हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या लेकीची पाठवणी तिचे आईवडील वाजत गाजत करतात. तिच्या लग्नात तिला हवं-नको ते सारं पाहतात. तिच्या त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालतात. लेकीचा संसार चांगला व्हावा, फुलावा याकरता तिचे आई-वडील हवं ते सारं काही करतात. पण एवढं करूनही मुलगी सासरी नांदली नाही तर? मुलीनं रडत-खडत का होईना सासरी नांदावं, तिचं एकदा लग्न लावून दिलं की तिने परतीची वाट धरू नये म्हणून पालक देव पाण्यात घालून ठेवतात. पण उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एका वडिलांनी त्यांच्या मुलीला घटस्फोटानंतर वाजत गाजत आणि आदराने पुन्हा आपल्या घरी आणलं. त्यांच्या या कृतीचं अनेकांना आश्चर्य वाटत असलं तरीही हे पाऊल स्वागतार्ह म्हणावं लागेल. कारण, मुलीने दुःखात संसार करण्यापेक्षा सुखात माहेरी राहावं, हा विचार मनात येण्यासाठी समाजातील चौकटींना मोडीत काढण्याची धमक वडिलांमध्ये असावी लागते.
“आम्ही आमच्या मुलीला ज्याप्रमाणे सासरी पाठवलं होतं, अगदी तसंच वाजत गाजत पुन्हा परत घेऊन आलो. तिने मानाने आणि स्वच्छंदी जगावं असं आम्हाला वाटतं”, असं या मुलीचे वडील अनिल कुमार म्हणाले. अनिल कुमार यांचा हा विचार अगदीच काळाच्या पुढे नेणारा आहे. त्यांची मुलगी उर्वी (३६) ही एक अभियांत्रिक असून दिल्लीतील पालम विमानतळावर कार्यरत आहे. तिने संगणक अभियंत्याबरोबर (Computer Engineer) २०१६ मध्ये लग्न केलं. या दोघांना पाच वर्षांची एक मुलगी आहे.
उर्वीच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांकडून हुंडा मागितला होता. सासरच्यांचे हुंड्याचे लाड पुरवण्यापेक्षा तिने कोर्टात धाव घेणं पसंत केलं. यामुळे कोर्टाने या जोडप्याला २८ फेब्रुवारी रोजी घटस्फोट मंजूरही केला. गेल्या आठ वर्षांपासून टोमणे, मार, अत्याचार सहन करूनही मी हे नातं टीकवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी हे नातं तुटलंच, अशी खंतही उर्वी हिने बोलून दाखवली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओनुसार, उर्वीचे वडील आणि तिचे इतर कुटुंबिय उर्वीच्या सासरी बॅण्ड बाजा घेऊन गेले होते. यावेळी उर्वीच्या डोळ्यांत अश्रूही होते. पण ते अश्रू आता कायमचे मिटणार आहेत. कारण तिच्या मागे तिचे वडील खंबीरपणे उभे आहेत.
“आम्ही तिला पुन्हा घरी परत आणत असताना बॅण्ड बाजाची सोय केली. जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल. लग्नानंतर मुलीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तिला समजून घेणं गरजेचं आहे”, असं उर्वीचे वडील म्हणाले. “मुलगी आणि नातीबरोबरच्या पुढच्या आयुष्यासाठी मी उत्सुक आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे”, अशी सकारात्मक प्रतिक्रिया उर्वीची आई कुसूमलता यांनी दिली.
“आम्हाला वाटलं उर्वी दुसऱ्यांदा लग्न करतेय. पण आम्हाला जेव्हा तिच्या वडिलांचा उद्देश समजला तेव्हा आम्हाला अधिक आनंद झाला”, असं उर्वीचे शेजारी इंद्राभान सिंग म्हणाले. दरम्यान, उर्वीला तिच्या पालकांचा हा सकारात्मक विचार प्रचंड भावला असून पुढील नवा प्रवास करण्याआधी तिला थोडा ब्रेक घ्यायचा आहे, असं ती म्हणाली. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हेही वाचा >> नातेसंबंध: घटस्फोटानंतर माहेरी वाजतगाजत स्वागत व्हावं?
वडिलांच्या या कृतीचा समाजाने का आदर्श घ्यावा?
मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून पालक अतोनात प्रयत्न करत असतात. नवरा-बायकोतील वाद संपुष्टात येण्यासाठी दोघांची मनधरणीही करत असता. त्यामुळे रडत-खडत आणि दुःखात का होईना, मुलीनं सासरीच नांदावं असं तिच्या आई-वडिलांना वाटतं. अशाच मानसिकतेमुळे अनेक विवाहित तरुणींनी आत्महत्या केली आहे. मुलगी एक वेळ चार खांद्यांवर आलेली चालेल पण दोन पायांवर घरी येऊ ये अशी समाजाची मानसिकता आहे. पण याच मानसिकतेला छेद देण्याची गरज असल्याचं अनिल कुमार यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे.