उन्हाची झळ चांगलीच जाणवू लागली आहे. उन्हामध्ये बाहेर पडणं शक्यतो टाळणंच चांगलं. पण अनेकदा कामानिमित्त आपल्याला घराबाहेर पडावंच लागतं. मग प्रखर उऩ्हामुळे आपली त्वचा तर प्रभावित होतेच. घाम येतो, अति घामामुळे घामोळ्यांची शक्यता असते. सतत तहान लागते, थकवा येतो. शरीरातील उष्णता वाढते. ऊन बाधलं की तळपायांची आग होते, तापही येतो. डिहायड्रेशन, घामोळे, डोळ्यांची जळजळ अशा अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात आपलं शरीर आतून थंड ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी अगदी साध्या सोप्या घरगुती टीप्स आहेत. या काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्हालाही हा उन्हाळा ‘कूल’ वाटेल.
1)थंड पेय प्या
उन्हाळ्यात सतत तहान लागते. काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. पण थंड याचा अर्थ बाजारात मिळणारी एरिएटेड कोल्डिंक्स नाहीत तर आपल्या शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवणारी थंड पेय किंवा सरबते प्यावीत. नारळपाणी, लिंबू सरबत या ऋतुमध्ये सगळ्यांत उत्तम. त्यामुळे तहान तर भागतेच पण सतत तहान लागणंही कमी होतं. तुम्ही उन्हात बाहेर पडणार असाल तर घरातून निघायच्या आधी सकाळी ताक किंवा कलिंगडाचा ज्यूस, नारळ पाणी, लस्सी, डाळिंबाचा रस प्या. तसंच तुमच्या कामाच्या ठिकाणी, टेबलवर पाण्याची बाटली ठेवायला विसरु नका. दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहा. त्यामुळे उन्हाळे लागण्याची शक्यता कमी होते. तहान भागवण्यासाठी कोकम सरबतही उत्तम आहे. कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यात सर्वोत्तम समजले जाते. त्याचबरोबर गुलाब, वाळा, बेलाचे सरबत अशी विविध प्रकारची सरबतं अवश्य घ्यावीत. ऊसाचा रस पिण्यासही हरकत नाही.
2) हंगामी फळे आणि भाज्या खा-
उन्हाळ्यात मिळणारी पाणीदार फळं अवश्य खावीत. टरबूज, खरबूज यांसारखी फळे काकडी आणि दुधीसारख्या भाज्या. काकडीचा तर रोजच्या आहारात अवश्य समावेश करावा. उन्हाळा म्हणजे आंबा. वर्षातून याच सीझनमध्ये मिळणाऱ्या या फळांच्या राजाचा मनमुराद आस्वाद घ्या. पण अति प्रमाणात खाणे टाळा.
3) हलका आहार घ्या-
उन्हाळ्यात हलका आहार घेणे महत्त्वाचे आहे. अतितेलकट, अतितिखट पदार्थ खाल्ल्यास ते पचायला जड जातात. तेलकट-तिखट पदार्थांमुळे घामही खूप येतो. तहान लागते. त्याऐवजी हलका आहार घ्या. मसालेदार पदार्थ टाळा. रात्री जेवताना खूप तिखट, जास्त जंक फूड शक्यतो खाऊ नये. रोजच्या आहारात दह्याचा समावेश अवश्य करा. आईस्क्रीम किंवा बर्फाचा गोळाही प्रमाणातच खा.
४ ) शरीराला आतून थंड ठेवा-
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे शरीर आतून थंड ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गुलकंद खाणे चांगले. लहान मुलांना तर रोज एक चमचा गुलकंद अवश्य द्यावा. उन्हाळ्याचा त्रास होणाऱ्यांसाठी सब्जाचं बी अत्यंत गुणकारी समजलं जातं. हे सहसा रात्री भिजवून सकाळी खाल्ले जाते किंवा वेगवेगळ्या सरबतांमध्येही सब्जाचा वापर करु शकता.
५) फिक्या रंगाचे कपडे घाला-
उन्हाळ्यात अनेकांना खूप जास्त घाम येतो. बाहेर पडत असाल तर सुती आणि फिक्या रंगाचेच कपडे घाला. उन्हाळ्यामध्ये टाईट, शरीराला घट्ट बसणारे कपडे अजिबात घालू नयेत.नायलॉनसारख्या धाग्यांचे कपडे घातल्याने त्यानं रॅशेस येऊ शकतात. फंगस इन्फेक्शन होऊ शकतं. काळे किंवा गडद रंगाचे कपडे घातल्यास जास्त गरम होते. त्याऐवजी चांगले सुती, हलक्या रंगाचे, आरामदायी, मोकळे कपडे घालावेत. हल्ली विविध फॅशन ब्रँड्सचे खास समर कलेक्शनही असते. तुम्ही त्यातून तुम्हाला सूट होणारा पेहेराव नक्की निवडू शकता.
६) सनग्लाससेस आणि टोपी-
अनेक शहरांमध्ये अगदी सकाळी १० वाजल्यापासूनच ऊन्हाच्या झळा जाणवायला लागतात. त्यामुळे बाहेर पडताना डोळ्यांसाठी गॉगल आणि डोक्यासाठी हॅट किंवा रुमाल न विसरता बरोबर ठेवा. सूर्याची थेट किरणे डोळ्यांवर पडली तर त्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. हे टाळण्यासाठी सनग्लासेसचा उपयोग नक्की करा. त्यासाठी योग्य सल्ला घेऊन सनग्लासेस वापरु शकता. त्याचप्रमाणे थेट डोक्यावर ऊन लागलं तर त्यामुळे सनस्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. टोपी किंवा रुमाल बांधल्याने ही किरणे थेट डोक्यावर पडत नाहीत. अर्थात यासाठी हलक्या रंगाचा रुमाल किंवा टोपी वापरा.
७) कोरफडीचा वापर करा
कोरफड थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराचं तापमान कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करा. कोरफड जेल चेहऱ्याबरोबरच मान आणि हातांवरही लावा. कोरफड जेल थंड करुन लावल्यास अधिक चांगला फायदा होतो. रात्री झोपताना तळपायांना कोरफड जेल लावल्यास त्यानंही थंडावा मिळतो. शरीराला आतून थंडावा मिळण्यासाठी कोरफडीचा ज्यूसही पिऊ शकता.
महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचं प्रमाण कमीच ठेवा. चहा कॉफी अति प्रमाणात प्यायल्यास शरीरातील उष्णता वाढते आणि डिहायड्रेशन होते. त्याचप्रमाणे शिळे अन्न खाऊ नका. उन्हाळ्यात शिळे अन्न पचायला जड जाते. हलका आणि ताजा आहार घ्या. अनावश्यक किंवा कारण नसताना, उगीच उन्हामध्ये फिरु नका. उन्हात बाहेर पडायचंच असेल तर सनस्क्रीन लोशन लावणे, टोपी, स्कार्फ बांधणे आणि सनग्लासेस लावणे या गोष्टींची न विसरता काळजी घ्या. उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर लगेचच उभं राहून पाणी पिऊ नका. या काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर या उन्हाळ्याचा त्रास होणार नाही.