आज १८ जून. आज आंतरराष्ट्रीय फादर्स डे साजरा केला जात असताना गुगलच्या वैशिष्ट्यपूर्ण डूडलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजचे गुगलचे डूडल हे विज्ञानातील पीएच.डी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कमला सोहोनी यांचे स्मरण करणारे आहे. १८ जून हा डॉ. कमला सोहोनी यांचा जन्मदिवस आहे. डॉ. कमला सोहोनी यांचे वैज्ञानिक आणि सामाजिक कार्य सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. यापार्श्वभूमीवर डॉ. कमला सोहोनी यांच्याविषयी जाणून घेऊया…

काय आहे आजचे गुगल डूडल ?

आज डॉ, कमला सोहोनी यांचा ११२ वा जन्मदिन आहे. यानिमित्त गुगलने त्यांचे कार्य दर्शवणारे डूडल तयार केले आहे. सूक्ष्मदर्शक, स्लाईड्स, वनस्पतीविज्ञान शास्त्रातील कार्य सूचित करणारे हे डूडल आहे. देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर (IISc) मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या शास्त्रज्ञ आणि विज्ञानातील पीएच.डी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कमला सोहोनी होत्या. विज्ञानातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याविषयी सांगताना गुगलने लिहिले, “आजचे डूडल भारतीय बायोकेमिस्ट डॉ. कमला सोहोनी यांचे स्मरण करणारे आहे. डॉ. सोहोनी यांनी STEM मध्ये महिलांना पदवी मिळवण्याचा मार्ग मोकळा करून दिला. विज्ञान विषयात पीएच.डी मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. “

epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
Allu Arjun Emotional
Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला
Maharashtra Loksatta Lokankika Kolhapur division Why Not Ekankika won Mumbai news
कोल्हापूर विभागाची ‘व्हाय नॉट?’ महाराष्ट्राची लोकांकिका; रत्नागिरी विभागाच्या ‘मशाल’ला द्वितीय तर पुण्याच्या ‘सखा’ला तृतीय पारितोषिक
Indian culture from the perspective of Sane Guruji
साने गुरुजींच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृति
Raghunath Mashelkar statement regarding Shri Morya Gosavi Maharaj Lifetime Achievement Award Pune news
श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद – डॉ. रघुनाथ माशेलकर

डॉ. कमला सोहोनी यांचे जीवनकार्य

डॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहारतज्ज्ञ आणि जीवरसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांची अजून एक ओळख म्हणजे ज्येष्ठ लेखिका आणि अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांच्या त्या भगिनी होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदौर येथे झाले. पुढे मुंबई विद्यापीठाची त्यांनी रसायनशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी त्या बंगलोर येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ आताचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ‘ या संस्थेकडे अर्ज केला. परंतु, त्या महिला असल्याने त्या काळात त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. महिलांच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेवर तेथील अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. परंतु, शिक्षणाची जिद्द असल्यामुळे त्यांनी तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कठीण अटी मान्य करून प्रवेश घेतला. त्यांची निवड आधी वर्षभरासाठीच करण्यात आली होती. परंतु, डॉ. सोहोनी यांची प्रगती बघता त्यांनी पूर्णवेळ शिक्षणास परवानगी दिली, तसेच अजून एका मुलीलाही यांनी क्षमता पडताळून प्रवेश दिला. त्यामुळे इंडियन ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये मुलींना प्रवेशाची द्वारे त्यांनी उघडून दिली. सर चंद्रशेखर व्यंकट रामन, श्रीनिवासय्या या प्रतिष्ठित शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून निरनिराळ्या प्राण्यांचे दूध व कडधान्ये यांतील प्रथिनांवर केलेले संशोधन मुंबई विद्यापीठाला सादर केले आणि १९३६ मध्ये एम्.एस्सी. पदवी मिळविली.

डॉ. सोहोनी यांना १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ व ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ अशा दोन शिष्यवृत्त्या उच्च शिक्षणाकरिता मिळाल्या व त्या इंग्लंडला गेल्या. केंब्रिज येथील ‘सर विल्यम ड्वान इन्स्टिट्यूट ऑफ बायो-केमिस्ट्री’ या संस्थेत त्यांना प्रसिद्ध नोबेल शास्त्रज्ञ सर फ्रेडरिक गाउलंड हॉपकिन्स यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तेथे त्यांनी वनस्पती कोशिकांच्या श्वसनक्रियेवर अभ्यास केला. बटाट्यावर संशोधन करताना त्यांना प्रत्येक वनस्पती कोशिकांत ‘सायटोक्रोम-सी’चा शोध लागला. हे प्रथिन श्वसन रंजक असते असे आढळून आले आहे. तसेच सर्व वनस्पती कोशिकांच्या ऑक्सिडीकरणात ‘सायटोक्रोम-सी’चा सहभाग असतो, हे माहीत झाले. हे मूलभूत संशोधन सोहोनी यांनी केंब्रिज विद्यापीठाला सादर करून १९३९ मध्ये पीएच्.डी. पदवी संपादन केली तोपर्यंत ‘सायटोक्रोम-सी’चे अस्तित्व प्राणिजगतातच असल्याचे ज्ञात होते, मात्र सोहोनी यांच्या संशोधनामुळे सर्व वनस्पती कोशिकांमध्येसुद्धा ते असल्याचे सिद्ध झाले. सोहोनी या केंब्रिज विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय विदुषी ठरल्या.

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?

भारतात परत आल्यानंतर त्यांची नेमणूक दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज’मध्ये प्राध्यापक पदावर झाली. त्यानंतर त्यांची दक्षिण भारतातील कुन्नूर येथे भारत सरकारच्या ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ या आहारशास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थेत सहायक संचालिका म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी पोषणशास्त्राचा अभ्यास करून हरभऱ्यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभऱ्यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली, तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून व कातडीखालून होणारे चिवट आजार थोड्याच अवधीत बरे होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केले.

डॉ. कमला सोहोनी १९४७ नंतर मुंबईत स्थायिक झाल्या. तेथे त्यांची ‘ रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. याच संस्थेत त्या संचालक पदावर १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. तेथे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर निरनिराळ्या कडधान्यांतील प्रथिनांवर काम करून त्यातील अ-पाचक घटक वेगळा करून दाखविला. भाताच्या तूसावर काम करून त्यापासून खाण्यायोग्य धान-आटा बनविला. तसेच नीरा या भारतभर सर्वत्र मिळणाऱ्या नैसर्गिक पेयासंबंधी अभ्यास करून त्याचे कुपोषणाच्या उपचारासाठी होणारे फायदे दाखविले.

नीरेमध्ये क, ब व फॉलिक अम्ल ही जीवनसत्त्वे, लोह आणि फॉस्फरसासारखे क्षार असल्यामुळे ते रोजच्या आहारात उपयुक्त ठरते. नीरेचा मुलांच्या प्रकृतीवर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सोहोनी यांनी डहाणूजवळच्या आदिवासी शाळकरी मुलांची तसेच गर्भवती स्त्रियांची निवड केली. त्यांना या मुलांमध्ये हिरड्यातून रक्त येणे व त्या मऊ होणे तसेच पांडुरोग (ॲनिमिया) व खरूज मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्या मुलांना प्रत्येक दिवशी जेवणाव्यतिरिक्त एक ग्लास नीरा पाच महिने देण्यात आली. नीरेमधील क जीवनसत्त्वामुळे हिरड्यातून येणारे रक्त बंद झाले, तर लोहामुळे पांडुरोग बरा झाला. इतर जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून खरूज बरी झाली. या कार्याबद्दल त्यांना ‘सर्वोत्तम शास्त्रीय संशोधना’चे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या संशोधनात सहभागी झालेल्या २५ विद्यार्थ्यांना एम्.एस्सी. व १७ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. पदवी मुंबई विद्यापीठाकडून मिळाली.

सोहोनी यांनी निवृत्तीनंतर ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेमध्ये काम सुरू केले. अन्नातील भेसळीबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षिके दाखविली व अनेक लेख लिहिले. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना मुंबईतील ‘इंडियन विमेन सायंटिस्ट ॲसोसिएशन’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ‘पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ’ म्हणून गौरविण्यात आले, तर नवी दिल्लीच्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने त्यांचा जीवनगौरव प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. त्यांनी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. या विषयावर त्यांनी आहार-गाथा (आहार व आरोग्य विचार) हे पुस्तक लिहिले.

अभ्यासाची जिद्द माणसाला किती उंचीवर नेऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. कमला सोहोनी. आज गुगलने त्यांच्या कार्याचे स्मरण करणारे डुडलही तयार केले. सर्व भारतीयांसाठी विशेषत्वाने महाराष्ट्रातील सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Story img Loader