“लग्न होऊन तीन वर्षं झाली गं ऋता, आता एक मूल होऊ देत बाई.” आईनं टोकलं, तसं ऋता शांतपणे म्हणाली, “आई, मी काय सांगतेय ते न चिडता नीट ऐक. आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतलाय.”
“काय? का?” आईसाठी हे धक्कादायक होतं.
“तुला दिसतंय ना माझं काम किती वाढलंय ते? रोज रात्रीचे ९-१० वाजतातच घरी यायला. सहा महिन्यांत प्रमोशन आहे. तुझा जावई तिकडे नॉर्वेला जाण्याचं ठरवतोय. सगळं करिअर असं जोमात असताना कुठे आता त्याला लगाम घालू?”
आईनं तिची बाजू मांडत म्हटलं, “अगं, आम्ही आहोत ना. तुम्ही करिअर घडवा, आम्ही तुमचं मूल वाढवतो.”
हेही वाचा… ‘महिला अत्याचारा’चा विषय पुन्हा बाजूला पडणार आहे…!
“आमचं करण्यात आयुष्य घालवलंत तुम्ही. तुमचं आयुष्य कधी जगणार आहात? आणि नातवंडं असण्याची इतकी ओढ का आहे तुम्हाला? दादाची दोन बाळं आहेत की तुला खेळवायला. पुरे ना. हे बघ आई, आणखी एक जीव जन्माला घालून या जगात दुःख भोगायला नाही आणायचंय आम्हाला. शिवाय त्यांचे वाढते खर्च, त्यांच्या काळज्या, त्यांचा अभ्यास, करियर यासाठी वेळ द्यावाच लागणार, शिवाय मानसिक ताणतणाव येतच राहाणार ते वेगळेच. हे काहीच नकोय आम्हाला. सुखातला जीव दुःखात नको टाकायला.”
“काही तरीच काय? तुमचे जीव दुःखात आहेत का? आणि तुम्ही इतकं कमावता ते कुणासाठी? त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकता की तुम्ही. काही वर्षांनी वय वाढलं, की कुणाच्या तरी भावनिक आधाराची गरज लागते. मुलं हवीशी वाटतात; पण तेव्हा तुमचं वय निघून गेलेलं असेल. इच्छा असूनही काही करता येणार नाही.”
आईनं बराच प्रयत्न केला; पण ऋता ठाम होती. मूल म्हणजे किरकिर, चिडचिड, अडथळा, त्रास आणि मूल नसणं म्हणजे स्वातंत्र्य, मोकळीक, करिअर करणं, कामात अधिक जास्त लक्ष घालता येणं, खूप बचत आणि भरपूर मजा हे समीकरण तिच्या डोक्यात बसलं होतं. त्यामुळे ती ‘anti-natalist’ चळवळीचा हिस्सा बनली होती. केवळ ज्येष्ठ मंडळींना नातवंडं हवं म्हणून तर तिला बाळ नको होतं.
हेही वाचा… आहारवेद : पथ्यकर आहार मूग
याउलट संगीताला मात्र लग्नानंतर वर्षभरात मूल हवं होतं. माणसाच्या भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिक वृद्धीसाठी अपत्य हवंच, असं तिचं मत होतं. आपलं अपत्य असणं ही मानव प्राण्याची अत्यंत मूलभूत नैसर्गिक गरज असते यावर तिचा विश्वास होता. तिची मैत्रीण रम्या मात्र यावर चिडून बोलायची,
“एक पोर झालं, की नवराबायकोमधला रोमान्स संपतो. तुमच्या प्राथमिकता बदलतात. करिअर-नोकरीमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला मागे टाकून पुढे जातात. पुरुषांना काय फरक पडतो? त्यांचं काही बिघडत नाही. बायका मात्र पोरात अडकून पडतात. बायकांच्या प्रगतीच्या आड येतात ही मुलं.” रम्याच्या या टोकाच्या मतावर संगीता चिडून म्हणाली, “शी! काय हे रम्या? आपल्या पालकांनी असा विचार केला असता तर आपण हे जग बघितलंच नसतं. जगाच्या वेगवेगळ्या भागांत तुमच्यासारखा विचार करणारे लोक आहेत, ज्यामुळे अनेक देशांचे बाल जन्मदर कमालीचे खाली आले आहेत माहितेय का तुला? जपानमध्ये आज वृद्ध नागरिकांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी तरुण पिढी संख्येने खूप कमी आहे. हे असंच चालत राहिलं तर त्यांच्या देशात त्यांची लोकसंख्या किती राहील?”
“जगाचा विचार सोड संगीता, आपला म्हणजे आपल्यासारख्या स्त्रियांचा विचार कर. आज मुलं वाढवणं, त्यांना चांगले संस्कार देणं आणि त्यासाठी आपलं अर्धअधिक आयुष्य जाळणं मला तरी नाही जमणार. मला त्यांच्यासाठी वेळ देता येणार नसेल तर त्यांची आबाळ करण्याचाही मला अधिकार नाही.”
“चुकतेयस तू. पालकत्व किंवा आईपण हा फार सुरेख अनुभव आहे. घराला घरपण देतं, नवराबायकोला प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवतं ते मूल. स्वतःच्या रक्ताचं असो नाही तर दत्तक असो, पण अपत्यसुख हवंच मला.”
हा निर्णय प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकानेच तो घ्यायचा, यावर मात्र दोघींचं एकमत झालं.
adaparnadeshpande@gmail.com