डॉ. नागेश टेकाळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृक्षराजी म्हणजे वृक्षांचे राज्य. गृहसंकुलात राज्य कुणाचे असावे, सदनिकांच्या गर्दीचे की वृक्षांच्या रुबाबदारपणाचे हा प्रश्न विकासक, रचनाकार त्याप्रमाणे रहिवाशांनासुद्धा अनेक वेळा गोंधळात टाकतो. कमीत कमी ३० टक्के हिरवाई ही गृहसंकुलात हवीच, या शासनमान्य नियमांचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने काढतात आणि त्यामध्ये अनेक वेळा बहारदार वृक्षराजीस गौण स्थान मिळते.

वृक्ष म्हटले की भले मोठे झाड, त्याने अडवलेली जागा, त्याच्या खाली पडलेल्या काड्या-काटक्या, पाने, फुले, फळ, त्यांची साफसफाईची कटकट, पावसाळ्यात तुटणाऱ्या फांद्या, पक्ष्यांची शीट आणि रात्री उगीच धीरगंभीर वातावरण असा काहीतरी विचित्र गरसमज रहिवाशांचा झालेला असतो. अभ्यासाअंती तो सहज दूर होतो हे वेगळे.

हेही वाचा >>> पालकांच्या मंजुरीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही?

गृहसंकुलात सदनिकांची गर्दी जरूर असावी, पण त्यांना वृक्षांची तेवढीच सोबत असेल तर तेथे राहण्यास काही वेगळाच अर्थ प्राप्त होतो. अनेक पर्यावरण आणि वृक्षप्रेमी विकासक गृहसंकुलांच्या बांधणीमध्ये मूळ जागेवर असलेल्या वड, पिंपळ, चिंच, शिरिष, पर्जन्यवृक्ष यांना योग्य सन्मान देऊन त्यांच्या संरक्षणासाठी रचनाकार निर्देश देतात. मुंबई, पुणे येथील अनेक गृहसंकुले अशा भव्य वृक्षांनी नटलेली आढळतात. त्यांच्या भोवती केलेला गोलाकार पार हा जेष्ठ नागरिकांना एक वेगळी अनुभूती देऊन जातो.

मूळ वृक्षांचे स्थान आबाधित ठेवून नवीन कोणते वृक्ष गृहसंकुलात असावेत आणि असू नयेत, असा प्रश्न सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना कायम पडलेला असतो. अशा वेळी वृक्षतज्ज्ञांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. गृहसंकुलात वृक्ष निवड करताना त्यांच्या मध्यम उंची बरोबरच त्यांचा पर्णसंभार, मिळणारी सावली, पक्ष्यांचा सहवास, मुले आणि ज्येष्ठांचा आनंद याचा प्रामुख्याने विचार करावा. मोठ्या प्रमाणावर फळे खाली पडून, रस्ते निसरडे होऊन रहिवाशांच्या अपघातास कारणीभूत ठरणारे उंबर, जांभूळ, बदाम यांसारखे वृक्ष शक्यतो टाळावे. वाऱ्यापावसामध्ये गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष यांच्या फांद्या खाली वाकतात. अनेकदा ठिसूळ होऊन खाली पडतात. हेसुद्धा वाहनांना आणि रहिवाशांसाठी अचानक होणाऱ्या लहान-मोठय़ा अपघातांचे कारण असते. बाभूळ प्रकारामधील झाडे त्यांच्या शेंगाच्या अफाट श्रीमंतीमुळे मुळीच आकर्षक दिसत नाही, त्यांची वाढही वेगाने होते म्हणून त्यांना हमखास टाळावे. निलगिरी आणि सुरुची झाडेसुद्धा पाना-फळांचा खूप कचरा करतात. भांडण, कुरबूर यांचे मूळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरणारे.

हेही वाचा >>> लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध बलात्कारचा गुन्हा ठरणार!

 आम्रवृक्ष, नारळ, फणससारख्या तत्सम फळवृक्षांना गृहसंकुलात अजिबात स्थान नसावे आणि या यादीमध्ये केळीलासुद्धा अपवाद करू नये. सुगंधी फुलांचे वृक्ष असावेत का? हा चर्चेचा मुद्दा आहे. अनेकांना ते झाडावरच पाहावयास आवडतात तर बरेच रहिवाशी पहाटेच्या प्रभातफेरीचा फायदा घेऊन त्यांना देवघरात स्थान देतात. यावर उपाय म्हणून बकुळ, सोनचाफा, पांढरा, तांबडा चाफा यांनाच प्राधान्य द्यावे. गृहसंकुलात पानझडीचे वृक्ष टाळावेत. भरपूर पर्णसंभार असलेले, सदाहरित, मध्यम उंचीचे डेरेदार वृक्ष गृहसंकुलाचे सौंदर्य वाढवतात. म्हणून सिताअशोक, नागकेशर, सप्तपर्णी, पुत्रंजिवा, पिवळा कांचन, कदंब या देशी वृक्षांना सर्वप्रथम स्थान असावे, पण त्याचबरोबर अंब्रेला वृक्ष, खाया, असुपालव, गुलाबी कॅशिया आणि पांढऱ्या फुलांचा सडा टाकणारे बुचाचे झाड या विदेशी वृक्षाबद्दलही तेवढेच प्रेम हवे.

गृहसंकुलात उन्हाळ्यात फुललेला बहावा सौंदर्यात वेगळीच भर टाकतो. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सुरेख सोनझुंबरासारख्या फुलांचा कुणास त्रासही होत नाही. गृहसंकुलातील सदनिकांची संख्या आणि आतील वृक्षराजी यामध्ये समतोलपणा असावा. भरपूर हिरवा पर्णसंभार असणारे डेरेदार वृक्ष विविध प्रकारच्या पक्ष्यांना आकर्षति करतात. त्याचबरोबर प्राणवायूची निर्मिती करून संकुलातील वातावरण उत्साहित ठेवतात आणि तापमानही कमी करतात. मुख्य शहरातील तापमानापेक्षा वृक्षराजीने समृद्ध गृहसंकुलातील तापमान २-३ अंशांनी कमी असलेली अनेक उदाहरणे ठाणे आणि मुंबईत आजही पाहावयास मिळतात.

हेही वाचा >>> नातेसंबंध – ‘लाईट , अडवान्स, हार्ड सिगारेट?

संकुलातील वृक्षराजीची फार काळजी घेण्याची आवश्यकता नसते. प्रत्येक वृक्षाभोवती दीड-दोन फुटांचे आळे असावे आणि त्यामध्येच झाडांचा पालापाचोळा टाकत जावा. पावसाळ्यापूर्वी वृक्षाची वाढ व्यवस्थित तपासावी त्याचबरोबर प्रतिवर्षी एक दिवस सर्वानीच वृक्षदिन साजरा करावा.

गृहसंकुलातील समृद्ध वृक्षराजी हा हरित इमारतीच्या संकल्पनेचा एक भाग आहे त्याचबरोबर तो संकुलात राहणाऱ्या कुटुंबाच्या आनंदाचा, चैतन्याचा आणि उत्साहाचा ठेवाही आहे. अशा ठेव्याची वाट ही नेहमीच निरोगी निरामय आरोग्याकडे जात असते.

nstekale@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for planting trees in and around residential complex zws
Show comments