संपदा सोवनी
शेवग्याच्या शेंगा –
पदार्थाच्या कृतीकडे वळण्याआधी शेवग्याच्या शेंगा खरेदी करताना काय काळजी घ्यावी, ते पाहू या. या शेंगा घेतानाच चांगल्या ‘दळदार’- म्हणजे किंचित जाड, गर असलेल्या घ्याव्यात असं सांगितलं जातं. त्याच वेळी शेंगा ताज्या, हिरव्या आहेत ना, हेही पाहून घ्यावं.पातळ, बारक्या शेंगांत गर कमी असतो, त्यामुळे त्याचा चोथाच जास्त होतो. तर काही जाडसर शेंगा जून झालेल्या असतात. त्यातल्या बिया तयार झालेल्या असतात. अशा शेंगाही घेऊ नयेत.
महाराष्ट्रीय अन्नपदार्थांमध्ये शेवग्याच्या शेंगा साधारणपणे आमटीत वापरतात. सांबार आणि पिठल्याला त्या वेगळीच आणि उत्तम चव आणतात. तसंच अनेक लोक शेवग्याच्या शेंगा, तूरडाळ आणि खोबऱ्याचं चवदार वाटण घालून रस्साभाजीसुद्धा करतात.
पण तुम्ही कधी ‘शेवग्याच्या शेंगांचा पराठा’ ही संकल्पना ऐकली आहे का? यात ताज्या, जाडसर शेवग्याच्या शेंगा घेऊन त्या न शिजवताच कापून आतला गर सुरीनं काढून घेतात. हा गर बारीक चिरून घेतात आणि कांद्यावर फोडणीस टाकून आपल्या आवडीचे मसाले घालून त्याची कोरडी भाजी करतात. ही भाजी कणकेच्या गोळ्यात भरून लाटून खरपूस भाजतात. ब्लॉगर कमला आनंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ही रेसिपी ‘शेअर’ केली आहे.
हेही वाचा >>>नातेसंबंध: घाई- नातं जोडण्याची आणि तोडण्याचीही!
पडवळ –
पडवळाची भाजी पुष्कळ जणांना आवडत नाहीच. महाराष्ट्रात ही भाजी अनेक पद्धतींनी केली जाते. काही जण लसूण-खोबऱ्याचं वाटण घालून करतात, तर काही जण ‘प्लेन’ – नुसतं तिखट, मीठ, धणेपूड घालून, अंगाबरोबर कमी रस ठेवून भाजी करतात, वरून ओलं खोबरं घालतात. काही जण भिजवलेले वाल (बिरड्या) घालून, तर काही पीठ लावलेली सुकी भाजीही करतात. मात्र कशीही केली तरी ‘पडवळ’ म्हटल्यावर अनेकजण नाकं मुरडतातच!
पण तुम्ही कधी पडवळाच्या बियांची चटणी खाल्ली आहे का? महाराष्ट्रात काही ठिकाणी हा पदार्थ आवर्जून केला जातो, मात्र तो अनेकांना माहिती नसतो. पडवळ चिरल्यावर त्यातला गर- यातच बियाही येतात (हा भाग थोडासा कापसाच्या ‘टेक्स्चर’चा असतो) फेकून दिला जातो. पडवळाचा हा गर व बिया तेलावर परततात, त्याबरोबर लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जीरं घालतात. हे मिश्रण थोडं परतून मीठ घालून चटणी वाटतात. किंचित साखर वा गूळ आवडत असल्यास वाटताना घातला जातो. आयत्या वेळी, जेवायला बसताना या चटणीत लिंबू पिळून चटणी सरसरीत केली जाते. ही चटणी तुम्ही जेवताना वाढलीत आणि ती पडवळाची आहे हे सांगितलं नाहीत, तर कुणीही ते ओळखू शकणार नाही!
हेही वाचा >>>भक्ती बर्वे: ‘सळसळत्या ऊर्जेची फुलराणी’
अळूची भाजी आणि मका, मुळा व पिकलेलं केळं!
अळूची भाजी खूप ठिकाणी महाराष्ट्रीय समारंभाच्या जेवणात आणि एरवीही अनेक कुटुंबांत केली जाते. त्यात साधारणपणे शिजवताना हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घालतात. पण अळूची भाजी आणखी चवदार बनवण्यासाठी सुगरणी पूर्वापार त्यांच्या परीने त्यात आणखी काही न काही भाज्या घालत आल्या आहेत.
अळूच्या भाजीत मक्याचं कणीस गोल तुकडे (जाड चकत्यांसारखे) करून घालतात. काही जण अळूच्या भाजीत पांढऱ्या मुळ्याच्या चकत्या घालतात. तर काही जर पिकलेल्या केळ्याचे स्वच्छ धुवून सालीसकट जाड जाड काप करून घालतात. या प्रत्येक पदार्थाने अळूच्या भाजीला वेगळी रंगत येते आणि भाजी आणखी ‘इंटरेस्टिंग’ होते.
‘पिकलेलं केळं’ वाचून ‘कसं लागेल ते?’ असं काही ‘चतुरां’ना वाटेल! पण त्याचीही एक वेगळी चव आहे. तुम्हाला जर भाज्यांत कधी तरी थोडी गोडसर चव आवडत असेल, तर तुम्हाला ते आवडेल! जरूर करून पाहा!
lokwomen.online@gmail.com