वैद्य हरीश पाटणकर
काही दिवसांपूर्वी एक महिला वडिलांना घेऊन चिकित्सालयात आल्या होत्या. सोबत त्या आजोबांची नातसुद्धा होती. काल परवा आपल्याशी हसत हसत खेळत असणाऱ्या आपल्या आजोबांना आज अचानक काय झाले, हे त्या चिमुकलीला समजत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर असणारं एक निरागस प्रश्नचिन्ह सहज दिसत होतं. आजोबांना दोन दिवसांपासून अचानक नीट बोलता येत नव्हते. डाव्या बाजूचा पाय, हात उचलता येत नव्हता. चेहरा थोडा वाकडा झाला होता. रुग्ण पाहताच जाणवत होते की यांना पक्षाघाताचा झटका (पॅरालिसीसचा) येऊन गेला आहे. काही लोक यास अंगावरून वारं गेलं आहे, असे म्हणतात. आयुर्वेदात पक्षाघात, पक्षवध, एकांगवात, अर्धागवायू अशी त्याची वेगवेगळी नावे आहेत. आयुर्वेदात यावर काही तरी चांगला उपाय आहे हे समजल्याने त्याची माहिती करून घेण्यासाठी रुग्ण आले होते.
हा आजार आयुर्वेदात वातव्याधी या सदराखाली वर्णन केलेला आहे. पण गंमत म्हणजे याची चिकित्सा सूत्र सांगताना ‘पक्षाघाते विरेचनम।’ असे म्हणून पित्ताची विरेचन ही चिकित्सा सुचविली आहे. पण या चिकित्सासूत्रांचा व रुग्णास झालेल्या पक्षाघाताच्या प्रकाराचा विचार न करता लोकांचा सांगीवांगी औषधे घेण्याकडे अथवा एखाद्या गावात ‘पक्षाघाताचे’ आयुर्वेदिक औषध मिळते ते घेण्याकडेच कल जास्त असतो. औषध बऱ्याचदा आयुर्वेदिक असते, मात्र ते देणारा व्यक्ती आयुर्वेदिक वैद्य नसतो. मग थोड्या दिवसांनी गुण आला नाही की लोक आयुर्वेदिक घेऊनही फायदा झाला नाही, असे म्हणत त्या आजाराच्या एका चांगल्या उपचारपद्धतीला मुकतात. फार उशिरा, व्याधी जुना झाल्यावर आयुर्वेदाला म्हणजे खऱ्या वैद्याकडे येतात.
आणखी वाचा-आयुर्वेदाच्या स्मृतीतून: वात आणणारा वात
त्यातूनही काही वैद्य रुग्णाचे बल चांगले असेल, तर उपचार करून गुणही देतात. मात्र बऱ्याचदा फार वर्षे झालेली असल्यास वैद्याला सुद्धा काही मर्यादा येतात. कारण हा एक ‘वातव्याधी’चा प्रकार आहे. या वाताची दुखणी जेवढी जुनी होतात तेवढी ती बरे व्हायला त्रास देतात. अन्यथा असाध्य बनतात.
मूळात हा ‘पक्षाघात’ का होतो याचे कारण जाणून घेतल्यास आपण हा रोखू शकतो. गावाकडे बऱ्याच जणांना रात्री बाहेर ओट्यावर झोपल्यावर अचानक कधी तरी हा त्रास झालेला जाणवतो. तर काहींना दुपारी भर उन्हातून काम करून घरी आल्यानंतर हा त्रास होतो. एखाद्या दिवशी फार दगदग झाली, रक्तदाब वाढून मेंदूतील रक्तवाहिनी फुटली अथवा स्राव झाला की हा त्रास होतो. यास बऱ्याचदा अनेक दिवस घेतलेला अनावश्यक ‘ताण’ही कारणीभूत असतो. म्हणून तर तणावमुक्त असण्याची सवय लावावी. तरी आपण या अनपेक्षितपणे येणाऱ्या आजारांपासून दूर राहू शकतो. हा आजार घालविण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील एक छोटा उपचार हमखास फायदेशीर ठरतो. तो म्हणजे रोज डोके, पायाचे तळवे व हाताचे तळवे यांना विशेषत्वाने उतार वयामध्ये तरी किमान १५ मिनिटे तेलाने मालिश करावे.
डोकं थंड राहिलं की त्यातील रक्तवाहिन्या कधी फुटत नाहीत. म्हणून तर जुनी माणसं ‘थंडे दिमाख से सोचो’ असे म्हणतात. डोक्यावर बर्फाचा गोळा व जिभेवर खडीसाखर ठेवून विचार करून बोलायची सवय लागली तरी अशा अनेक आजारांपासून आपण कोसो दूर राहू शकतो.
harishpatankar@yahoo.co.in