संपदा सोवनी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीची सुट्टी हे अनेक कुटुंबासाठी लांबच्या प्रवासाचं एक चांगलं निमित्त असतं. सर्वांची सुट्टी जमवून आपापल्या गावी किंवा देशा-परदेशात कुठेही फिरण्यासाठी हे दिवस छानच समजले जातात. सहलीच्या वाटेवर फोटो पूर्वीसुद्धा काढले जात असत. मात्र गेल्या काही वर्षांत जसे उत्तम कॅमेऱ्याचे मोबाईल फोन आणि समाजमाध्यमं प्रत्येकाच्या हातात आली, तसं कोणताही फोटो काढताना आपण तो फोटो ‘पोस्ट’ करण्याजोगे दिसतोय का, याकडे विशेष लक्ष दिलं जाऊ लागलं. अर्थातच ‘ट्रॅव्हल लूक’ , ‘एअरपोर्ट लूक’ यांना फार महत्त्व आलं. तसेही आपण सेलिब्रिटींचे ‘एअरपोर्ट लूक फोटो’ सारखे पाहत असतो. त्यावरून प्रेरणा घेऊन सामान्य लोकही आता ‘ट्रॅव्हल आउटफिट्स’ विचारपूर्वक निवडू लागले आहेत. स्त्रियांच्या स्टायलिंगमध्ये प्रयोगांना अर्थातच अधिक वाव असल्यानं प्रवासाला बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला अगदी टिप-टॉप तयार होऊन आलेल्या ‘चतुरा’ दिसू लागल्या आहेत, त्यात काही नवल नाही. आज आपण असे काही ‘ट्रॅव्हल आउटफिट्स’चे लोकप्रिय पर्याय बघू या…

१) पूर्ण बाह्यांचा क्रॉप टॉप आणि जॉगर्स –

विमानप्रवासात कुठेही गेलात, तर जॉगर्स पॅन्ट आणि पूर्ण बाह्यांचा क्रॉप टॉप, असा ‘को-ऑर्ड’ पोशाख सध्या लोकप्रिय दिसतोय. केवळ विमान प्रवासाच नव्हे, तर खासगी वाहनाने किंवा रेल्वेने केल्या जाणाऱ्या लांबच्या प्रवासांसाठीही हा पोशाख चांगला मानला जातो. यात जॉगर्स आणि क्रॉप टॉप दोन्ही मऊ, कॉटन ब्लेंड कापडाचे असतात. कापड फार पातळ नसतं. वाहनात किंवा विमानातील एसीमुळे थंडी वाजू लागल्यास क्रॉप टॉपच्या लांब बाह्या उपयोगी येतात. इतर वेळी त्या वर सरकवता येतात. या पोशाखावर पायांत साधे स्नीकर्स अडकवले की छान ‘स्मार्ट’ लूक येतो.

आणखी वाचा-‘आज फिर जीने की तमन्ना है…’ – महिमा चौधरी

२) लूज फिट हाय राईज जीन्स आणि ढगळा लिनन शर्ट –

कम्फर्टेबल अशी लूज फिट, हाय राईज जीन्स प्रवासात वापरण्यासाठी नेहमीच उत्तम समजली जाते. जीन्स गुडघ्यावर थोडी फेडेड झालेली, मुद्दाम ‘फाडलेली’ (ripped) असेल, असा लूक सध्या अनेक तरी मुली करताना दिसताहेत. अशा जीन्सवर थोडा ओव्हरसाईज (ढगळ) असा लिननचा छानसा फुल शर्ट घातला जातो. शर्टाच्या बाह्या घड्या करून मागे सरकवल्या जातात. जीन्सवर छानसा ‘कम्फी’ टीशर्ट हा तर अगदी नेहमीचा प्रवासाचा लूक!

३) Lounge पॅन्ट –

अनेक ब्रँड्समध्ये Lounge पॅन्ट उत्तम मिळतात. या पॅन्ट घातल्यावर रात्री झोपताना लोक पायजमा घालतात, तसा कम्फर्ट देतात, पण अगदी पायजम्यासारख्या दिसत नाहीत! अनेक सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लूकमध्ये launge पॅन्ट आणि टीशर्ट हा लूक दिसतो.

आणखी वाचा-माझे सॅनिटर पॅड, माझी जबाबदारी

४) कॉटन कुर्ता-पलाझो

तुम्ही वेस्टर्न कपडे विशेष वापरत नसाल, तरी भारतीय कपड्यांमध्येही लांबच्या प्रवासांना उत्तम असे अनेक पर्याय आहेतच. कॉटनचा, हलक्या वजनाचा छानसा कुर्ता आणि क्रॉप्ड लेग्थ पलाझो हा लूक सुद्धा प्रवासाला जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय दिसतो. कॉटन त्वचेला मऊ लागतं, घाम आला तरी तो कापडात शोषला जायला मदत होते, हा त्याचा एक फायदा आहे.

तुम्ही लांबच्या प्रवासांना जाताना काही खास विचार करून कपडे निवडता का? तुमचा आवडता ट्रॅव्हल/ एअरपोर्ट लुक कोणता?…

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trends in travel clothing for diwali vacation mrj