सुचित्रा प्रभुणे

कमी वयातच दोन मुलांची आई… रंग काळा असाच, त्यामुळे समाजात या रंगावरून हिणवणंच तिच्या वाट्याला आलेलं. पण खेळाडूची शरीरयष्टी आणि फॅशन डिझायनरची पदवी… या जोरावर ती यशस्वी मॉडेल बनू शकली. तुम्हाला हे सारं अशक्य वाटेल. कारण मॉडेल कशी असावी? तर गोरी, उंच, कमनीय बांधा… वगैरे वगैरे आपल्या डोक्यात भरलेलं असतं! यातली एकही गोष्ट तिच्याठायी नव्हती, पण तरीही ती आज यशस्वी मॉडेल आहे. कोण आहे ती? तिचं नाव आहे आलिशा गौतम… ती तिच्या एका कृतीनं प्रकाशझोतात आली होती, त्याची गोष्ट जाणून घ्यावी अशीच.

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Delhi Pregnant teen murder
Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…
son kills mother Ghaziabad crime news
Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
Marathi actress Khushboo Tawde Baby Girl Naming Ceremony Video viral
Video: खुशबू तावडेच्या लेकीचा नामकरण सोहळा घरीच साध्या पद्धतीने पडला पार, तितीक्षाने व्हिडीओ केला शेअर
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!
boyfriend died by heart attack
“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!

तर झालं असं की झारखंडमध्ये एक आदिवासी संस्कृतीशी संबंधित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी एकीकडे तिचं बाळ रडत होतं आणि नेमकं त्याच वेळी दुसरीकडे रॅम्प वॉकसाठी लगेच तिचं नावही पुकारलं जाणार होतं. तिनं क्षणाचाही विलंब न करता खांद्याला कापड (गमछा) बांधून त्यात त्या बाळाला ठेवलं आणि त्याला घेऊन तिनं रॅम्प वॉक केला. एक मॉडेल आणि आई अशी दुहेरी भूमिका तिनं त्या एका क्षणात निभावली! मागच्या ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटनेला एक वर्ष पूर्ण होताना ‘नेटकरी’ पुन्हा एकदा त्या ‘शो’चा व्हिडीओ एकमेकांमध्ये ‘शेअर’ आणि ‘लाईक’ करत आहेत.

हेही वाचा : मुलामुलींच्या लग्नापूर्वी भावी विहिणींनी बोलायला हवं… अगदी भरभरून!

आयुष्यात यशस्वी व्हायचा काही खास असा फॉम्युला नसतो. प्रत्येक देशाचे, जाती -जमातीचे पिढ्यान् पिढ्या चालत आलेले सौंदर्याबाबतचे काही ठराविक मापदंड असतात. विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत तर ते खूपच काटेकोरपणे मांडलेले असतात. तिची शरीरयष्टी चवळीच्या शेंगेसारखी असावी, ती गोरी गोमटी असावी अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. पण इथे महत्त्वाचा मुद्दा हा की ती रंगानं गोरी असणं खूपच आवश्यक असतं! त्यात जर ती मॉडेल असेल तर ती गोरी हवीच. मग भलेही तिच्याकडे इतर आवश्यक ते सर्व गुण असतील, पण ती गोरी नसेल तर मात्र खूप मोठी पंचाईत होऊन बसते. या सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करून यशस्वी मॉडेल बनलेल्या आलिशा गौतमची कहाणी खूप रंजक आहे.

आलिशा ही एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी. तिचे आजोबा पोलिस खात्यात होते. लहानपणापासूनच तिला खेळात प्रचंड रस. यातूनच शाळेत ती फुटबॉल संघाची कॅप्टन बनली. तिच्या खेळातील कौशल्यामुळे तिनं आजोबांप्रमाणे पोलिस खात्यात आपलं करिअर करावं असं तिच्या घरच्यांना वाटत होतं.

पण तिला सुरुवातीपासूनच फॅशनचं क्षेत्र खुणावत होतं, त्यामुळे तिनं राष्ट्रीय फॅशन संस्था, दिल्ली येथून आपलं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात तिचं लग्न झालं आणि ती दोन मुलांची आईदेखील झाली. वय तसं लहानच होतं, पण आपल्या स्वप्नांना पूर्णविराम न देता तिनं आपलं डिझायनरचं काम सुरू ठेवलं. याच काळात तिला फॅशन शोमध्ये सहभागी होण्याची संधीदेखील मिळाली. शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला जाणवलं, की आपण रॅम्पवर सहजतेनं वावरतोय. त्यामुळे डिझायनिंग आणि मॉडेलिंग या दोन्ही ठिकाणी तिनं आपली घौडदौड सुरू ठेवली. यासाठी घरातूनदेखील तिला चांगला पाठिंबा मिळाला.

हेही वाचा : महिलांना शस्त्रे दिल्यामुळे प्रश्न सुटणार की वाढणार ?

प्रगतीच्या पथावर वाटचाल सुरू असताना अनेक लोक तिच्या काळ्या रंगावरून तिला बोल लावत असत. पण ती त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत असे. सतत काळ्या रंगावरून होणाऱ्या टीकेबाबत तिला विचारलं असता ‘ही टीका माझ्यासाठी नवीन नाही’, असं ती म्हणते.

तिने brut या प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय ‘अगदी शाळेत असल्यापासून मी या टीकेला सामोरी गेले आहे. शाळेत तर मला ‘काळी मांजर’ या नावानं चिडवत असत तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण माझ्या कुटुंबियांनी मला वेळोवेळी भक्कम आधार दिला. बाह्यरूपाचं अवडंबर न माजवता गुणांची कदर करायला शीक, हा संस्कार माझ्यात रुजवला. या संस्काराच्या जोरावरच मी आज इथे पोहोचू शकले असं मला वाटतं.

ती सांगते, ‘मला अजूनही आठवतंय मी ज्या वेळेस कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये जेवायला बसायचे, तेव्हा माझ्या टेबलवर कुणीच बसत नसत, कारण मी ‘काळी’ होते! त्याच वेळी मनात कुठेतरी निश्चय केला होता की आज माझ्यापासून दूर पळणारे लोक भविष्यात नक्कीच माझ्या मागेपुढे गर्दी करतील.’ रंग-रूप आपल्या हातात नसतं, पण गुणांच्या आणि समजूतदार कुटुंबियांच्या आधारावर एखादी व्यक्ती निश्चितपणे यशस्वी होऊ शकते, हे ती ठामपणे नमूद करते.

हेही वाचा : महिला साक्षरता ७७ टक्के: अजून मोठा पल्ला गाठायचाय!

‘स्वतःच्या बाळाला घेऊन रॅम्पवर चालणं हा तिचा प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट आहे’, अशीही टीका तिच्यावर केली गेली. याबाबत बोलताना एका मुलाखतीत आलिशा म्हणते, ‘अगदी सहज घडलेला प्रसंग आहे तो! मी बाळाला कडेवर घेऊन उभी होते, कारण ते खूप रडत होतं. थोड्याच वेळानं माझं नाव पुकारण्यात आलं. बाळ कुणाकडेच राहायला तयार नव्हतं. योगायोग असा, की आदिवासी संस्कृती दाखवणारा असा तो फॅशन शो होता. तेव्हा खांद्याला कापड बांधून त्यात बाळाला बांधलं आणि माझा रॅम्प वॉक पूर्ण केला. माझी ही कृती लोकांना इतकी आवडली की टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. शो पूर्ण झाल्यानंतर मी ही घटना विसरूनही गेले. परंतु त्यानंतर दोन -एक दिवसांनी वर्तमानपत्रामध्ये याविषयी भरभरून लिहून आलं, तेव्हा मी एकदमच प्रसिद्धीच्या झोतात आले होते.’

निसर्गानं दिलेल्या रंग-रूपाचा स्वीकार करून अंगभूत गुणांच्या जोरावर यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या सर्वसामान्य आलिशा गौतमची असामान्य कहाणी ही भविष्यात अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.