मुक्ता चैतन्य
‘ती’ला व्हायरल व्हिडीओमध्ये पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तिच्या केसांकडे प्रथम माझं लक्ष गेलं नव्हतं. नवी नवरी. सगळा साजशृंगार आणि तिच्या अतिशय सतेज हास्यावरच माझी नजर खिळलेली होती. मग व्हिडिओतल्या मजकुरावर नजर गेली आणि ‘ग्रे हेअर’ हा शब्द वाचला. मग लक्षात आलं हिचे केस तर पांढरे झालेले आहेत! पण त्या पांढऱ्या होणाऱ्या केसांनी ना तिचं हसू बदललं, ना तिचं लग्न अडलं. किती चांगला बदल आहे हा!
मी ‘मैत्री’विषयी बोलते आहे. मैत्री (मैत्री जोनाला) आणि पार्थ यांचं हैद्राबादला नुकतंच लग्न झालं. त्या लग्नाचे फोटो ‘इन्स्टा’वर ‘व्हायरल’ झाले आणि ‘पांढऱ्या केसांची नवरी’ चर्चेत आली. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांच्या मुलीनं- ‘नियती’नंही लग्नासाठी केस न रंगवता बोहल्यावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. मैत्री आणि नियती या दोघींनाही त्यांच्या घरच्यांनी आणि होणाऱ्या नवऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला, हेही त्यांच्या निर्णयाइतकंच महत्त्वाचं आहे.
हेही वाचा… “लग्न झालंय म्हणून पत्नीला मारहाण करण्याचा पतीला अधिकार नाही!” हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
मी पंजाबला भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या गावांमध्ये कामानिमित्ताने गेले होते. तेव्हा भेट झालेल्या, सतलज नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे शाळकरी वयात केस पांढरे झालेल्या मुलींचीच मला आता आठवण झाली. अगदी चौथी, पाचवीच्या मुली तिथे पांढऱ्या केसांच्या समस्येशी झुंजत आहेत. त्यांच्या पालकांशी किंवा ग्रामस्थांशी बोलल्यावर त्या मुलींच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या लग्नांची सगळ्यांना काळजी पडलेली दिसून आली! लहान वयात प्रदूषित पाण्यामुळे केस पांढरे होणं म्हणजे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आहेत, पण यापेक्षा त्या मुलींची लग्न कशी होणार, याची काळजी सगळ्यांना लागून होती.
नवी नवरी कशी दिसली पाहिजे याचे चिवट सामाजिक संकेत आपल्याकडे आहेत. ती तरुण, सुंदर, गोरी, बांधेसुद हवी. तिची त्वचा तुकतुकीत हवी. केस काळेभोर आणि लांबसडक हवेत. अमुक हवं नि तमुक हवं. ब्रायडल मेकअप आणि ब्रायडल ब्युटी पार्लर सेवांची मोठी बाजारपेठ या सामाजिक संकेतांवरच उभी आहे. पण या दोन्ही मुलींनी हे सगळे संकेत बाजूला ठेवले. आम्ही जशा आहोत तशा आहोत, हे ठणकावून सांगत त्यांनी त्यांचे पांढरे होणारे केस कुठल्याही रंगात रंगवण्यास नकार दिला. पांढऱ्या केसांसह त्या बोहल्यावर चढल्या. हा बदल फार महत्त्वाचा आहे. कारण बाईचं सगळं जगणं ती दिसते कशी, वागते कशी, तिच्या भूमिका ती बजावते, याभोवती गच्च आवळून गेल्या आहेत. हे सगळे सामाजिक संकेत निभावताना तिची दमछाक होते का, तिला त्रास होतो का, ती निराश होते का, वैतागते का, तिला अपमानित वाटतं का, हे बघण्याची गरज कुणालाही वाटत नाही. पुरुषाला लग्नापूर्वीच टक्कल पडलेलं असेल, केस पांढरे झाले असतील, पोट सुटलेलं असेल, तर त्यालाही काही प्रमाणात त्रास होतो हे खरं आहे; पण मुलींना ऐकायला लागणाऱ्या टोमण्यांइतकं पुरूषांना ऐकावं लागत नाही हेही तुम्हाला अनुभवास येईल. याचं कारण हे, की पुरूषांच्या बाबतीत समाजानं लावलेल्या ‘चौकटी’ मुळातच कमी आहेत. पण बाईच्या बाबतीत मात्र अलिखित नियमांची काटेरी चौकट आहे. हे पुन्हा ‘पुरुषाचं कर्तृत्व बघावं आणि स्त्रीचं सौंदर्य’ या अतिशय मागास आणि अमानवी विचारधारेचं फलित आहे.
हेही वाचा… लहान मुलांनाही करून द्या पैशांची ओळख
आपण जसे आहोत, आपलं शरीर जसं आहे, तसं स्वीकारणं अनेकांना कठीण जातं, कारण समाज ते करू देत नाही. पुरुषप्रधान समाज ते करू देत नाही. लोकांच्या नजरा आणि टोमणे सहन करण्याची क्षमता प्रत्येकाची नसते. एखाद्या गोऱ्या कातडीच्या मुलानं सावळ्या मुलीशी लग्न केलं, तर ‘याला गोरी मुलगी मिळाली नाही का?’ असं सहज म्हटलं जातं. किंवा दोघांच्या शारीरिक आकारमानात फरक असेल तर त्यावरुनही यथेच्छ तोंडसुख घ्यायला समाज मागेपुढे पाहत नाही. तरीही जेव्हा मैत्री आणि नियती यांसारख्या मुली धीटपणे पाऊल उचलतात तेव्हा धीम्या गतीने का होईना, पण बदल होत आहेत हे दिसायला लागतं आणि ‘बाईपणा’च्या ओझ्याखाली दबून जायला काही मुली नकार देताहेत हा दिलासा आनंद देऊन जातो.
लेखिका ‘सायबर मैत्र’च्या संस्थापक आहेत.
lokwomen.online@gmail.com