. पण तिने जिद्द सोडली नाही. अखेर तिच्या मेहनतीला यश मिळाले. टिनू म्हणते की, मी आता जरी सहाय्यक शाखा अधिकारी पदावर रुजू झाली असली तरी माझा प्रवास अजून संपला नाही. नोकरी सोबतच पुढे अभ्यास चालू ठेवून यूपीएससीची परीक्षा देऊन आय.ए.एस बनण्याचं स्वप्नं आहे आणि मला आशा आहे तेदेखील मी लवकरच पूर्ण करेन.
टिनू सिंग यांच्या अभूतपूर्व यशाने ती तरुणांसाठी रोल मॉडल तर बनली आहेच, पण संपूर्ण बिहारमध्ये ‘अफसर बिटिया’ म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
rohit.patil@expressindia.com