संपदा सोवनी
पावसाळ्यात धुतलेले कपडे वाळवणं हा मोठाच ‘डोक्याला ताप’ असतो. त्यात तुम्ही मुंबईसारख्या दमट हवा असलेल्या शहरात राहात असाल, तर विचारायलाच नको! इतर शहरांत आणि गावांमध्येही जेव्हा सारखा, थोड्या थोड्या वेळानं पाऊस पडत राहतो तेव्हा साहजिकच वातावरणातली आर्द्रता वाढते आणि कपडे वाळायला बराच उशीर लागतो. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल आणि त्याचा ड्रायर चांगला काम करत असेल तर बरं! पण अनेकदा शहरांत शिक्षण-नोकरीसाठी वसतीगृह वा ‘पीजी’त राहणाऱ्या मंडळींकडे वॉशिंग मशीन नसतं. तेव्हा हातानं कपडे धुणं आणि जोर लावून लावून ते पिळणं, नंतर ते वाळवणं हे मोठं काम असतं. अशा लोकांचं दु:ख तेच जाणोत! असो. पण आज आपण अशा काही ‘क्विक टिप्स’ची उजळणी करणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवून वापरल्यात, तर कुठेही राहात असून पावसाळ्यात तुमचे धुतलेले कपडे लवकर वाळतील.
१) प्रथम कपड्यांची निवड महत्त्वाची
धुतलेले कपडे वाळवण्यापूर्वी पावसाळ्यात कुठले कपडे घालणं योग्य, याचाही विचार करायला हवा. जाड कॉटन, जाड व्हिस्कॉस, होजिअरी, डेनिम, अशा कापडांचे कपडे, अस्तर लावलेले टॉप्स इत्यादी कपडे पावसाळ्यात टाळलेलेच बरे. स्त्रियांनी या दिवसांत शक्यतो पातळ कापडांचे, अति घोळदार नसलेले कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावं. उदा. पातळ, पण चांगल्या दर्जाच्या प्युअर कॉटनचे कपडे, ब्लेंडेड कॉटन, बिझिलिझी, जॉर्जेट, शिफॉन, पॉलिस्टर, पातळ सिल्क, अशी कापडं तुलनेनं लवकर वाळतात हे लक्षात ठेवा. हाच नियम पुरूषांच्या शर्टांनाही लावता येईल. अर्थात बॉटम्सची कापडं नेहमीच पातळ असतील असं सांगता येत नाही. डेनिम वगैरे या ऋतूत अजिबात नको. पण अनेक स्त्रिया, मुली होजिअरी कॉटनच्या लेगिंग, सलवारी, ट्राउझर वापरतात, पुरूष पॅण्टस् वापरतात, हे कपडे वाळायला उशीर लागणारच. आतले कपडेही सहसा होजिअरीच्या कापडाचे असतात, त्यामुळेही तेही उशीरा वाळतात. असे सर्व कपडे वाळवायला खालच्या टिप्सचा उपयोग करून पाहा.
२) कपड्यांमधलं पाणी पूर्ण ठिबकू द्या
कपडे धुतल्यावर एकतर आपण ते वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये पिळतो किंवा हातानं पिळतो. या स्टेपनंतर कपड्यांमधून जास्तीचं पाणी ठिबकतंय का, ते पाहा. कारण असं पाणी शिल्लक राहिल्यास कपडे उशीराच वाळतील. याला उपाय म्हणून बाथरूममध्ये खुंटी किंवा बारवर पिळलेले कपडे तासभर ठेवून द्या. कपड्यांत काही पाणी शिल्लक असेल तर ते या काळात ठिबकून जाईल. मगच कपडे वाळत टाका.
३) कपडे एकेरीच वाळत टाकणं चांगलं
खूप घरांमध्ये कपडे गॅलरीत किंवा घराच्या आत दांड्या वा दोऱ्यांवर वाळत टाकले जातात. धुतलेले सर्व कपडे त्या दोऱ्यांवर मावले नाहीत, तरी एकावर एक कपडे वाळत घालू नका. यासाठी अधिकच्या दोऱ्या वा दांड्यांची सोय करून घ्या. ते शक्य नसेल आणि काही कपडे तरी एकावर एक वाळत टाकावेच लागणार असतील, तर तुम्हाला जे कपडे आधी वाळणं अपेक्षित आहे, ते एकेरी वाळत टाका आणि जे उशीरा वाळून चालतील ते एकावर एक टाका. एकेरी टाकलेले कपडे वाळले, की त्याजागी लगेच दुसरे कपडे पसरून वाळत घाला.
४) स्त्रियांची अंतर्वस्त्र लपूनछपून कशाला वाळवायची?
अनेक स्त्रियांना अंतर्वस्त्रं दांडीवर किंवा दोरीवर बाहेर वाळत टाकायला संकोच वाटतो. आधीच दमट असलेल्या बाथरूममध्ये किंवा बाथरूमच्या पॅसेजमध्ये, बेडरूममध्ये हे कपडे दिसू नयेत अशा पद्धतीनं एकावर एक वाळत टाकले जातात. परिणामी हे कपडे लवकर वाळत नाहीत. आता इथे आपणच आपल्या मनाला समजावून थोडीशी मोकळीक घ्यायला हवी! आपण आतले कपडे लपूनछपून वाळवतो, पण त्या प्रयत्नांत ते न वाळता दमटच राहिले आणि तसेच घालावे लागले, तर आपल्यालाच ‘अनकम्फर्टेबल’ वाटणार आहे. तेव्हा बिनधास्त दोरी किंवा दांडीवर कपडे वाळत टाका! तुम्हाला लाज वाटतच असेल, तर ज्या दोरीवर अंतर्वस्त्रं वाळत घातलीत, त्याच्या पुढच्या दोरीवर दुसरे कपडे वाळत घालता येईल. म्हणजे बाहेरच्या लोकांना वाळत टाकलेली अंतर्वस्त्रं दिसणार नाहीत. याकामी कपडे वाळवण्याचे फोल्डिंगचे स्टॅण्ड किंवा अनेक चिमटे बसवलेलं, कपडे टांगून वाळवण्याचं शिंकाळंसुद्धा चांगलं उपयोगी येईल. यावर आतले कपडे टाकून ते घराच्या आत पंख्याखाली वाळवता येतील.
५) घाईच्या वेळी इस्त्री हा उपाय!
अगदी घाईच्या वेळी कपडे थोडे दमट असतील तर ते इस्त्री करून लवकर वाळवता येतील. यात इस्त्री करताना कपड्यांवर पाणी शिंपडायचीही गरज पडत नाही, कारण कपडा मुळातच दमट असतो. थोडे जाडसर कपडे- उदा. जाड टीशर्ट, पॅण्टस् वाळवायला इस्त्रीचा चांगला उपयोग होतो. मात्र कपडे अगदी ओले असतील, तर त्यांना थेट इस्त्री करू नका. निम्म्या वाळलेल्या, पण अजून दमटसर असलेल्या कपड्यांना मात्र घाईच्या वेळी इस्त्री उपयुक्त ठरते.